प्रबोधन

गुरु कशासाठी हवा !

मकरंद करंदीकर

बऱ्यापैकी शिक्षण झालेली कांहीं हिंदू माणसे ( अन्य धर्मातील माणसे त्यांच्या त्यांच्या धर्माची कधीही अशी टिंगल उडवत नाहीत ) एकत्र जमली की आपल्या देवदेवता, श्रद्धा, पूजाविधी अशा गोष्टींवर वैचारिक चर्चा या नावाखाली टिंगल टवाळीला ऊत येतो. अनेक जण आपल्या धर्माबद्दलच्या अर्धवट ज्ञानावर आधारलेली बेफाम विधाने करून, आपण विज्ञाननिष्ठ – आधुनिक विचारसरणीचे असल्याचे दाखवितात. पण हीच माणसे, त्यांच्यावर अडचणी आणि संकटे कोसळू लागल्यावर मात्र, ‘ विज्ञाननिष्ठ ‘ या आपल्या जाहीर प्रतिमेला धक्का न लागेल अशा तऱ्हेने गुपचूप, तीर्थक्षेत्री अभिषेक करवून घेतात, विविध पूजा- ग्रहशांती- शांतीपाठ करवून घेतात, तोडगे करतात.

असाच आणखी एक मुद्दा चर्चेला येतो तो म्हणजे – आपण विविध देव आणि देवतांचे अस्तित्व मानतो आणि ते सर्व प्रचंड शक्तिमान आहेत. मग मनुष्यरूपातील अमुकस्वामी आणि तमुकस्वामी हवेतच कशाला ? वरकरणी हा प्रश्न अगदी बिनतोड आणि बुद्धिनिष्ठ वाटतो. पण अनेकजण खूप शिक्षण घेऊनही आपल्या धार्मिक माहितीबद्दल, रिवाजांबद्दल अनभिज्ञ असतात. जर अगदी पाहिल्यापासून आपण धार्मिक शिक्षण अनिवार्य केले तर असे प्रश्न पडणार नाहीत. आपल्या देशातील अल्पसंख्यांक, त्यांच्या शाळांमधून त्यांचे धार्मिक शिक्षण देण्याचा हक्क बजावतात ! या देशात हिंदूंना मात्र धार्मिक शिक्षण घेण्यास बंदी आहे. त्यातूनच आमचे असे अर्धवट धर्मज्ञानी निर्माण होतात आणि आपल्याच धर्माची टिंगल करतात. आता आपण या गुरुश्रेष्ठत्वामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

मुळातच भारतात हजारो वर्षे, मौखिक परंपरेने ज्ञान दिले जात असे. त्या तुलनेने पुस्तके किंवा लिखाण फारच कमी असायचे ! तरीही त्यातूनही निर्माण झालेले हजारो ज्ञानग्रंथ, हस्तलिखिते, पोथ्या इत्यादी ज्ञानसाहित्य मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज आक्रमकांनी जाळून नष्ट केले. त्यामुळे समाजामधील जी दशग्रंथी व्यक्ती १० / १० ग्रंथ तोंडपाठ करून, जतन करून ते पुढच्या पिढीकडे देत असे , समजावून सांगत असे , शिकवत असे त्या व्यक्तीचे स्थान आपोआपच गुरु म्हणून खूप मोठे ठरत असे.

आणखी एक अत्यंत महत्वाचे कारण आहे ! परमेश्वर हा खूप शक्तीवान आहे. ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्याच्याचकडे आहेत असे आपण मानतो. मग गुरु कशासाठी ? आपण काही उदाहरणे पाहू या.

आपल्या घराजवळ जरी २५००० व्होल्टस इतक्या उच्च दाबाचा विजेचा जनरेटर असेल तरी आपण त्याला आपल्या घरातील वायरिंग थेट जोडू शकत नाही. कारण इतकी प्रचंड शक्ती धारण करण्याची कुवत आपल्या घरातील वायरिंगमध्ये नसते. म्हणून त्यासाठी ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केलेली असते.

मेडिकल स्टोअर्समध्ये सगळी औषधे खच्चून भरलेली असतात. तरीही आपली प्रकृती बरी नसेल तर आपण तेथे जाऊन मनाला येतील ती औषधे आणून ती घेऊ शकत नाही. त्यासाठी डॉक्टर आणि फार्मासिस्ट / केमिस्ट लागतात. पाण्याचा प्रचंड मोठा धबधबा जरी समोर असेल तरी त्याखाली बाटली किंवा भांडे धरून पाणी घेता येत नाही. साधा प्रखर सूर्यप्रकाश आपल्याला सहन होत नाही म्हणून आपण आडोसा किंवा सावलीचा आधार घेतो, आपल्याला झेपेल इतकाच प्रकाश घरात येऊ देतो.

त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वराची, पंचमहाभूतांची शक्ती इतकी अपार आहे की बहुसंख्य सामान्य माणसे ती शक्ती, त्यांची कृपा थेट प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. कलियुगाची व्याप्ती जसजशी वाढत जाईल तसतशी माणसांची ही कुवत आणखी कमी होत जाईल. म्हणून गुरु हा एक मानवी रूपातील ट्रान्सफार्मर ( Human step down transformer ) अत्यावश्यक आहे. तो तुमचे कर्म, तुमची क्षमता, तुमची गरज पाहून तुम्हाला ही शक्ती किती, कधी आणि कशी द्यायची हे ठरवितो. तुम्ही या शक्तीचा गैरवापर करणार नाही याची खात्री पटल्यावर तो तुम्हाला आणखीही काही देऊ करतो. हजारो लोकांचे अनुभव असे आहेत की जे गुरु आज हयात नाहीत, त्यांची मनापासून प्रार्थना केल्यावर ते सुद्धा तुम्हाला मदत करतात. कारण देह धारण केलेला असो वा नसो, हल्लीच्या भाषेत बोलायचे तर माणसासाठी compatible असलेली ती शक्ती कायम अस्तित्वात असते.

अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की स्वतःला गुरु म्हणवून घेणारे, अब्जाधीश असलेले, भक्त पकडण्यासाठी प्रचंड यंत्रणा असलेले, मोठमोठी देवस्थाने स्थापून किंवा बळकावून अपार संपत्ती उपभोगणाऱ्यांना खरे गुरु कसे म्हणायचे ? तसेच ज्यांनी एखाद्या वस्त्राशिवाय काही वापरले नाही अशा दिवंगत संतांना, चांदीचे देव्हारे, सोन्याचे मुगुट, चेन – अंगठ्या – दागिने- हिरे – माणके, विदेशी चलन, मण मण सोन्याची आसने अशा वस्तू अर्पण करणारे तरी खरे भक्त आहेत का, असा प्रश्न पडतो. गुरुदक्षिणा म्हणजे गुरूला विकत घ्यायची किंमत नव्हे !

जर गुरु केलाच नाही तर ? तरीही तुम्हाला परमेश्वर देणारच असतो. त्याच्याकडे दुजाभाव नाही. समजा तुम्ही कुणीही गुरु न करता स्वत:च गाणे शिकायचे ठरविले तर अमाप मेहेनत, रियाज करून ते शिकता येते. पण गुरुपाशी शिकलात तर तितक्याच वेळेत ते अधिक आणि सुयोग्यपणे प्राप्त करता येते. तुमच्या गळ्याची जात, स्वरांची समज, मेहेनतीची दिशा या गोष्टी गुरु अधिक जाणतो त्यामुळे तुम्हाला यश लवकर मिळते. एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु न मिळाल्यास तुमची प्रगती कदाचित संथपणे होईल. पण जर चुकीचा, दांभिक गुरु निवडलात तर मात्र यश मिळतंय असे वाटत राहील पण प्रत्यक्षात मात्र लुबाडणुकीशिवाय काही होणार नाही. श्रीमंतीची भगवी वस्त्रे मिरविणाऱ्या, दाढीमिशांचा उत्तम मेकअप असलेल्या, सेलिब्रेटींच्या गराड्यात असणाऱ्या प्रचार गुरूंच्या मागे न लागणेच चांगले.

ज्यांनी आपल्या आयुष्यभर एखाद दुसऱ्या वस्त्राशिवाय काहीही बाळगले नाही, जात पात किंवा गरीब श्रीमंत असे कधी पाहिले नाही, भिक्षा मागून निर्वाह केला, अत्यंत नि:संग आयुष्य जगले आणि लोकांना सदैव मदत करीत राहिले अशा श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह स्वामी, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, साईबाबा अशा अनेक संतांना गुरु मानून त्यांची मनोभावे भक्ती करतांना लाखो लोकं पाहायला मिळतात. आज कलीयुगातही त्यांच्या आशीर्वादामुळे भले झाल्याचा स्वानुभव अनेक भक्त सांगतात. अशा समस्त सदगुरुंना गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र वंदन !

अत्यावश्यक सूचना– ज्यांचा या धार्मिक गोष्टींवर विश्वास आहे त्यांच्यासाठी याचा अर्थ थोडा अधिक सोपा करून सांगावा या उद्देशाने हे लिहिलेले आहे. ज्यांचा यावर विश्वासच नाही त्यांच्या मताबद्दल मला आदर आहे. आणि म्हणूनच त्यांनी आपला यावर विश्वासच नसतांना आपली मते येथे व्यक्त करून लोकांच्या मताचा कृपया अनादर करू नये, ही विनंती.

मकरंद करंदीकर

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker