मंदिरांचे गावं

अंबाजोगाईची महात्रिपुरसुंदरी आदिमाता श्री योगेश्वरी देवी


मनोहर अंबाजोगाई शहर हे मराठी भाषेचे माहेरघर समजले जाते. या नगरीमध्ये मराठीचे आद्यकवी, ‘विवेकसिंधू’चे निर्माते, श्री मुकुंदराज स्वामी आणि मराठी साहित्यातील मेरूमणी, सतराव्या शतकातील संत साहित्याचे नवकोट नारायण असा ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो ते सर्वज्ञ दासोपंत यांची कर्मभूमी देखील अंबाजोगाईच. दासोपंतांची पासोडी ही मराठी साहित्य शारदेचे महावस्त्र समजली जाते. महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईची ग्रामदेवता योगेश्वरी देवी आहे. शक्तीची देवता म्हणूनही आपण हिला ओळखतो.

आणि देवीच्या या स्थानाला शक्तीपीठ असे म्हणतात. कोकणस्थांची – चित्पावनांची कुलदेवता म्हणूनही तिचे मोठे महत्त्व आहे. परराज्यातूनही या देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात.
अंबाजोगाई हे प्राचीन नगर आहे. अंबाजोगाई आणि परिसरात एकूण दहा शिलालेख सापडलेले आहेत. यापैकी एका शिलालेखात शके १०६५ च्याही पूर्वी योगेश्वरी देवीचे मंदिर अस्तित्वात असल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. महामंडलेश्वर उदयादित्याचा शके १०६६ चा एक शिलालेख अंबाजोगाई येथे आहे. त्यात योगिनी देवीच्या वज्रदंडाचा उल्लेख केलेला आढळतो. देवी पुराण, योगेश्वरी महात्म्य, योगेश्वरी सहस्त्रनामातही योगेश्वरी देवीचा उल्लेख आहे. मुकुंदराज स्वामींनी अंबानगरीचा उल्लेख ‘विवेकसिंधू’ मध्ये मनोहर आंबानगरी असा केलेला आहे.

अंबाजोगाई हे गाव सहिष्णु, शांतताप्रिय, सांस्कृतिक, अभिरुचीसंपन्न , शैक्षणिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले आहे. या गावाचा धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास हा जवळपास बारा व्या शतकापासूनचा असल्याचे पुरावे आपल्याला इथे सापडतात. या योगिनी- योगाई देवीच्या नावावरूनच जोगाई हे नाव या गावाला प्राप्त झाले आहे. शहराच्या मध्यवस्तीत योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून, आतील विस्तृत प्रदेशाच्या मध्यभागी मंदिर आहे. जयवंती नदीच्या पश्चिम तटावर हे देवीचे मंदिर आहे. मंदिराला तटबंदी असून उत्तर, पश्चिम आणि पूर्व दिशांना दरवाजे आहेत. मंदिराच्या चारही दिशांना ओवऱ्या व कमानी आणि त्याखाली ओटे आहेत

. यादवकालीन स्तंभावर आधारित या मंदिराचे बांधकाम असून ही देवी पार्वतीचा अवतार आहे. देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीचे रूप आहे.
मंदिरात गणेशाच्या मूर्ती आहेत. तसेच शिवाची पिंड आणि नंदी आहे. नागाची मूर्तीदेखील आहे. मंदिराच्या शिखरावर अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. शिखरावरील स्त्री रूपातील श्री गणेशाची मोहक मूर्ती लक्षवेधक आहे. हा स्त्री गणेश शाक्तपंथीयाच्या पूजनातील एक मुख्य देवता आहे. शक्तीचे उपासक म्हणजे शाक्तपंथीय होय. मंदिरात हवनकुंड आहे. हे हवनकुंडही शाक्तपंथी उपासकांचेच प्रतीक मानले जाते. मंदिर परिसरात सर्वतीर्थ व पापमोचन तीर्थ आहे. सर्वतीर्थाकडून मंदिराकडे येणारा भुयारी मार्गही इथे अस्तित्वात होता. देवीचा तांदळा नैसर्गिक स्वरूपात आहे. विराट विश्वाचे जन्मस्थान हा तांदळा दाखवतो. ही देवी अखंड कुमारिका आहे. देवीची मूर्ती सृजनाचे प्रतीक , नवनिर्माणाचे प्रतीक आहे. शाश्वत सृजन व सर्जनाचे दर्शन देवीच्या रूपातून होते. आरंभीच्या काळी हे मंदिर तीन शिखरांचे होते. इसवी सन 1720 मध्ये नागोजी त्रीमळ व श्यामजी बापूजी यांनी जुनी सामग्री वापरूनच मंदिराचा जिर्णोद्धार केला. राजा दिनकर यांनी या देवीच्या नित्योपचाराची परंपरा सुरु केली. सृजनाचा नैसर्गिक आविष्कार म्हणून आपण या देवीकडे बघतो. एकाच वेळी असुरांचे निर्दालन आणि त्याचवेळी असंख्य लोकांना अभय देणारी, ममत्व प्रदान करणारी शौर्याची, शक्तीची ही देवी आहे. विश्वंभरा, सर्वार्थसाधिका आहे. योगेश्वरी देवी भक्तवत्सल आदिमाता, जगन्माता आहे.
हे प्रसिद्ध आणि जागृत असे देवस्थान आहे. योगेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वर्षभर सुरूच असतो.

