गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू, विलास कारखान्याच्या मील रोलरचे पूजन


लातूर प्रतिनिधी / येणाऱ्या गाळप हंगामासाठी मोठया प्रमाणातील ऊसाची उपलब्धता लक्षात घेऊन विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी कारखान्याचा गळीत हंगाम लवकर व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून गुरूवार दि. ४ ऑगस्ट रोजी मिल रोलरचे पूजन व्हा. चेअरमन रविंद्र काळे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम सन २०२२-२३ साठी ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. यामूळे कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्यादृष्टीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या अनुषंगाने सर्व हंगामपूर्व यंत्रासामुग्री देखभाल व दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. मागील गळीत हंगामाप्रमाणे येणारा हंगाम देखील यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मागील गळीत हंगामात 211 दिवस कारखाना चालवून 7,63,417.470 मे.टन ऊसाचे गाळप करून 11.18 टक्के सरासरी साखर उताऱ्याने 8,53,615 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच बी हेवी मोलासेस लॉससह उच्चांकी सरासरी साखर उतारा प्राप्त झाला आहे. ऊस गाळपास आल्यानंतर शेतकऱ्यांना 10 दिवसांत एफ.आर.पी.पोटी पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा केला आहे. तसेच गाळप हंगाम संपल्यानंतर 100 टक्के एफ.आर.पी. पोटी रक्कम रूपये 211.85 कोटी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांचे मागील हंगामाचे कमिशन डिपॉझीटसह सर्व बिले अदा करण्यात आली आहेत. पुढील हंगामाकरिता आवश्यक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेसोबत करार करण्यात आले असून करार केलेल्या यंत्रणेस पहिली उचल अदा करण्यात आली आहे.
कारखान्याकडे 60 केएलपीडी क्षमतेचा आसवणी प्रकल्प कार्यान्वित असून मागील हंगामात सदरील प्रकल्पामधुन 1 कोटी 10 लाख 31 हजार 670 लिटर स्पिरीटचे उत्पादन झाले असून 98 लाख 96 हजार 759 लिटर इथेनॉल उत्पादन करून उत्पादित इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा करण्यात आला आहे. तसेच मागील हंगामात सहविजनिर्मिती प्रकल्पामधून 5 कोटी 79 लाख 23 हजार 400 युनीट वीज निर्मिती झाली असून त्यापैकी 3 कोटी 14 लाख 66 हजार 052 युनीट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस निर्यात करण्यात आली आहे.
रोलर पूजन कार्यक्रमास व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, यांच्यासह युनीट-१ चे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.