बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांचे अनावृत्त पत्र


56 वर्ष, शिवसेना नावाचा झंझावात, बाळासाहेब नावाचा दुमदुमता आवाज, आजही मनमनांना पेटवून उठतो, आव्वाज कुणाचा, म्हंटल्यावर चारी दिशांनी, साऱ्या आसमंतात, शिवसेना, हा एकच शब्द उमटतो. आज जे दिसतंय ना साहेब, त्याने वाईट जरूर वाटलं पण ऊद्धव साहेब फार सुंदर बोलले, सुकलेली, सडलेली, झाडाची गरज संपलेली पान उडाली, आता नवी पालवी, नवी पानं. मनाला उभारी मिळाली. अंगार पेटवणं, तो फुलवणं, हाच तर ठाकरी बाणा हीच तर खरी शिवसेना, सामान्यांची शिवसेना असं पत्रात म्हटलं आहे.
शिवसेना ही फक्त पक्ष वा संघटना नाही, तो विचार आहे, जगण्याचा आचार आहे. 1966 साली आपण समस्त मराठी मनामनांत जागविलेला तो स्वाभिमानाचा खरा हुंकार आहे. परवा म्हणालं कुणी शिवसेना आता संपेल.. किव आली साहेब, 56 वर्षात अनेक वादळ पचविणारी ही शिवसेना आधीच्या प्रयत्नांनी संपली नाही, ती या गळालेल्या पालापाचोळ्यांनी कशी संपेल ? जिची मुळं खोल जनमानसांच्या हृदयात घट्ट रुजली आहेत, ती शिवसेना कशी सपेल ? बाळासाहेब ह्या एका शब्दांवर जीव देण्यास तयार शिवसैनिक असताना कशी संपेल? असं पत्रात म्हटलं आहे.
साहेब, मी वयाने, पदाने लहान आहे पण आदित्य साहेबांसोबत वावरताना, उद्धव साहेबांना अनुभवतांना, मातोश्रीच्या भिंतींना हात लावतांना सारखं वाटतं, अचानक तुमचा आवाज येईल, काय रे ? बरं चाललंय ना ? कसं सांगू साहेब तुम्हांला, खरंच व्यापून टाकलंय तुम्ही तमाम शिवसैनिकांना, आम्ही आमचे उरलोच नाहीत साहेब. आमची शक्ती, आमची प्रेरणा.. फक्त शिवसेना. हा माझाच नाही साहेब, साऱ्या शिवसैनिकांचा अनुभव आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.