नवरात्र उत्सवात, मार्गशीर्ष महोत्सवात भक्तीरसाने समस्त अंबानगरी न्हाऊन गेलेली असते. या काळात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते.
भक्तीभाव व आस्थेने येथे पर्यटक येतात. येणाऱ्या पर्यटकांनी किमान दोन दिवस तरी येथे राहून पर्यटन करावे या अनुषंगाने सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बहुसंख्य पर्यटक देशातून, संपूर्ण महाराष्ट्रातून इथे येतात, कोकणातून येतात व त्याच दिवशी देवीचे दर्शन घेऊन परळीला प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जातात. इथेच जर पुरेशा उत्तम प्रतीच्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या, तर पर्यटनाला मोठी चालना येथे मिळू शकते. पर्यटनाबरोबरच आर्थिक उलाढाल ही इथे मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
शिर्डी, शेगाव, तिरुपती या देवस्थानाच्या धर्तीवर या शहरातील मंदिरांचा, ऐतिहासिक वास्तूंचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे. योगेश्वरी मंदिर परिसरातील तीर्थाविषयी, मंदिरांविषयी धार्मिक माहिती व महत्त्व सांगणारे फलक लावणे आवश्यक आहे. योगेश्वरी मंदिर परिसरात भारतीय अनुसंधान परिषदेचे पुराण वस्तू संग्रहालय आहे. ते पर्यटकांसाठी सुरू करणे महत्त्वाचे आहे. प्राचीन सांस्कृतिक वैभव दर्शविणाऱ्या अनेक वस्तू, शिलालेख या ठिकाणी आहेत. ते सर्वांसाठी, सर्व पर्यटकांसाठी खुले होणे आवश्यक आहे. अंबाजोगाई शहरात अनेक पर्यटन स्थळे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.
यादवपूर्वकालीन , यादव कालीन तसेच उत्तर यादवकालीन अनेक शिलालेख, वास्तू या शहरात आहेत. त्यांच्या संवर्धनास व संरक्षणास महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषेची जडणघडण कशी झाली हे सांगणारे दुवे ठरतील असे मराठी भाषेतील शिलालेख येथे आहेत. मंदिरे आहेत. मराठी भाषेतील एक अलौकिक अक्षर कृती म्हणजे पासोडी होय. या पासोडीचे मंदिर आपल्याला अंबाजोगाईत पाहायला मिळेल. हे मंदिर आता सर्वसामान्य पर्यटकांसाठीही खुले करण्यात आलेले आहे. अंबाजोगाईचे हे एक मुख्य वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. या सगळ्यांकडे अंबाजोगाईत येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणे अत्यंत आवश्यक आहे.
अंबाजोगाई परिसरातील ऐतिहासिक-धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत:-
१. धार्मिक व ऐतिहासिक वारसास्थळांचे मंदिरांचे विद्रूपीकरण न करता प्राचीनत्व संवर्धित करून हा ऐतिहासिक वारसा जपणे अत्यावश्यक आहे.
२. अंबाजोगाईतील पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते हे चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा स्थळांची स्वच्छता असणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे पर्यटकांनी पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेकडेही लक्ष केंद्रित करणे व नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
३. दुरावस्था झालेल्या पर्यटनस्थळांची उदाहरणार्थ लेण्या, बुरुज, मंदिरे, सकलेश्वर मंदिर, हत्तीखाना यांची डागडूजी करणे आवश्यक आहे.
४. पर्यटकांकरिता प्रत्येक वारसा स्थळांवर विस्तृत आणि शास्त्रीय माहिती असणारे माहिती फलक दर्शनी भागात लावणे, मार्गदर्शिका, नकाशे, वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था तसेच योग्य प्रशिक्षित मार्गदर्शक (गाईड) यांची उपलब्धता असणे गरजेचे आहे.
५. पर्यटकांची वाहतूक व सुरक्षितता, रस्ते, सोयी उत्तम दर्जाची, निवासस्थाने स्वच्छतागृहे यांची सोय करणे आवश्यक आहे. दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटकांसाठी एक विशेष कक्ष किंवा कॉरिडोर उभा करता येईल.
६. अंबाजोगाईच्या पर्यटनाला चालना देणारा विकासाचा एक बृहद विकास आराखडा निर्माण करून त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणेही गरजेचे आहे.
७. ज्या उद्देशाने मंदिर किंवा या पुरातन वास्तू उभ्या आहेत, तो उद्देश कायम ठेवूनच या मंदिर व वास्तूंचे आधुनिकीकरण व्हायला हवे. मंदिरांचे प्राचीनत्व अबाधित ठेवूनच विकासकार्य झाले तर यासोबत आपोआपच बाजारपेठ ही विकसित होऊ शकते.

प्रा. डॉ.सागर शरद कुलकर्णी
मोबाईल क्र.-
9552682267
ईमेल –
sagar44.505@gmail.com

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker