अखेर प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांची निवडणुकीतून माघार
विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज वापस घेण्यासाठी आता फक्त काही मिनिटांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाच या मतदारसंघातील प्रबळ दावेदार माजी आमदार प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
केज विधानसभा मतदारसंघात प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी यापुर्वी २०१४ च्या झालेल्या तिरंगी लढतीत भाजपाच्या तिकीटावर विजय मिळवून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्या निवडणूक रिंगणातुन बाहेर पडल्या होत्या.
२०२४ च्या निवडणुकीत सुरुवातीलाच त्या सक्रीय झाल्या होत्या. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या त्या संपर्कात होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी केज विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेत असल्याचे माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे प्रा. संगीता ठोंबरे यांना दिसणारा आशेचा किरण ही धुसर झाला होता.
यासर्व पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज वापस घेण्यासाठी काही मिनीटांचा अवधी शिल्लक राहिला असता प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
खा. सोनवणे यांच्या शिष्टाईला आले यश
बीड जिल्ह्याचे खा. बजरंग सोनवणे यांनी मागील तीन दिवसांपासून प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा देण्यासाठी शिष्टाई सुरु केली होती. अखेर बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाईला यश आले आहे.