शिंदे गटाने जाहीर केली शिवसेनेची नवी कार्यकारिणी


मुंबई / शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही.
एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाने शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नेमणूक केली जाणार असून प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना उद्याच (19 जुलै रोजी) पत्र दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेत बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार अजूनही ठाकरे गटांशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले जाते.
शिंदेंकडून नवी कार्यकारिणी जाहीर
शिवसेनेने जारी केलेल्या कार्यकारिणीतील नियुक्त्या पुढीलप्रमाणे-
मुख्य नेता- एकनाथ शिंदे
मुख्य प्रवक्ते- दीपक केसरकर
उपनेते- तानाजी सावंत
उपनेते- यशवंत जाधव
उपनेते- गुलाबराव पाटील
उपनेते- उदय सामंत
दीपक केसरकर काय म्हणाले?
शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटासोबत असल्याची चर्चा आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, मला वाटतं आमच्याबरोबर सगळेच खासदार आहेत. कारण हिंदुत्वाचा विचार आमच्यासोबत आहे. त्यामुळे हाच विचार अधिक व्यापक प्रमाणावर पसरवण्यात आम्ही भूमिका असेल, असं दीपक केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे दिल्लीत..
दरम्यान, महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तापेचावरील सुनावणी येत्या बुधवारी घटनापीठासमोर होणार आहे. यानिमित्त कायदेशीर बाजूंत मार्गदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठी आणि कायदेशीर तज्ज्ञांचं ते मार्गदर्शन घेतील, अशी माहिती आहे.
14 खासदार उद्या फुटणार?
आज राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचे 14 खासदार फुटतील अशा चर्चा होत्या. मात्र प्रत्यक्षात तसं चित्र दिसलं नाही. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही स्पष्ट सांगितलं की, शिवसेनेचे सर्व खासदार आमच्या सोबत आहेत. मात्र राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहे. हे 14 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून नवा गट स्थापन करणार आहेत. या गटाचे संसदेतील गटनेते राहुल शेवाळे असतील. संसदेतील गटनेतेपदी त्यांनी नियुक्ती केली जाईल, अशीही शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.