महाराष्ट्र

भाजी विक्रेता, शिपाई ते आमदार… विनायक मेटे यांचा थक्क करणारा जीवन प्रवास !

Vegetable seller, office boy to MLA... Amazing life journey of Vinayak Mete!

सामान्य कुटुंबातुन स्वकर्तृत्वावर राजकारणात दबदबा निर्माण करणारे विनायक मेटे यांची राजकीय वाटचाल थक्क करणारी आहे. भाजी विक्रेता, शिपाई, पेंटर, मिळेल ते काम करत मराठा महासंघाच्या माध्यमातून राजकीय पटलावर उदय झालेल्या मेटेंनी मराठा समाजाची मोट बांधली. संघटन कौशल्य आणि बुद्धी चातुर्य या जीवावर विनायक मेटेंनी पाचवेळा विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व केले.

विनायक मेटे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. सामाजिक चळवळीतून त्यांनी आपले एक एक पाऊल पुढे टाकले. केज तालुक्यातील राजेगाव छोट्याशा गावात जन्मलेले विनायक मेटे यांचे प्राथमिक शिक्षण राजेगाव येथेच झाले. इयत्ता नववीपासूनचे शिक्षण नाहोलीत घेतले. इयत्ता दहावीत संपूर्ण शाळेमधून केवळ दोनच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विनायक मेटे पहिले आले. पुढे त्यांनी बीडच्या केएसके महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना उपजिविकेच्या साधनासाठी छोटी मोठी कामं करू लागले. बीडमध्ये आर्थिक चणचण निर्माण झाली म्हणून कामासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत मिळेल ते काम मेटे करू लागले. सुरूवातीला मुंबईत भाजी विकण्याचे काम त्यांनी केले. चेंबूरमध्ये मामाकडे राहत असताना आरसीएफ कंपनीत शिपाई म्हणून नोकरी स्वीकारली. त्यानंतर चप्पल बुटाच्या दुकानातही काम केले. कपड्याच्या मिलमध्ये शिपाई म्हणून काम केल्यानंतर मोठ्या भावासोबत पेंटरच्या कामाल सुरुवात केली. छोटे मोठे टेंडर मिळू लागले. त्या काळात त्यांनी मुंबईत आपले बस्थान बसवायला सुरूवात केली.
इमारतीचे रंगोटीचे काम करत असताना मराठा महासंघाच्या कार्यातून आपले संघटन वाढू लागले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. या काळात मराठा महासंघाच्या चळवळीत त्यांनी प्रभावी काम केले. त्यांची तळमळ, संघटन कौशल्य, आक्रमकपणा पाहून मेटेंचं नेतृत्व फुलत गेलं. मराठा आरक्षण प्रश्नाचे मेटेंनी राज्य पातळीवर नेतृत्व केले. 1995 च्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेवून विनायक मेटे यांनी युतीला पाठिंबा • दिला. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर अवघ्या तिसाव्या वर्षी विनायक मेटे विधान परिषदेवर नियुक्त झाले.

अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे ते अध्यक्ष होते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या बुद्धीकौशल्यावर आणि संघटन कौशल्यावर त्यांनी राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. तब्बल पाच वेळा विधान परिषदेवर ते नियुक्त झाले. 2014 साली पहिल्यांदाच त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघाची भाजपाकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला. 25 वर्ष आमदार असणाऱ्या मेटेंचे मंत्री होण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले.

शेवटची सायंकाळ अंबाजोगाईत !

विनायक मेटे यांच्या चाहता वर्ग महाराष्ट्र भर असल्यामुळे ते सतत फिरत असायचे. अंबाजोगाई शहरावर त्यांचे विलक्षण प्रेम होते. अंबाजोगाई शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींशी ते अत्यंत सन्मानाने व आदरपुर्वक बोलत असत. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गही अंबाजोगाई शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. विनायक मेटे यांनी काल सायंकाळी अंबाजोगाई शहरात बराच वेळ घालवला.मराठा आरक्षण आणि शिवसंग्राम पक्ष हे त्यांचे दोन आवडते विषय. याच विषयावर त्यांनी शहरातील अनेक युवकांनी संवाद साधला. यावेळी शहरातील तरुण पत्रकार अतुल जाधव यांना बोलावून घेवून त्यांनी मनःपुर्वक शुभेच्छा ही दिल्या होत्या. काल रात्री ते उशीरा अंबाजोगाई हुन थेट मुंबई कडे रवाना झाल्याची माहिती मिळते. विनायक मेटे यांच्या निधनाचे वृत्त हे काल रात्री त्यांच्या सानिध्यात असलेल्या त्यांच्या चाहत्यांना धक्का देणारे वृत्त ठरले.

अंत्यसंस्कार होणार बीड मध्ये

शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१५) दुपारी बीडमध्ये अत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली. आज सायंकाळी मुंबईहून त्यांचे पार्थिव बीड शहरात आणण्यात येणार असून अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
विनायकराव मेटे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात सर्व तपासण्यानंतर मेटे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पार्थिव बीडमध्ये आणण्यात येणार असून नागरिकांना अंत्यदर्शना घेता यावे यासाठी शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी बीड शहरातील कॅनॉल रोडवरील सुमित नगर येथील परिसरात मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निश्चित करण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, बीड ग्रामीणचे संतोष साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खांडे यांच्यासह शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलगडे, नारायण काशीद, विनोद कवडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. दरम्यान, अधिकृत माहिती शिवसंग्राम भवनमधून देण्यात आली आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker