मी आईवडिलांना प्रेमानं सांभाळलं. बायकोला देता येतील ती सगळी सुखं दिली. त्यात प्रेम होतं.कर्तव्याचाही भाग होता. मुलांना काही कमी पडू दिलं नाही. शिकवलं. व्यवहारात शहाणं केलं. त्यांच्या पायांवर उभं राहण्याच्या काळात त्यांच्यामागं भक्कम उभा राहिलो. भावंडांना कायम मदतीचा हात दिला. मित्र, सहकारी, शेजारी मला कायम आपला माणूस मानतात…अजून काय हवं ?
गेल्या दोन वर्षांत मी आणखी एका माणसाला जवळ केलंय. त्याची आनंदी वृत्ती, आरोग्य, समाधान….याकडं विशेष लक्ष देतोय….हांहां..उगीच तर्कट लढवत ‘ ती व्यक्ती कोण ? ‘ याचा फार आचरट विचार करू नका…तो माणूस म्हणजे मी स्वतः . मी हल्ली मला जरा विशेष प्रेमानं वागवतोय.
आपल्या कॉलेजकाळात एक सायकल होती.त्याच्या नळीवर कंपनीचं बोधचिन्ह होतं. खांद्यावर पृथ्वीचा गोल सावरणाऱ्या माणसाचं. मग मला कधीतरी कळलं की त्या देवतेचं नाव आहे ॲटलास …आता मला नीट समजू लागलंय. मी तो नव्हे. सगळ्या दुनियेचा बोजा मी माझ्या खांद्यावर वागवत हिंडायचं काहीही कारण नाही.
आता मी हातात पिशव्या घेऊन बाजाराला जातो तेव्हा कोपऱ्यावर दिवसभर भाजी विकत बसणाऱ्या माणसाशी बोलताना खत्रूडपणानं वागत नाही . भाव करताना भांडण करत नाही. गोड…नको हा शब्द, नीट बोलतो .बरोबरीच्या नात्यानं. थोडा अधिक स्नेहशील होतो. मृदू होतो. फळांची गाडी लावणाऱ्या बागवानाला ‘सलाम, भाई..’ म्हणताना आनंद होतो..त्याच्याही चेहऱ्यावर उमटणारे आपुलकीचे रंग मला समजू लागलेत.तुटलेल्या चपलेचा बंद शिवताना “काय माऊली, कसं काय ?” असं विचारलं की त्या कारागिरालाही बरं वाटतं..रिक्षात बसताना, दुकानात…नुसत्या नोटा नाही नाचवत. सुट्टे पैसे देतो. बरं वाटतं ह्या लोकांना. एखादा रुपया जादा दिला समजा, तर “ असू दे, राहू देत…” म्हणताना मस्त मजा येते. पिशवीत मुद्दाम सांभाळलेली चॉकलेट्स मस्त जादू करतात…लहान मुलं जेव्हा आजोबा अशी हाक मारतात तेव्हा नुसती चार चॉकलेटे समोर धरायची. ती लेकरे एक घेतात…आणि लाख मोलाचं हसतात. अनोळखी असली तरी.. आणि त्यांच्या आईबापांना जे अप्रूप वाटतं ,ते कसं सांगू , राव !
कधीकधी मला भाजी विकणाऱ्या बाईच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येतं की, घासाघीस न केलेल्या भाजीच्या किंमतीमुळे दोनचार रुपये तिच्या गल्ल्यात वाढले…ते तिच्या लेकीच्या शाळेच्या फीसाठी तिला हवे होते…बागवानाला गेलेल्या पाच रुपयातील दोन त्याच्या म्हाताऱ्या बापाच्या औषधासाठी उपयोगाला येणार आहेत…नाहीतरी मी उडप्याच्या हॉटेलात मसालाडोश्यानंतरच्या कॉफीत ते पैसे उडवणार होतोच की.
आणखी एक पत्थ्य मी घरात, मित्रांच्यात बोलताना पाळायचं ठरवलंय.
बोलताना मनाला विचारायचं. मी हे आत्ता बोललंच पाहिजे का ? समजा, नाही बोललो तर काय होईल ? चालेल का ?
हा सल्ला नाही दिला तर चालेल की. समोरचा माणूस पोक्त आहे, सुज्ञ आहे.
मी काहीही प्रतिक्रिया नाही दिली..हा सुद्धा बोलका प्रतिसाद असू शकतो नं.
आणि मग मी मनातल्या मनात जे बोलत बसतो नं..ते बरं असतं.
जुने अनुभव, आठवणी, ऑकिस्से..सांगतानाही मी मला विचारतो..पुन्हापुन्हा तेच ते तर सांगितलं जात नाही नं माझ्याकडून ? नाहीतरी ,” अरे काय सांगू..आमच्या वेळी…” अशी प्रस्तावना जोडून कशाला उगीच जुनं उगाळत बसायचं , नाही का ?
बारीकसारीक कामांची यादी करायची. खिश्यात ठेवायची. एका हेलपाट्यात
आवरायचं. ओझं होत असेल तर रिक्षा करायची.रिक्षावाल्या माणसाला आधी कल्पना द्यायची .वेटिंग चार्जेस वाढतील….वाढू देत की…तोही खुश.
मी चारचौघात माणसांना दुरुस्त करायचं बंद केलं. माणसं चुकीचं बोलतात. मला न आवडणारे विचार मांडतात, मतं मांडतात…असू दे…मी कशाला उलथापालथा होऊ ? माझा जीव म्हणजे दरखेपेला पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखा फडफडायला हवाच का ? कुणीही बिनचूक नाही. ब्रम्हदेव नाही. ज्योतिषी नाही. परिपूर्ण नाही.. दुसऱ्या मिनिटाला त्याचं त्याला आठवत नसतं काय बोललो ते.काय ऐकलं ते. मी कशाला धरून बसू ?…अंततः काय होतं, माणसं तुटतात. गैरसमज होतात. मैत्री आटत जाते. घरं तुटतात..त्यापेक्षा प्रतिसाद न देणं बरं.
मी आता मोकळ्या मनानं कौतुक करतो..चार चांगले ,हुशारी आणणारे, प्रोत्साहन देणारे शब्द वापरायचे असतील तर खुल्या मनानं वापरतो. एकतर माझ्या वयाच्या माणसाकडून तरुण पिढीला अजून काय हवं असतं ? पाठीवर थाप द्या कौतुकाची आणि लढ म्हणा..या कवितेनं मला नवी नजर दिली बघा.. दिवसभर राबणाऱ्या मुलामुलींना कौतुकाचे दोन शब्द हवेत. नातवंडांना आजोबे हवेत. त्यांची माया हवी. बरोबरीच्या माणसांना तर कितीतरी आधार हवे आहेत. मैत्रीचे चार शब्द ऐकून त्यांनाही बरं वाटतं नं ….त्यांनाही कुणालातरी काहीतरी सांगायचं असतं.त्यासाठी समोर हाडामासाचा समजून घेईल असा माणूस हवा असतो.
चांगला सल्ला देताना मी समोरच्या माणसाच्या डोळ्यांत बघायचं..मग बोलायचं. कचरा नाही होऊ द्यायचा. सल्ल्याचा आणि माझाही..
आता शर्टाची इस्त्री, बुटाचं पॉलिश…इकडं फार लक्ष नाही देत. केस थोडे वाढलेत..खरं तर आजच जायला हवं होतं केस कापायला म्हणून हळहळायचं नाही. याची फार नाही काळजी करायची..काळजी घेण्याचे विषय बदललेत. औषधं, व्यायाम, आर्थिक व्यवहार..याची मी काळजी घेतो. माझ्यापेक्षा लहान वयाच्या मुलांवर वचक बसवायचा नाही, त्यांची मदत घ्यायची आहे. इम्प्रेशन मारायची गरज नाही, तरुण पिढी माझ्या व्यासंगाची चाहती आहे. माझ्या जगात त्यांना जागा हवी आहे..माझ्यासाठी सन्मानाची खुर्ची ते मांडणार नाहीत तरीही वयानं पोक्त झालेला मित्र त्यांना हवा आहे..या पिढीला मदतनीस हवा आहे. नातवंडांना मित्र हवा आहे. मुलामुलींच्या वयाच्या मित्रांना हक्काचा काका हवा आहे . त्यांना सख्खा काका-मामा-मावसा नाही…मी घेतो नं ती जागा.
जिथं मी जाण्यानं आनंद होईल तिथं मी जातो…जिथं जाण्यानं माणसांचे चेहरे उतरतात, तिथं जायचं कशाला उगाच.आपल्या जागी आपण ठीक.
राजकारण या विषयावर चर्चा ?
नको. मतप्रदर्शन? गरज नाही. रक्त उकळवणारी प्रसारयंत्रणा ? मी माझ्या जागी थंड डोक्यानं विचार करीन..माझ्या मनाला धक्के देणाऱ्या समस्त शक्तींनो, आपली अनुपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्पर्धा, चढाओढ, शर्यत,..अजिबात नको.
तुझ्या ,कुणाच्याही उपस्थितीत अचानक भावनांना आवर घालायचं थांबवलं मी आता. कधी लहानग्या पोरासारखं खिदळतो. कधी घशात आवंढा अडतो. कधी डोळ्यात टचकन पाणी तरारतं…..असू दे.
भावनांना आवर घालणं आणि खुदको सम्हालो..यात जिंदगी गेली..आता नको वाटतं.
ज्या त्या वेळेला भावना व्यक्त झालेल्या बऱ्या.
आणि आता शेवटचा मुद्दा सांगतो बघा.मला लिहायला सगळ्यात अवघड वाटला, म्हणून शेवटी ठेवला.
अहंभाव सगळ्यात आधी उफाळून येतो. त्याला सगळ्यात आधी काळनदीच्या पात्रात सोडून द्यायला शिकलो…हे गंगार्पण आधीच व्हायला हवं होतं , जीवन सुधार केंद्रात त्याचा नंबर सगळ्यात शेवटी लागला. अहंभाव बाळगत आणि त्याला आंजारतगोंजारत बसलो तर एकटा पडत जाईन. साधा सरळ माणूस होऊन सगळ्यांना धरून राहिलो तर कसल्याही प्रसंगात, कुठल्याही संकटात,कसोटीच्या क्षणी माझी माणसं मला सुखरूप पार नेतील हे मी हर प्रसंगी मलाच सांगत असतो….उशिरा का होईना, मला माझ्यापुरतं समजलेलं शहाणपण म्हणायचं.
आजचा दिवस शेवटचा म्हणत विवेकानं वागलो तर येणारा प्रत्येक दिवस आजच्यासारखाच, किंवा आजच्यापेक्षा अधिक मोलाचा, हा मंत्र साधा आणि सोपा.
मला आणि इतरांना आनंदी ठेवायचं. बास!
हे पत्र वाचून मला वाटलं, एकदा तुमच्याही नजरेखालून ही जाउदे.तात्पर्य- नितीमत्ता
Madhyam Network / Madhyam News
#माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी