घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे..!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Pankaja-munde-2.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Pankaja-munde-2.png)
२६ जुलै भाजपाच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांचा वाढदिवस. काल आमच्या मित्राने पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी जाहिरात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या लगबग सुरु झाली यासाठी फोन केला, बोलता बोलता त्यांनी जुना किस्सा सांगितला आणि तेवढ्यात पंकजा मुंडे यांचा जीवनपट सरर्कन माझ्या डोळ्यासमोरुन सरकत गेला. दिवस कसे झपाट्याने निघून जातात याची जाणीव झाली!
लोकनेते गोपिनाथ मुंडे हे जेंव्हा परळी बसस्थानकासमोरील परमार यांच्या बिल्डींगमध्ये वरच्या मजल्यावरील किरायाच्या घरात रहात होते, तेंव्हा अशोकराव देशमुख, अशोकराव गुंजाळ यांच्या सोबत मी त्यांच्या घरी गेल्याची माझी आठवण आज ही ताजी आहे. तेंव्हा पंकजा मुंडे यांचे प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण सुरु असावे.
गोपीनाथ मुंडेसाहेबांची जिल्हा परिषद सदस्यांपासुन ते आमदार, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतची वाढती कमान मला जवळून पहायला मिळाली आहे. जिल्हा परिषद सदस्य, रेणापुर विधान सभा मतदार संघाचे आमदार, विरोधीपक्षनेते, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री ही सर्व पदे उपभोगतांना मुंडेसाहेबांचा एक चाहता हितचिंतक म्हणून मी त्यांना अनेक वेळा अनेक ठिकाणी भेटलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भेटीत साहेबांनी मला सन्मान ही दिला आहे. मुंडे साहेबांबध्दल असणारा आदर, सन्मान साहाजिकच पुढे भाजपाच्या राष्ट्रीय सचीव पंकजा, आ. धनंजय आणि खा. डॉ. प्रितम या राजकारणात वावरणाऱ्या मुंडे परिवारातील तिघांबध्दल आज ही आहे, आणि पुढे ही राहणारच आहे.
पंकजा मुंडे यांनी बीएस्सी पदवी घेऊन एमबीए चे शिक्षण पुर्ण केले आणि भाजपा युवा मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यां म्हणून त्या राजकारणात सक्रिय झाल्या. वास्तविकपणे त्यांचे एमबीए चे शिक्षण पुर्ण होईपर्यंत त्या राजकारणात येतील अशी चर्चा मुंडे परीवारात अथवा रेणापुर विधानसभा मतदारसंघात तेंव्हा कुठे ही नव्हती. पण पंकजा मुंडे या जादुच्या कांडी प्रमाणे राजकारणात आल्या आणि सक्रिय ही झाल्या.
२००८ साठी महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या पुर्नरचनेचे काम सुरु झाले. रेणापुर आणि केज विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांची मोडतोड करीत परळी विधानसभा हा स्वतंत्र मतदारसंघ २००९ च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात अस्तित्वात आला. २००९ पर्यंत राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांनी राज्याचे राजकारण करीत दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करण्याचे जाहीर केले. आता राज्याच्या राजकारणात गोपीनाथराव मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून गेली अनेक वर्षे त्यांची सावली बनून काम पाहणा-या आणि अनेक आघाड्यांवर यशस्वीपणे काम करणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. २००९ च्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत धनंजय मुंडे हेच उमेदवार राहतील असा राजकीय अंदाज बाहेर येवू लागला. पण प्रत्यक्षात झाले वेगळेच! परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून जनतेचा फारसा संबंध न आलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली. २००९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे या आपले नजीकचे प्रतिस्पर्धी प्रा.टी.पी.मुंडे यांचा पराभव करुन विजयी झाल्या.
मध्यंतरीच्या काळात मुंडे कुटुंबात बरीच स्थित्यंतरे झाली. धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांना विधान परीषदेवर घेत आमदार ही केले. पुढे २०१४ ची निवडणुक थेट पंकजा मुंडे (भाजपा) आणि धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) यांच्या मध्ये झाली. या निवडणुकीत पंकजा यांनी धनंजय यांचा पराभव केला. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत बहीण-भावातील संघर्षाने अनेक टोकाची पावले उचलली. यात दोन्ही पक्षांच्या वरीष्ठ मंडळींनी दोघांनाही राजकीय शक्ती दिली. पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री तर धनंजय मुंडे हे विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते झाले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुक ही पुन्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मधील सरळ लढतीने झाली. या निवडणुकीत मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करीत त्यांना सक्रिय राजकारणापासून दूर केले. २०१९ च्या मंत्रीमंडळात धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री झाले तर पंकजा मुंडे या सक्रिय राजकारणापासून ब-याच दुर गेल्या. विशेष म्हणजे पक्षानेही त्यांना राजकीय प्रवाहापासून दुर ठेवले. अडीच वर्षे धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना पंकजा मुंडे यांच्या अनेक पावले पुढे जाऊन काम केले. आणि परळी विधानसभा मतदारसंघात आपल्या शिवाय पर्यायच असू नये अशी व्युह रचना आखली. सत्ता संघर्षाच्या काळात आता धनंजय मुंडे हेही कॅबिनेट मंत्री मंडळातुन बाहेर आले आहेत. आता दोघांनाही २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे.
![Pankaja Munde](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Pankaja-munde-1-1-1024x576.png)
![Pankaja Munde](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Pankaja-munde-1-1-1024x576.png)
पंकजा मुंडे या सत्तेपासून सतत अडीच वर्षे बाहेर असल्यामुळे त्यांना परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी भरपुर तयारी करावी लागणार आहे. मतदार संघातील विस्कटलेली हजारो घरटी त्यांना पुन्हा नव्याने बांधावी लागणार आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने झालेले सत्तांतर हे पंकजा यांच्या राजकारणाला बळकटी देणारे ठरणार आहे. महाविकास आघाडी चे सरकार जर सलग पाच वर्षे टीकले असते तर परळी मतदारसंघात पुन्हा पंकजा यांचा निभाव लागणे अशक्य असल्याची चर्चा परळी विधानसभा मतदार संघासह बीड जिल्ह्यात सुरु झाली होती. अशा वेळी सत्तांतरामुळे निर्माण झालेल्या नव्या राजकीय खेळी चा नवा डाव सुरु करण्यापुर्वी परळी मतदारसंघातील आपली विस्कटलेली घरटी पुन्हा नव्या ताकदीने बांधण्याची जबाबदारी पंकजा यांना समर्थपणे पेलावी लागणार आहे. आपल्या सोबत असणारे, आपल्याला सोडून गेलेल्या सोबत्यांची मोट पुन्हा एकदा बांधावी लागणार आहे. मागील कालावधीत काम करतांना ज्या चुका झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
पंकजा यांच्या सुदैवाने जर नव्याने होणा-या मंत्री मंडळात काम करण्याची संधी मिळालीच तर मागच्या मंत्रीमंडळात काम करतांना ज्या चुकांचा, ज्या चुकीच्या निर्णयाचा शिक्का त्यांच्या माथी बसला तशा चुकांचा, चुकीच्या निरृणयाचा शिक्का पुन्हा माथी न बसण्यासाठी ही पंकजा यांना सावधतेने काम करावे लागणार आहे. सत्ता असताना आणि सत्ता नसतांनाचा जो फरक मुंडे साहेबाना जाणवला आणि त्यांनी जो अनुभवला त्याचे आत्मपरीक्षण करीत त्यांनी पुढे काम केले त्यामुळेच ते लोकनेते म्हणाले जात. अशीच सजग जाणीव आपल्या मध्ये सुद्धा निर्माण होवो. ज्याप्रमाणे मुंडे साहेबांनी विसकटलेली हजारो घरटी पुन्हा नव्याने बांधली त्याच प्रमाणे आपल्याला सुद्धा घरटी पुन्हा नव्याने बांधण्याची शक्ती ईश्वर आपल्याला देवो..
ही वाढदिवसानिमित्त सदिच्छा!
यासर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांची गझल
घर नव्याने पुन्हा बांधले पाहीजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
कालचा पावसाळा जरी जाचला
तु धीराने इथे नांदले पाहीजे
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
रोप लावायचे या अटीवर पुन्हा
भर उन्हाळ्यात ही पोसले पाहिजे
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
फुल उमलायला माळ रानी गड्या
अत्तराचे झरे जागले पाहीजे
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
त्या चुका टाळता यायला हव्या
मलम धागे पुन्हा सांधले पाहिजे
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
तु पुढाकार घे मीच का नेहमी
तुच माझे सुखा जागले पाहिजे
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
घर पुन्हा मुक होणार नाही कधी
मी तुला तु मला भांडले पाहिजे
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
लोक येतील धावून शब्दांवरी
वागणे आपले चांगले पाहिजे
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे.
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे…