अगदी लहान म्हणजे तिसरी किंवा चौथीच्या वर्गात असतानाची एक गोष्ट मला आठवते. त्यावेळच्या घटना खरेतर खूप ठळकपणे आठवत नाहीत. पण ही घटना मला आठवते. बाबुजी पाँडिचेरीला जाऊन आल्यानंतर दर गुरुवारी माताजी व श्री अरविंदांच्या फोटो समोर बसून ध्यान करायचे. ध्यान म्हणजे काय हे न कळणारे ते माझे वय होते. पण बाबुजींमुळे मनात मां व श्री अरविंदांच्या व्यक्तीमत्वाबद्दल एक कुतूहल निश्चितच निर्माण झाले. नविन घर बांधल्या नंतर एक दिवस आमच्या घराला नाव काय द्यायचे याबद्दल चर्चा चालू होती. घराला ‘अभिप्सा’ (म्हणजे मनापासून केलेली तीव्र इच्छा) हे नाव द्यायचे ठरले. कुठल्याही कार्याला जाताना मा-अरविन्दांसमोर हात जोडून प्रार्थना केल्याशिवाय माझे बाबूजी (प्रा. रामेश्वर राठी) ते काम करत नसत. नेहमीप्रमाणे त्यादिवशी ते ध्यान करायला बसले आणि उठल्यावर त्यांनी सांगितले की, घराला ‘समर्पण’ नाव द्यायचे . अभिप्सा नाव मनात घेऊन ते बसले होते आणि ‘समर्पण’ हे समर्पक नाव घेऊन ते उठले. तेंव्हापासून नकळत श्री अरविन्दांच्या साहित्याशी, योग साधनेशी जवळीक निर्माण झाली.
बहीणाबाई म्हणतात, “मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोण? उंडारल उंडारल जसं वारा वाहादन ׀” खरेच आपल्या मनाची अवस्था ही वाहत्या वाऱ्यासारखी असते. ही अवस्था मनाला सतत अस्थिर बनवते, मन एका ठिकाणाहून दुसरीकडे उंडारत राहते. सतत काही ना काही अपेक्षा बाळगत असते. वाऱ्याला जसे नियंत्रणात ठेवणे अवघड असते तसे मनाला, मनात असणाऱ्या अपेक्षांना नियंत्रणात ठेवणे हे सर्व सामान्यपणे अवघड असते. हे सत्य जवळ जवळ सर्वच संतांनी लिहून ठेवले आहे. मनाला जर स्थिर ठेवायचे, त्याला शांत बनवायचे असेल तर समर्पण आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वर देखील त्यांच्या अभंगात म्हणतात,
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला ׀
मनाचा गुंता म्हणजे मनात चाललेली विचारांची खळबळ ही जणू शेला गुंफल्यासारखा आहे, अशा वेळी हा शेलाच विठ्ठल रुखमाईला अर्पण केला पाहिजे तरच ही खळबळ थांबेल असेच ज्ञानेश्वरांना म्हणायचे आहे. हे अर्पण करणे म्हणजेच समर्पण असते. समर्पण करणे ही प्रक्रिया आपल्याला वाटते तितकी सोपी नाही. आपल्याला एखादी गोष्ट पटलेली असते पण तरीही कित्येकदा आपले मन त्या पटलेल्या गोष्टी करतानाही विचलित असते. विचार आणि जगरहाटी यात ते अडकून पडते. काही वेळा ते आपल्या जुन्या अनुभवांवर अवलंबून असते. एखादी व्यक्ती कधी तरी काही तरी कारणाने आपल्याशी खोटे बोललेली असते, परंतु ती व्यक्ती नंतर खरे बोलली तरी जुन्या अनुभवामुळे आपले मन ती व्यक्ती खरे बोलत आहे याची ग्वाही देत असताना सुद्धा आपण त्याच्या बोललेल्या गोष्टीवर अविश्वास दाखवत राहतो. हे तर एक अगदी साधे उदाहरण मी इथे मांडले आहे, पण आपल्यापैकी प्रत्येक जण अशाच अनेक गोष्टीत दैनंदिन जीवनात अडकलेला असतो.
