राष्ट्रीय

कोण आहेत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते निशिकांत कुल्थे !

who is National Award Winner Teacher Shashikant Kulthe!

बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदर्श कार्याबद्दल केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने देशभरातील ४६ शिक्षकांचा गौरव केला आहे. येत्या शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. रौप्यपदक आणि ५० हजार रुपये रोख असे या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे स्वरुप आहे. यापैकी शिक्षक शशिकांत कुलथे यांच्या बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. शशिकांत कुल्थे हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा, या शाळेवर सध्या कार्यरत आहेत.

शशिकांत कुलथे यांचा परिचय :


शशिकांत संभाजीराव कुलथे हे सहशिक्षक म्हणून सर्वप्रथम केंद्रीय प्राथमिक शाळा, परभणी येथे रुजू झाले. त्यानंतर पारगाव शिरस केंद्र अंतर्गत प्रा. शा. केतुरा व प्रा. शा. बहिरवाडी येथेही ते कार्यरत होते. तर सध्या ते गेवराई तालुक्यातील पाचेगाव केंद्रांतर्गत जि. प. प्रा. शा. दामू नाईक तांडा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शशिकांत कुलथे यांनी एम. ए. एम. एड. या शैक्षणिक पात्रतेसोबतच संगीत गायन पारंगतगायन व तबला या विषयात संगीत विशारद, तसेच राष्ट्रभाषा हिंदी पंडित, उर्दू भाषा पदविका, हस्तकला शिक्षक पूर्ण केलेल्या आहेत. याबरोबरच सांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली (सीसीआरटी) चे प्रशिक्षित स्त्रोतव्यक्ती म्हणूनही ते कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दैनंदिन अध्यापन नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने न करता त्यामध्ये तंत्रज्ञानयुक्त, नावीन्यपूर्ण बदल केल्यास हे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासावृद्धी करणारे ठरेल, तसेच या तंत्रज्ञानाला संगीत आणि संस्कृती शिक्षणाची सांगड घातल्यास त्याद्वारे आनंददायी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी व्यक्तिमत्व चतुरस्त्र होण्यास सहाय्यभूत ठरेल यासाठी शिक्षक कलावंत शशिकांत कुल्थे यांनी विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत.

ऑगमेन्टेड फोरडी प्लस फ्लॅश कार्ड :


या प्रकारच्या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संकल्पना प्रत्यक्ष स्वरूपात अनुभवयास देण्यात येतात. यामध्ये ॲनिमल फोर डी, डायनासोर फोर डी, स्पेस फोर डी, ऑक्युपेशन्स फोर डी, आपली पृथ्वी रचना, आपले शरीर रचना, आपली सूर्यमाला, ग्रह व तारे, वनस्पती अवयव रचना, प्राणी अवयव रचना, मर्ज क्यूब, ज्वालामुखी, वनस्पतीची वाढ, सागरतळ रचना, अशा अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना स्वानुभवातून शिकण्यास मिळतात.
प्लीकर्स कार्ड्सद्वारे मूल्यमापन
विविध पाठ्यघटकावर आधारित विद्यार्थ्यांचे अल्प श्रम, अल्प वेळ, अल्प खर्चामध्ये तात्काळ मूल्यमापन प्लीकर्स कार्स द्वारे करण्यात येते. यामुळे विद्यार्थी निहाय, वस्तुनिष्ठ, कॉपीमुक्त व आनंददायी वातावरणात मूल्यमापन होण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांच्या चुकांची तात्काळ दुरुस्ती करता येते.

युट्युब चॅनलची निर्मिती :

शशिकांत कुलथे यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल निर्मित केले असून या चॅनलवर विविध वर्गनिहाय, विषयनिहाय विविध पाठ्यघटकांवर आधारित ॲनिमेटेड व्हिडिओ स्वतः तयार करून आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. या सर्व व्हिडिओचा उपयोग शाळा व परिसरातील इतर विद्यार्थीही करीत आहेत.

