अंबाजोगाईच्या प्रदीप जोगदंड यांचा शिल्पकलेत डंका !


अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या अवघ्या ३५ वर्षीय प्रदीप जोगदंड याने शिल्पकलेत संपुर्ण देशात डंका पिटवला आहे. प्रदीप जोगदंड यांनी निर्माण केलेल्या शिल्पकलेचा आता देश विदेशात मागणी वाढत चालली आहे.
अंबाजोगाई शहरातील रहिवासी असलेला प्रदीप जोगदंडा हा सध्या फक्त ३५ वर्षाचा आहे. शिल्पकलेचा कसलाही वारसा नसलेल्या प्रदीप जोगदंड यांचा शिल्पकलेतील प्रवास डोळे विस्फारून टाकणारा आहे. अत्यंत कमी वयामध्ये शिल्पकलेची त्याने केलेली साधना अत्यंत विस्मयकारक आणि या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या तरुणांना दिशादर्शक ठरावा असा आहे.


प्रदीप जोगदंड यांचा जन्म१९ ऑगस्ट १९८७ चा. प्रदीप चे वडील भगवानराव हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी. पगार जेमतेमच! त्यामुळे प्रदीप चे शिक्षण ही सर्वसामान्य मुलांप्रमाणे योगेश्वरी नुतन विद्यालयात मराठी माध्यमातुन झाले. शिक्षणात तसा जेमतेमच, पण चित्रकला-शिल्पकलेची लहाणपणापासूनच आवड. शाळेत असताना प्रदीप चित्रं काढायचा, चिखल माती आणि पुढे शाडुतुन तो शिल्प ही साकारण्याचा प्रयत्न करायचा. १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रदीप ने आपली ही आवड निवडीत याच क्षेत्रात शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि मुंबई येथील सर जे जे स्कुल ऑफ आर्ट येथे शिल्पकलेतील पदवीसाठी प्रवेश घेतला. २००९ मध्ये प्रदीपने शिल्पकलेतील पदवी मिळवली. प्रदीप शिल्पकलेतील पदवी वरच समाधानी राहिला नाही, त्याने पुढे जयपुर येथील फॅकल्टी ऑफ फाइन आर्ट येथून शिल्पकलेतील पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले.


या ठिकाणी त्याला शिल्पकलेतील सर्वैच्च नाव असलेल्या अव्दैत गंडणायक यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली आणि शिल्पकलेतील सर्व बारकावे प्रदीप ने लिलया आत्मसात केले.
शिल्पकलेतील पदव्युत्तर शिक्षण घेतांना प्रदीप जोगदंड याने अव्दैत गंडणायक यांच्या मार्गदर्शनाखाली काम शिकत असताना स्वतःच्या हाताला एक वेगळे वळण लावले आणि त्याच्या हातातुन अत्यंत उत्कृष्ट अशा शिल्पकलांची निर्मिती होवू लागली. अत्यंत कमी वयामध्ये प्रदीप जोगदंड याने शिल्पकलेत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला.


विकसीत केली स्वतः ची शैली
प्रदीप जोगदंड याने शिल्पकलेची स्वतःची एक शैली विकसित केली आणि प्रेम ही थीम घेऊन त्याने अनेक शिल्पकृती बनवल्या. प्रदीप जोगदंड याने आपल्या शिल्पकलेचे पहिले प्रदर्शन २००६ साली पुणे येथील बालगंधर्व कला दालनात भरवले. या पहिल्याच प्रदर्शनाला रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या क्षेत्रातील रुची अधिकच वाढत गेली. २००६ साली पाहीले प्रदर्शन भरवणा-या प्रदीप ने आज पर्यंत मागे वळुन पाहीलेच नाही!
२००६ नंतर प्रदीप याने २००८ लाख चेन्नई येथील ललित कला अकादमी येथे, २००९ ला मुंबई येथील जहॉंगीर आर्ट गॅलरी (मान्सुन शो) येथे, २००९ ला मुंबई येथील म्युझियम आर्ट गॅलरी, २०११ साली मुंबई येथील कॉमरास्वामी हॉल , २०११ मुंबई येथील पु. व. देशपांडे गॅलरी आणि इतर ठिकाणच्या प्रवास करीत २०२२ साली अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या गॅलरीत त्याने आपले शिल्पकलेची प्रदर्शने भरवली.
प्रदीप जोगदंड याने या सोबतच मान्सुन शो आर्टिस्ट सेंटर, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, एन्युअल एक्झिबिशन जहॉंगीर आर्ट गॅलरी, वार्षिक राज्य कला प्रदर्शन केंद्र नाशिक, वार्षिक कला राज्य प्रदर्शन पुणे, वार्षिक कला प्रदर्शन जहॉंगीर आर्ट गॅलरी मुंबई, मान्सून शो जहॉंगीर आर्ट गॅलरी २००७, कला प्रदर्शन जवाहर कला केंद्र जयपुर या ठिकाणच्या शिल्पकला प्रदर्शनात सहभाग नोंदवला.


याशिवाय प्रदीप जोगदंड याने २००६ साली इंडियन मर्चंट चेंबर्स सेंच्युरी सेलिब्रेशन आर्ट कॅम्प सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, २००६ साली मुंबई विद्यापीठाच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पॉट क्लाय लॅण्डस्केप, २००७ मध्ये अखिल भारतीय व्हेरीऐंटेशन07 आर्ट कॅम्प ऑफ आर्टिस्ट, २०१० साली अखिल भारतीय कला शिल्प कॅम्प पटना, एच आर डी डिपार्टमेंट ऍण्ड रंग विकल्प, २०१० साली जवाहर कला केंद्र जयपुर आयोजित नॅशनल कलाशिल्प कॅम्प, २०१२ साली डब्ल्युझेडसीसी ऍण्ड टाकमॅन28 आयोजित अखिल भारतीय कला शिल्प कॅम्प, २०१२ काव्या, म्हैसूर आयोजित नॅशनल कलाशिल्प कॅम्प यामध्ये सहभाग नोंदवला आहे.


आजपर्यंत मिळालेले पुरस्कार !
शिल्पकलेतील प्रदीप जोगदंड याने केलेल्या कामाचा गौरव म्हणून त्याला आजपर्यंत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाची शिष्यवृत्ती, राज्य पातळीवरील शिल्पकलेतील उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, अखिल भारतीय पातळीवर प्रफुल्ला फाऊंडेशन चा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा ५८ वा पुरस्कार, २००७ चा वार्षिक कला प्रदर्शन सर जेजे स्कूल ऑफ आर्ट चा पुरस्कार, २००८ चा वार्षिक कला प्रदर्शन सर जेजे स्कूल ऑफ आर्ट चा पुरस्कार, बॉम्बे आर्ट सोसायटी,जहॆंगीर आर्ट गॅलरी, मुंबई चार पुरस्कार, २००९ चा व्दितीय राज्य कला पुरस्कार यासह इतर अनेक पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
प्रदीप जोगदंड यांच्या कलाशिल्पाला आता देश विदेशातून मागणी येवू लागली आहे. प्रदीप याने काढलेले एक शिल्प ६ लाख रुपयांना विकले गेले आहे. अत्यंत कमी वयामध्ये आपल्या शिल्पकलेचा डंका प्रदीप जोगदंड याने देशभर बजावला आहे, यांचा अंबाजोगाईकर म्हणून सार्थ अभिमान आहे.