रोजच्या व्यवहारात अशा कित्येक गोष्टी घडत असतात. अशा वेळी मनाचा झालेला गुंता हा मनाला त्रास देत असतो. पण जर हा गुंताच देवाच्या स्वाधीन करून आपण एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाची खंत आपल्याला राहणार नाही असे संत ज्ञानेश्वर म्हणत आहेत. अनेकदा आपण सहजच म्हणत असतो ‘ देवाची इच्छा! कदाचित यातूनही आपले काही भलेच होणार असेल म्हणून असे घडले.’ आपण जेंव्हा वरकरणी असे म्हणत असतो तेंव्हा मनातून मात्र आपण निराश असतो किंवा मनात संताप, राग, द्वेष अशा भावना असतात; अशा वेळी जरी वाणीने देवाची इच्छा म्हटले तरी मानाने ते स्वीकारलेले नसते. अशा पद्धतीने एखादी गोष्ट देवाला अर्पण करणे म्हणजे समर्पण असू शकत नाही. म्हणूनच श्री अरविंद म्हणतात, ‘समर्पण करायचे असेल तर त्याग करता यावा लागतो. प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, लोभ, मत्सर या सर्वांचा त्याग हवा; तरच आपली अभिप्सा पूर्ण होऊ शकते. आणि त्यासोबत संपूर्ण समर्पण असेल तरच भगवत कृपा अवतरेल व कार्य करेल.’
आपल्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. अनेकदा आपण कार्य करत असताना श्री अरविंदानी म्हटल्याप्रमाणे बुद्धीमय मनाच्या बळावर चूक किंवा बरोबर असा तराजु लावत असतो. आपल्या या बुद्धिमय मनाच्या बळावर आपण आपल्या इच्छा व वासनांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात आपण बऱ्यापैकी सफलही होत असतो. पण असे करत असताना आपले मन अर्जुनाप्रमाणे कित्येकदा दोलायमान असते. आपण जे करतो आहोत किंवा जे केले आहे ते योग्य कि अयोग्य, त्याचे परिणाम काय होतील अशा विवादात आपण अडकून पडतो. स्वतःशीच चाललेला हा संघर्ष मनाला स्थिरता येऊ देत नाही. अशा वेळी श्री अरविंद म्हणतात तसे दैवी मन आपल्याला मार्गदर्शन करते. दैवी मन आपल्याला या दोलायमान स्थितीतून एका शांत, आनंदी अवस्थेत नेऊन सोडते. या दैवी मनाला जागृत करण्यासाठी साधनेची गरज असते. योग मार्गाची गरज असते.
ही योग साधना कशी करावी यासाठी श्री अरविंद म्हणतात, ‘दैवी शक्ती म्हणजे भगवत कृपा ही अवतरत असते. त्यासाठी गरज असते ती तिच्यापर्यंत पोचण्यासाठी मनाचा संकल्प व अंतरमनातुन केलेला ध्यास. आंतरिक, भौतिक व प्राकृतिक पातळीवर लवचिकता असणे गरजेचे आहे. मनापासून केलेली इच्छा म्हणजेच अभिप्सा हवी. यासोबतच हवे मनापासून केलेले समर्पण. समर्पण संपूर्ण असले पाहिजे, अस्तित्वाची सर्व अंगे त्याने अंकित केली पाहिजेत. तुमचे समर्पण प्राणशक्ती, अंतर्मन व शरीर या सर्व पातळीवर झाले पाहिजे. कोणताही संभ्रम, संशय किंवा क्लृप्ती त्यात दडलेली असेल तर ते समर्पण दैवी शक्ती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाधक ठरेल. तामसिक निष्क्रियता म्हणजे देखील समर्पण नव्हे.’ अनेकदा काही प्रसंगी आपण अलिप्त राहण्याची भूमिका बजावत असतो. पण असे त्या गोष्टीपासून अलिप्त राहताना मनात मात्र शांतता नसेल तर तसे आलीप्त राहणे हे अर्धवटहोईल. जर एखाद्या गोष्टीपासून अलिप्त राहायचे असेल तर मनाची चल-बिचलता कमी होणे गरजेचे आहे. तरच अलिप्त राहण्याची भूमिका ही त्या कार्यासाठी सकारात्मक ठरू शकते. मनात अशांतता ठेवून बाळगलेली आलीप्तता म्हणजेच तामसिक निष्क्रियता होय. समर्पण संपूर्ण असेल तरच निराशा व अडचणीच्या वेळी सुद्धा आपण आपली श्रद्धा अविचल राखता येते.
योग साधेबद्दल व्यक्त होताना श्री अरविंद म्हणतात, ‘प्रकृतीने आमच्यासाठी शारीरजीवन पक्के विकसित केले आहे; आमचे शारीरजीवन हे प्रकृतीच्या सर्व व्यापाराचे अधिष्ठान, पाया, आणि प्राथमिक साधन आहे; शारीरजीवनानंतर ती आता आमचे मानसिक जीवन विकसित करीत आहे; मानसिक जीवन हे शारीरजीवनाहून श्रेष्ठ असे तिचे क्रीयासाधन आहे.’ श्री अरविंदांनी ‘योग समन्वय’ (synthesis of yoga) या त्यांच्या मार्गदर्शक ग्रंथात अगदी सुरुवातीलाच मानवाचे आध्यात्माशी असलेले नाते समजावून सांगताना शरीराचे जीवनातील स्थान व मनाचे महत्व काय आहे याबद्दल लिहिले आहे. ते पुढे मनाबद्दल म्हणतात, ‘मानवातील मानसिक जीवन हा मानवाचा एक अत्यंत महत्वाचा विशेष आहे. मानवात मन एकच नाही; मने दोन आहेत, नव्हे तीन आहेत; भौतिक आणि नाडीमय मन हे एक मन; दुसरे शुद्ध बुद्धिमय मन; शरीराचे भ्रम, इंद्रियाचे भ्रम हे बुद्धिमय मन ओळखते आणि या भ्रमापासून स्वतः मुक्त होते, स्वतःला मुक्त करते; तिसरे दिव्य, दैवी मन; हे बुद्धीच्या वरती आहे; तार्किक भेदकारक व कल्पक बुद्धीच्या सदोष, अपूर्ण कार्य पद्धतीपासून दिव्य मन स्वतःला मुक्त करते, जशी बुद्धी इंद्रियाच्या भ्रमापासून स्वतःला मुक्त करते.’
कर्मयोगाबद्दल श्री अरविंद म्हणतात, ‘सामान्य मानवी अस्तित्वात आमच्या जीवनाचा तीन चतुर्थांश किंवा अधिक भाग, बहिर्मुख, बहिर्गामी कृतींचा असतो, हे उघड आहे. त्यामुळे पूर्ण जीवनाचा नमुना निर्माण व्हायचा तर मानवाची कृतीची बाह्य बाजू आणि विचार-भावनेची आतील बाजू यात फारकत असता कामा नये. त्यांच्या आंतरिक व बाह्य जीवनात मेळ असला पाहिजे. ही दोन्ही जीवने पूर्ण होऊन सुसंवादी, एकरूप झालेली आणि दिव्य तत्वानुसार रुपांतरीत झालेली असली पाहिजेत. कर्मयोग म्हणजेच, आमची इच्छा आणि कर्म यात आमचा ईश्वराशी योग घडणे, एक्य होणे हे पूर्ण योगाचे महत्वाचे अंग आहे.’ आपण रोजच्या जीवनात असे एक्य आपल्याकडून अनुभवले जात नाही. किंबहुना आपण अशा रीतीचे एकत्व आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्याही पार पलीकडे असतो. त्यामुळेच कर्म व कर्तव्ये करत जीवन जगताना देखील एक अपूर्णता सातत्याने जाणवत राहते.
रोजच्या जीवनात प्रत्येकाला शांत व आनंदी जीवन जगण्याची इच्छा असते पण स्वतःच्या साधनेसाठी वेळ काढून चिंतन करण्यासाठी वेळ दिला जात नाही. आयुष्याबद्दल चिंतन केले तरच वाचन व एकाग्रता होऊ शकते. आणि एकाग्रता झाली तर साधना घडू शकते. साधना झाली तर आपण अंतर-बाह्य सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतो. अंतर बाह्य सुसंवादाच्याही पुढे जाऊन श्री अरविंद म्हणतात, ‘पुर्णयोगात केवळ ज्ञानाने आणि भावनेने ईश्वराशी आमचे ऐक्य होऊन भागत नाही. आमचा विचार आणि भावना यांचे त्या परिवर्तनाला अनुरूप असे परिवर्तन घडून आले नाही, तर आमची कार्यसिद्धी, अपुरी, विकलांग, पंगु म्हणावी लागेल.’ त्यासाठी आम्हा सर्वांना अंतर बाह्य समर्पण करावे लागेल. तरच पुर्णयोग साध्य होईल.
या बद्दल अधिक विश्लेषण करताना श्री अरविंद सांगतात, ‘मानवी अहंकार आणि असुर यांना ज्यांचे अत्यंत जोरदार आकर्षण असते – त्या तीन शक्ती म्हणजे सत्ता, धन व कामवासना होय.’ साधकाला या सर्वांपासून अलिप्त होता आले पाहिजे. अंतर्मनाने एकाग्र होण्यासाठी साधकाला
साधना करायची असते त्यात पुढील गोष्टींचा समावेश असायला पाहिजे –
- तुमची चेतना हृदयात जागृत केली पाहिजे आणि तुमच्या मनातील संकल्पनेवर, प्रतिमेवर किंवा माताजींच्या नावावर, यापैकी जे तुम्हाला सहज शक्य आहे त्यावर मन केंद्रित केले पाहिजे.
- हृदयात एकाग्र होण्याच्या या प्रक्रियेतून क्रमाक्रमाने वाढत व प्रगल्भ होत जाणारी मनाची शांतता निर्माण होणे.
- माताजींच्या हृदयातील अस्तित्वासाठी आणि तुमचे मन, जीवन व कृतीवर माताजींचे अधिष्ठान असावे यासाठी अभिप्सा बाळगणे. परंतु चित्त स्थिर करण्यासाठी आणि आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी सर्व प्रथम मनाच्या शुद्धीकरणाची व मन प्रांजळ बनवण्याची आवश्यकता असते.
अशा रीतीने साधना करण्यासाठी गरज असते ती मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच नाही तर शरीरातील पेशीन्-पेशी यामध्ये सुद्धा तुम्ही सचेतन असले पाहिजे. आपण बऱ्याचदा अशा सचेतन अवस्थेत जाण्याइतके तयार नसतो. उत्तम विचार, ज्ञान असते. परंतु आपले मन चैतन्य शक्ती काम करेल कि नाही याबद्दल साशंक असते. याचाच अर्थ आपण मन, आत्मा, हृदय, या सर्व पातळीवर समर्पण करत नाहीत. सर्व सामान्य व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या लहान मोठ्या संकटांना घाबरत असते. कधी कधी ही भीती अनावर होते.
अशा वेळी आपल्याला श्री अरविंद त्यांच्या मार्गदर्शनातून वेळोवेळी या भीतीवर मात करण्यासाठी मदत करतात. माताजी देखील यासाठी अतिशय सहज शब्दात सांगतात, ‘माझे संपूर्ण जीवन हेच माझी देवाला केलेली प्रार्थना बनली पाहिजे.’आपण आपले जीवन जगताना, ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्याकडे प्रार्थना म्हणून त्याकडे पहिले तर आपोआपच मन, आत्मा, हृदय, प्राण व शरीरातील पेशीन्-पेशी सचेतन अवस्थेत समर्पण करेल व आपला कर्मयोग सुसंवादी व ईश्वराशी एक्य साधणारा होईल. अर्थात कर्मयोग पूर्ण योगाचा एक अंग बनेल, व पूर्ण योगाच्या दिशने वाटचाल होईल.
श्री अरविंदांच्या पुर्णयोगाची शिकवण नकळतच लहानपणापासून मनात रुजत गेली आहे. त्या दिशेने वाटचाल होत आहे. ही वाटचालच जीवन आनंदमयी, सत्यमयी, चैतन्यमयी बनवत आहे. श्री अरविंदांच्या 150 व्या जयंती निमित्त हा योगमार्ग अनेकांपर्यंत पोहोचावा व अनेकांना याची अनुभूती यावी हीच मनोमन इच्छा आहे. कारण श्री अरविंद म्हणतात, ‘जर दैवी स्पर्श असेल तर सर्व कार्य सिद्धीस जातात.’
डॉ. शुभदा लोहिया अंबाजोगाई येथील प्रतिथयश डॉक्टर आहेत. मेडिसीन विषयात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुर्ण केले आहे. “सद्भावना क्लिनिक” या नावाचे त्यांचे स्वतः चे रुग्णालय आहे. वैद्यकीय सेवे सोबतच रुग्णालयात आलेल्या अनुभवावर आणि समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवरील त्यांचे लिखाण वाचणीय असते. त्यांची संवेदनशील लेखनाची शैली अनेकांना भावली आहे. वैद्यकीय सेवा, लेखन या सोबतच पर्यावरण संवर्धन, प्लॅस्टिक मुक्ती, वृक्ष लागवड आणि पर्यटन हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत.
श्री अरविंद केंद्र, औरंगाबाद सौजन्य: वेदांतश्री: – महायोगी श्री अरविंद विशेषांक, सार्धशती जयंती वर्ष 2022