क्यूआर कोड व स्मार्ट पीडीएफची निर्मिती:

पाठ्यघटकावर आधारित स्वनिर्मित व्हिडिओ आणि विविध चाचणी परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या वेळेनुसार, आवडीनुसार शाळेत तसेच शाळेच्या व्यतिरिक्त पूर्ण करता येण्यासाठी क्यूआर कोड आणि स्मार्ट पीडीएफची निर्मिती करून त्याचा वापर केला जात आहे.

स्लाईड प्रोजेक्टरचा प्रभावी वापर:

भारतीय सांस्कृतिक संपदेतील विविध कला, लोककला, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, विविध वास्तु, गड, किल्ले, विश्व सांस्कृतिक संपदा, यांची सचित्र माहिती विविध स्लाइड व प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येते.
संगीतातून आनंददायी शिक्षण शालेय अध्ययन अध्यापनात संगीताचा प्रभावी उपयोग करण्यासाठी सर्व वर्गांच्या मराठी, हिंदी व इंग्रजी विषयातील कविता स्वतः स्वरबद्ध केल्यामुळे सर्व कविता विद्यार्थी तालासुरात सादर करतात. याबरोबरच गीतमंचातील प्रार्थना, देशभक्ती गीत, सामूहिक गीत, सीसीआरटीचे विविध प्रादेशिक भाषेतील गीते, सर्व विद्यार्थी उस्फूर्तपणे सादर करतात.

विविध स्पर्धेमधील विद्यार्थ्यांचे यश

आजपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेत यश संपादन केलेले आहे.यामध्ये गायत्री शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद द्वारा आयोजित राज्यस्तरीय निबंध, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेतशाळेतील तीन विद्यार्थ्यास जिल्हास्तरीय कलारत्न पुरस्कार तर शाळेस कला प्रेरणा पुरस्कार.शक्ती प्रतिष्ठान बीड द्वारा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धा या तिन्ही कलाप्रकारात प्रथम क्रमांकाचे बक्षीस, जिल्हा परिषद बीड आयोजित जिल्हास्तरीय बाल महोत्सव ०२ मध्ये गीत गायन कला प्रकारात प्रथम क्रमांक, तसेच जिल्हास्तरीय एक सूर एक ताल मध्ये सामूहिक गीत गायन कला प्रकारात प्रथम क्रमांक. एमकेसीएल विभागीय कार्यालय बीड आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा तीन विद्यार्थी प्रथम. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस शाळेतील विद्यार्थी उत्तीर्ण. अशाप्रकारे शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना संधी देऊन त्याद्वारे विद्यार्थी व शाळेने यश संपादन केलेले आहे.

आकाशवाणी कार्यक्रमाचे सादरीकरण

शाळेतील विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी संगीत मंचाच्या माध्यमातून आकाशवाणी केंद्र बीडद्वारे शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले अनेक कार्यक्रम “बालजगत”या सदरामध्ये प्रसारित करण्यात आलेले आहेत.

भित्तीपत्रके व भित्तीफलक:

विविध लोकनाट्य, लोकनृत्य, भारतातील आठ राष्ट्रीय प्रतीके, विश्व सांस्कृतिक संपदा, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश येथील गड व किल्ले, विविध वाद्य व प्रकार, शास्त्रीय नृत्य, रांगोळी, हस्तकला, बाहुली नाट्य, मंदिर, मस्जिद, चर्च व स्तूप रचना, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक, संत यांचा भित्तीफलक व भित्तीचित्रांच्या माध्यमातून परिचय दिल्यामुळे भारतीय सांस्कृतिक संपदा परिचय, जतन व संवर्धनाचे धडेच विद्यार्थ्यांना देण्यात येतात.

डिजिटल बॅनरद्वारे स्वयंअध्ययन:

शाळेतील विविध वर्गनिहाय, व विषय निहाय विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करण्यासाठी डीजीटल बॅनरचा उपयोग केला जातो. याद्वारे विद्यार्थी गटागटामध्ये तसेच वैयक्तिकरित्या स्वयंअध्ययन करत आहेत.

शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग:

शाळेत उपलब्ध असणाऱ्या स्मार्ट टीव्ही, संगणक याद्वारे डिजिटल अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाची पीडीएफ पुस्तके, फ्लीप ई बुक्स यांचा वापर, इंग्रजी विषयाचे सॉफ्टवेअर, सर्व वर्गाचे ई-लर्निंग अभ्यासक्रम, सर्व वर्गांच्या चाचण्या, प्रश्नपेढी, विद्यार्थी अध्ययन अध्यापन करीत आहेत.

विविध क्लबची स्थापना

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये शाळा, गाव, परिसर, राज्य आणि आपला देश यासंबंधी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी तसेच विविध कलागुणांचा विकास करण्यासाठी शाळेमध्ये युनिस्को नवी दिल्ली मान्यताप्राप्त युनोस्को क्लब, सीसीआरटी द्वारा आयोजित सीसीआरटी क्लब, कला व संस्कृती क्लब, क्रीडा क्लब, पुस्तकवाचन क्लब, इको क्लब, चंपावती सायन्स क्लब यांची स्थापना केलेली आहे.

भाषा संगम उपक्रमाद्वारे विविध भाषांची ओळख:

इंग्रजी भाषा संवर्धन प्रत्येक इयत्तानिहाय विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दूर करून इंग्रजी भाषा संवर्धन करण्यासाठी इंग्रजी सुधार प्रकल्पाअंतर्गत “लिप फोर वर्ड” यांचे उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करून गेवराई तालुक्यातून प्रथम तर बीड जिल्ह्यात तृतीय क्रमांक संपादन केलेला आहे.

तालुक्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना धूम्रपान, तंबाखू, विडी, सिगारेट,अशा आरोग्यास घातक सवयींचे दुष्परिणाम सांगून त्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी सलाम फाउंडेशन नवी मुंबई यांच्याद्वारे आयोजित तंबाखू मुक्त शाळा या उपक्रमात सहभागी होऊन गेवराई तालुक्यातून पहिली तंबाखूमुक्त शाळा म्हणून बहुमान मिळविला आहे. याबरोबरच हस्तलिखित निर्मिती व प्रकाशन, क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, आकर्षक वेशभूषा स्पर्धा, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, मराठी, इंग्रजी, हिंदी परिपाठ आयोजन, मराठी, इंग्रजी हस्ताक्षर सुधार प्रकल्प, राष्ट्रीय सण, दिनविशेष, विशेष दिन, जयंती, पुण्यतिथी, साजरा करणे, विविध स्पर्धा आयोजन व सहभाग अशा अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासात्मक उपक्रमांचे आयोजन शाळास्तरावर करण्यात येत आहे. ज्याद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व चतुरस्त्र होण्यास मदत होत आहे.

शशिकांत कुलथे यांनी आजपर्यंत कार्यरत असलेल्या प्रत्येक शाळेमध्ये भरीव असा समाज सहभाग देखील मिळविलेला आहे. यामध्ये प्रा शा केतुरा येथे ऋषी चैतन्य आश्रम नवी दिल्ली या एनजीओ संस्थेद्वारे शाळेसाठी एलसीडी प्रोजेक्टर, संगणक, साऊंड सिस्टिम व शालेय वर्गनिहाय अभ्यासक्रम प्राप्त केलेला आहे. तसेच दरवर्षी सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी गाव सहभागातून गणवेश, शालेय साहित्य, बूट, सॉक्स, दप्तर देण्यात आले. तसेच शालेय भौतिक सुविधा, परिसर सजावट व इमारत रंगरंगोटी देखील करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामूनाईकतांडा येथे समाज व शिक्षक सहभागातून शाळेसाठी स्मार्ट टीव्ही, वायरलेस साऊंड, साऊंड सिस्टिम, लेझीम व क्रीडा साहित्य, शालेय भौतिक सुविधा, इमारत रंगरंगोटी व शाळा सुशोभीकरण केले आहे.


शशिकांत कुलथे यांचे आजपर्यंत सहा विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यामध्ये संगीत सारस्वत, हसत खेळत शिकूया, कलाविश्व भाग एक, संगीत सारस्वत भाग-2, कलाविश्व भाग-2 आणि रत्नप्रभा या पुस्तकाचे संपादन यासह अनेक पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. शशिकांत कुलथे शालेय अध्ययन-अध्यापनासोबतच विविध विषयांवर लेखनही करतात. यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ द्वारा निर्मित “मराठी विश्वकोश” यामध्ये त्यांच्या सोळा नोंदी समाविष्ट करण्यात आलेले आहेत, तर आठ नोंदी या प्रकाशनार्थ सादर केलेल्या आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ द्वारा प्रकाशित “संगीत कला विहार”या सांगीतिक मासिकांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित झालेले आहे. याबरोबरच विविध वृत्तपत्रीय लेखनामध्ये दैनिक एकमत द्वारे “पंचम” व “संगीत परिचय”ही साप्ताहिक लेखमाला संपूर्ण वर्षभरात प्रकाशित, दैनिक मराठवाडा साथी मध्ये “स्वराविष्कार ही साप्ताहिक लेखमालिका संपूर्ण वर्षभर प्रकाशित, दैनिक लोकशाही वार्ता विदर्भ विभाग यामध्ये “स्वर यात्रिक” ही साप्ताहिक लेखमालिका संपूर्ण वर्षभर प्रकाशित. दैनिक दिव्य लोकप्रभा “कलाविश्व”ही साप्ताहिक लेखमालिका संपूर्ण वर्षभर प्रकाशित. याबरोबरच पंधराहून अधिक राज्यस्तरीय दिवाळी अंक, दहाहून अधिक राज्यस्तरीय विशेषांक, तसेच वीस हून अधिक राज्य विभाग व जिल्हास्तरीय दैनिकांमधून विविधांगी लेखन केलेले आहे. याबरोबरच शशिकांत कुलथे यांची स्वलिखित व दिग्दर्शित “स्वरयात्री”ही प्रायोजित साप्ताहिक मालिका आकाशवाणी केंद्र बीड द्वारा संपूर्ण वर्षभर प्रसारित झालेली आहे. तसेच आज पर्यंत त्यांचे तबला सोलोवादन, सुगम गायन, गझल गायन, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र बीड व आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद द्वारे प्रसारित झालेले आहेत.

संगीत सारस्वत पुस्तकाचे लेखन :

शशिकांत कुलथे यांनी भारतीय संगीतातील गायन, वादन व नृत्य क्षेत्रातील विविध २७ स्वर नक्षत्रांचा जीवनपट आपल्या संगीत सारस्वत या पुस्तकातून उलगडलेला आहे. सदर पुस्तकास पं. जितेंद्र अभिषेकी अध्यासन केंद्र गोवा येथील प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत सहकारी यांची प्रस्तावना, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक, नाट्यकलावंत, दिग्दर्शक डॉ. सतीश साळुंखे, तसेच मराठी गझलनवाज भीमराव पांचाळे यांचे शुभाशीर्वाद लाभलेले आहेत. विशेष अभिमानास्पद गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून सदर पुस्तकाची दखल घेऊन कुल्थे यांच्या पुस्तकास शुभसंदेश देण्यात आलेले आहेत. अशा या सर्वगुणसंपन्न शिक्षकी व्यक्तिमत्वास यावर्षी चा “राष्ट्रपती आदर्श पुरस्कार” जाहीर झाला आहे. शशिकांत कुल्थे यांचे “माध्यम” न्युज नेटवर्क चॅनलच्या वतीने मनापासून अभिनंदन!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker