प्रादेशिक बातम्या

निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य : मुख्य निवडणूक आयुक्त

निवडणूक साहित्यांचे वाटप सुरु; सुरक्षितेसाठी कार्यप्रणाली,राष्ट्रपती निवडणुकीसाठी आयोगाकडून निरीक्षकाची नियुक्ती

मुंबई / राष्ट्रपती निवडणूक २०२२ येत्या १८ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार असून भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक सामुग्रीचे वाटप सुरू केले आहे. नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या निगराणीखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ही सामुग्री निर्धारित वेळेत पाठवण्याची प्रक्रिया आज आणि उद्या असे दोन दिवसात पार पाडली जात आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाचे सहसंचालक (माध्यमे) यांनी दिली. निवडणूक प्रक्रियांची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य असल्याचे गौरवोद्गार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काढले.

विविध राज्यातून आलेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, सर्व निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडून कोणत्याही त्रुटीविना वेळोवेळी निवडणूक सामुग्री पाठवणे आणि निवडणूक घेणे, हे निवडणूक आयोगाचे वैशिष्ट्य आहे. सुनिश्चित सूचनाप्रणाली, सुविहीत प्रमाणित कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करुनच प्रत्येक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागते आणि ते साध्य करून भारत निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची एक सुस्थापित पद्धती विकसित केलेली आहे. सर्व कार्यपद्धतींसह मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून निवडणूकविषयक सामुग्री आपापल्या राज्यात न्यावी. तसेच मतपेट्यांसह मत पत्रिका आदी सामुग्री भांडारात ठेवतानाही दक्ष राहून मार्गदर्शक तत्वे आणि कार्यपद्धती अमलात आणावी, अशा सूचना श्री. कुमार यांनी दिल्या.

निवडणूकविषयक सामुग्री दिल्ली प्रदेशासह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश आणि सर्व विधानसभा सचिवालयांना पाठवण्यात येत आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयातून ही सामुग्री ताब्यात घेणे आयोगाने बंधनकारक केले असून यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश असणे आवश्यक आहे. हे सर्व अधिकारी दिल्लीला पोहोचल्यानंतर विमानतळावर त्यांच्यासाठी मदत कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे भारत निवडणूक आयोगासह नागरी हवाई वाहतूक विभाग, दिल्ली पोलीस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नवी दिल्लीच्या निर्वाचन सदनमध्ये संपूर्ण तपासणीनंतर सुयोग्य सुरक्षा व्यवस्थेसह मतपेट्यांसह सर्व आवश्यक निवडणूकविषयक सामुग्री सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते. यावेळी दिल्ली पोलिसांची पथके त्यांच्यासमवेत जातात. ही सामुग्री ताब्यात घेतल्यावर त्याच दिवशी हे सर्व सहायक निवडणूक अधिकारी त्यांच्या त्यांच्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पोहोचतात. मतपेट्या स्वतंत्र हवाई तिकिटावर विमानातील पहिल्या रांगेत अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक निगराणीखाली नेल्या जातात.

राजधानीच्या ठिकाणी हे अधिकारी मतपेट्यांसह पोहोचल्यानंतर ती संपूर्णपणे साफसफाईसह निर्जंतुक केलेल्या आणि सीलबंद करण्याची व्यवस्था असलेल्या स्ट्रॉंगरूम्समध्ये व्हिडियो चित्रीकरणाच्या देखरेखीत ती ठेवली जाते. यासह राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या मतपत्रिकाही या ठिकाणी ठेवल्या जातात. निवडणूक झाल्यानंतर सीलबंद मतपेट्या इतर सामुग्रीसह लगेचच उपलब्ध असलेल्या फ्लाइटने (विमानाने) या निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे (राज्यसभा सचिवालयाकडे) पाठविण्यात येतील. पेट्या आणि इतर कागदपत्रे वैयक्तिक निगराणीखालीच नेण्यात येणार असून त्या हवाईप्रवासातही नजरेआड होणार नाहीत, याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने यापूर्वीच विशिष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून निवडणूक घेण्याच्या दृष्टीने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्व बाबींची माहिती देण्यासाठी १३ जून २०२२ रोजी विज्ञान भवनमध्ये सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वतंत्र कार्यशाळाही घेण्यात आली. याशिवाय आयोगाने ३७ निरीक्षक नेमले असून मतदानासह मतमोजणी प्रक्रियेची व्यवस्था तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मोजणी सुविहीतपणे होण्याच्या दृष्टीने ११ जुलै २०२२ रोजी या निरीक्षकांची बैठक घेण्यात आली होती. केंद्र सरकारचे सहसचिव किंवा अतिरिक्त सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून मतदान होत असलेल्या तीसही ठिकाणी प्रत्येकी एक निरीक्षक नेमला असून संसद भवनमध्ये २ निरीक्षक नेमण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीची सामुग्री नेताना सुरक्षा व्यवस्था तसेच इतर बाबींचा आढावा घेऊन निवडणूक खुल्या वातावरणात आणि निष्पक्षपणे व्हावी, हे निरीक्षक सुनिश्चित करतील. संसद भवनात नेमण्यात आलेले निरीक्षक २१ जुलै २०२२ रोजी होणाऱ्या मतमोजणीवरही देखरेख करतील, अशी माहिती सहसंचालक (माध्यमे) यांनी दिली आहे.

राष्ट्रपती निवडणूक 2022 ; महाराष्ट्रासाठीची मतपेटी स्वीकारुन अधिकाऱ्यांचे पथक मुंबईकडे रवाना

भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी मतपेटी व इतर साहित्यांचे नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे वाटप सुरु केले आहे. महाराष्ट्रासाठीची मतपेटी व इतर साहित्य राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी स्वीकारले. यावेळी उपमुख्य निवडणूक अधिकारी शोभा बोरकर, विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव सुहास नलावडे यांच्या उपस्थितीत ही सामुग्री स्वीकारण्यात आली असून अधिकाऱ्यांचे हे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker