वारी व विठ्ठल दर्शन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/wari-1.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/wari-1.png)
वेळच्या यशदाच्या प्रशिक्षण वर्गात माझा प्रवेश अगदी सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींची अनुरूप असा झाला. विभागामार्फत यशदात जाण्याचा ‘ रस्ता ‘ बंद झाल्याने मग सत्रसमन्वयकाच्या ‘ डायरेक्ट कनेक्शन ‘ मधून ‘ सुरत.. गुवाहाटी ‘ पॅटर्न प्रमाणे ‘ फलटण.. सातारा ‘ मार्ग अवलंबून प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.’ ठाण्याला ‘ ‘ नागपूरने ‘ पाठिंबा द्यावा तसा ‘ नांदेड ‘ ने ‘ लातूरला ‘ पाठिंबा दिल्यामुळे शिक्षणामध्ये माध्यमांची भूमिका या माझ्या रुचीपूर्ण व नावीन्यपूर्ण विषयाची अनुभूती मला प्रशिक्षण वर्गात घेता आली ती केवळ ‘ श्री बबन जोगदंड ‘नावाच्या माझ्या मागे उभा टाकलेल्या ‘ अदृश्य महाशक्तीमुळेच ‘…
यशदा मध्ये यापूर्वीही मी तीन ते चार वेळा आलेलो आहे. पण या वेळची अनुभूती काही औरच होती. काहीतरी नवीन व अस्सल सापडले आहे असे वाटले. ‘ बबनरावांच्या ‘ माध्यमातून इतका सरळ संयमी व मोकळा माणूस सापडला. बघाना नावही किती सरळ…. ब … ब .. .न . काना नाही ,मात्रा नाही ,उकार नाही ,वेलांटी नाही ,…अगदी नावाप्रमाणे समरूप व्यक्तिमत्व आढळले .त्यांच्या सरळ नावाप्रमाणे त्यांनी मला सरळ वर्गात प्रवेश दिला, आणि त्यांनी आमच्या मनातही सरळ प्रवेश मिळवला. प्रत्यक्ष भेट झाल्यावर तर अंगी किती नाना पदव्या व कला आहेत याचा साक्षात्कार झाला. यशदा मध्ये मी अनेकदा आलेलो आहे. ‘ आम्ही इकडे आहोत ‘ म्हणून ‘ तुम्ही तिकडे राहा ‘ या भूमिकेत व ‘ आम्ही वेगळे आहोत ‘या मानसिकतेत वावरणारी नम्र मंडळी अनुभवली आहे .पण पहिल्यांदा यशदाच्या वातावरणात ‘ बबन जोगदंड ‘यांच्या माध्यमातून ‘ आम्ही इकडे आहोत.. तर ..तुम्हीही इकडे या ‘असं ‘ मैत्रीपूर्व युतीचे ‘ आमंत्रण देणारा एक दुर्मिळ सूत्रसंचालक अनुभवायला मिळाला. केवळ एवढ्यावरच न थांबता ” माझ्या मागं या ‘ असं म्हणण्याऐवजी ‘ माझ्यासोबत राहा व मला वापरून माझ्याही पुढे निघून जा ‘ असं दिलखुलास पाठबळ देणारा व सर्वांना संधीची दार समानतेने खुली करणारा विशाल व दूरदृष्टीचा बबन जोगदंड हा जगापेक्षा वेगळाच आहे हे जाणवलं. विनम्र आदरातित्य, सुसह्य सहवास ,संयमी संप्रेषण व तत्पर सेवा ही बबनरावांची खासियत आहे.या त्यांच्या चतुसूत्री मुळेच त्यांचे वेगळेपण उठून दिसते. कोणतीही प्रतिष्ठित व प्रस्थापित कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना स्व कष्टाने व स्व बळावर भगवान बुद्धांच्य ‘ अत दीप भव ‘ ला वास्तवात उतरवणारा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘ शिका ‘ ‘संघटित व्हा व व संघर्ष करा ‘ या उक्तीमध्ये प्रासंगिक बदल करून ‘ शिका संघटित व्हा व उन्नत व्हा ‘ या संदेशाचा प्रसार करणारा… ‘ आधुनिक आनंद ‘ मला बबनरावांच्या माध्यमातून यशदा मध्ये आढळला .’ नांदेड’ सारख्या दुर्गम जिल्ह्याच्या भागातून शिक्षणाची कास धरून स्वतःच्या ‘ पायवाटेचे ‘ रूपांतर यशदाच्या ‘ हमरस्त्यात ‘प्रयत्नपूर्वक करणारा व यशदा मध्ये ‘ मानवी संबंधांचा बादशहा ‘ असा ‘ मैलाचा दगड’ बनलेल्या बबनरावांची वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे .कोणत्याही पारंपरिक समृद्ध वारशा शिवाय स्वतःचे स्वतंत्र नवं अवकाश त्यांनी निर्माण केले आहे .म्हणून त्यांच्याबद्दल मला म्हणावं वाटतं …
‘ मला आभूषणाची लालसा नाही
हिरा नसलो तरी मी कोळसा नाही
वसा मी घेतला माझ्याच मातीचा
मला कोणत्याही नभाचा वारसा नाही ……’
यशदा ही नेहमी आमच्यासाठी एक ऊर्जा स्थळाचे काम करते. भरकटलेल्या व संवेदनाशून्य होत चाललेल्या प्रशासनाच्या रगड्यातून जेव्हा जेव्हा आम्हाला थकवा जाणवतो, तेव्हा तेव्हा ‘ पुनरुज्जीवीत ‘ होण्यासाठी आम्ही यशदात येतो . इथल्या वातावरणात ” रिचार्जे “होवून पुन्हा सकारात्मकतेने कार्यरत होतो. तेव्हा यामध्ये बबनरावांसारख्या ‘ ऊर्जा केंद्रांचे ‘ योगदान आमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरते ,प्रभाव पडते .
सद्यस्थितीत संकुचित मनाच्या माणसांच्या भाऊ गर्दीत बबनरावांसारखा विशाल हृदयी भेटला की अपूर्वाई वाटते. चांगुलपणांवरचा विश्वास दृढ होतो . यावेळी वार्षिक आषाढी एकादशीनिमित्त मी यशदात होतो ..अशावेळी आपल्या प्रशिक्षणार्थीरुपी भक्तांना’ स्वतःच्या मानवी संपर्क व संबंधरुपी खांद्यावर ‘बसून तुम्ही माझ्याही पेक्षा उंच गगन भरारी घ्या तसेच आपापल्या कर्तव्यरुपी आकाशात चमकत रहा असे सांगून त्यांचे योगक्षेम वाहणारा विठ्ठल रंगी व विठ्ठल रुपी सत्र संचालक बबनरावांच्या माध्यमातून मला भेटल्याने मला साक्षात विठ्ठल भेटीची व यशदात आल्याने पंढरपूर वारीची अनुभूती मिळाली …अशा सामान्य माणसातल्या असामान्य विठ्ठलाचे वारंवार दर्शन होत राहो व त्यांचा सत्संग घडो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना…….
डॉ. योगेश सुरवसे.
अधिव्याख्याता, डाएट, लातूर…