आयुष्याच्या ख-या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कलागुण महत्वाचे;. सुरेंद्र आलुरकर


अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयातील कविवर्य कुसुमाग्रज खुले सभागृहात गुरूवार, दिनांक 2 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन 2023 चा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बहारदार सादरीकरणाने संपन्न झाला.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेंद्र आलुरकर (अध्यक्ष, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई) तर सुप्रसिध्द कवी आणि कथाकार गोरख शेंद्रे (सचिव, मराठवाडा साहित्य परिषद,शाखा अंबाजोगाई) हे प्रमुख पाहुणे म्हणून तर व्यासपीठावर भाशिप्र संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश तळणीकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अप्पाराव यादव, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या सौ.वर्षा मुंडे, खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजय वालवडकर, खोलेश्वर महाविद्यालयाचे डॉ.मुकूंद देवर्षी, उपप्राचार्य तथा स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.बिभीषण फड हे मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांकडून प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा परीचय करून देण्यात आला. वैयक्तीक पद्य प्रा.शैलेश पुराणिक यांनी सादर केले. प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ.बिभीषण फड यांनी विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनातून व्यासपीठ उपलब्ध होते, खोलेश्वर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचे काम करण्यात येते असे सांगून संस्कारक्षम विद्यार्थी आणि उत्तम नागरिक तयार करणे सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करण्यास संस्था व महाविद्यालयाचा नेहमीच प्राधान्यक्रम असल्याचे नमुद करून मागील वर्षभरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, उपक्रम, समारंभ यामध्ये संस्था व महाविद्यालयाचे नांव उज्ज्वल केले असल्याचे सांगून वर्षभराचा आढावा घेतला. त्यानंतर मागील शैक्षणिक वर्षांत विविध स्पर्धा, उपक्रम, परीक्षेत, स्नेहसंमेलना निमित्त आयोजित सादरीकरण, स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन करणारे संस्थेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.


याप्रसंगी बोलताना सुप्रसिध्द कवी आणि कथाकार गोरख शेंद्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले, आपल्या “आत्महत्या व शोध कवितेचा” या लोकप्रिय कविता सादर केल्या, तसेच त्यांनी त्यांची गाजलेली “संप्या” ही ग्रामीण जीवनावर आधारित वाचकप्रिय कथा सादर केली. सुप्रसिध्द कवी आणि कथाकार शेंद्रे यांच्या बहारदार सादरीकरणाने तरूणाई मंञमुग्ध झाली होती. अध्यक्षीय समारोप करताना भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर यांनी संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलातील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. प्रात्यक्षिकांतून मिळवलेले ज्ञान व कार्य मौलिक असल्याचे सांगून महाविद्यालयातील विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, आपण गुणवत्ता, कौशल्य आणि ज्ञानसंपदा या बाबतीत सरस आहोत हे दाखवून द्यायचे आहे, आयुष्याच्या खऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कलागुण महत्वाचे आहेत, स्नेहसंमेलनातून अशा वैशिष्ट्यपूर्ण गुणांचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो त्यामुळे महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या ना कोणत्या स्पर्धा, उपक्रमात सहभागी होवून यश संपादन करावे, राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात आपण ही आपले जे काही आहे ते योगदान द्यावे असे आवाहन संस्थाध्यक्ष डॉ.आलुरकर यांनी केले.


प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आनंदनगरी, अंताक्षरी, कौन बनेगा खोलेश्वर जिनियस, शेलापागोटे, संगीत शेलापागोटे आणि सांस्कृतिक कार्यक्रम या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारितोषिक वितरण समारंभाचे सुञसंचालन प्रा.विनय राजगुरू यांनी केले, तर समारोप सञाचे बहारदार सुत्रसंचालन कु.गायञी वेताळ आणि कु.प्रतिक्षा माने यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.माणिक पोखरकर यांनी मानले. खोलेश्वर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक, कर्मचारीवृंद उपस्थित होते.