अंबाजोगाईच्या मातीने जीवन समृद्ध केले; डॉ. माधवराव किन्हाळकर
The soil of Ambajogai enriched life; Dr. Madhavrao Kinhalkar
शिक्षणासह सामाजिक, राजकीय बळ व संस्कार अंबाजोगाईने दिले, त्यामुळे समृध्द जीवन प्राप्त झाल्याच्या भावना माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांनी रविवारी (दि.२१) येथे व्यक्त केल्या. येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या तीन दिवसीय दहाव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात “माझ्या सवे गंध अंबाजोगाईचा” या विषयावरील परिसंवादात डाॅ. किन्हाळकर बोलत होते. याप्रसंगी अंबाजोगाईचे भूमीपुत्र दिग्दर्शक रमेश गंगणे व दिल्लीतील विधिज्ञ ॲड. विशाल जोगदंड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डाॅ. किन्हाळकर आपल्या आठवणी जागवताना म्हणाले, की अंबाजोगाईची मातीच समृध्द आहे. या शहराला समाज धुरिणांनी सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक अधिष्ठान मिळवून दिले आहे. अंबाजोगाईत राहिलेला प्रत्येक माणूस बाहेर कुठेही गेला, तर तो समर्थपणे काम करू शकतो. यादवांच्या काळापासूनच या भूमीला सांस्कृतिक वारसा आहे. त्यानंतर आद्य कवी मुकुंदराज, सर्वज्ञ दासोपंत या संतांनी या शहराला उर्जा दिली. त्याचा वारसा इथे चालतो आहे. व्यक्तीला मोठे करण्यात समाजाचे पाठबळ असते, ते इथल्या माणसांनी दिले. ही साहित्याची श्रीमंत नगरी आहे. सामाजिक सद्भाव जपणारे हे गाव आहे. भौतिक विकास होत असला तरी, स्नेह व प्रेमाची भावना मिटत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. विकासाची संकल्पना मांडताना नको ती स्पर्धा होता कामा नये, सांस्कृतिक दृष्ट्या उन्नत असणारा माणूस घडला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय मिळविण्यात कै. डाॅ. व्यंकटराव डावळे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या कार्याला न विसरता, त्यांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अंबाजोगाईचे भूमीपूत्र व सध्या दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात विधिज्ञ असलेले ॲड. विशाल जोगदंड यांनीही अंबाजोगाईच्या आठवणी सांगून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व्यवस्थित उपयोग केला, तर कुठलीच गळचेपी होत नाही असे मत व्यक्त केले.
मराठी चित्रपट दिग्दर्शक रमेश गंगणे यांनी अंबाजोगाई ते मुंबई प्रवास, शिक्षण सुरू असतानाच चित्रपटाचे वेड असल्याने एक नायक व दिग्दर्शक होण्यासाठी वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रथम कोल्हापूर, नंतर मुंबई कशी गाठली याचा अनुभव सांगितला. पळवापळवी या चित्रपटासह इतर चित्रपटात सह दिग्दर्शक म्हणून काम करताना आलेले अनुभवही सांगितले. आपल्या शैलीत निळू फुले, अशोक सराफ व दादा कोंडके यांची मिमिक्री करून, उपस्थित साहित्य श्रोत्यांचे मनोरंजनही रमेश गंगणे यांनी केले. प्रा. डाॅ. शैलजा बरुरे यांनी सूत्रसंचालन करून परिसंवादातील मान्यवरांचा परिचयही दिला.