अंबासाखर च्या मील व कॅरीयर जोडणीचे काम अंतिम टप्प्यात; गळीत हंगामास दिपावलीत होणार सुरुवात

चेअरमन रमेश आडसकर व व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील यांची माहिती
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या मील व कॅरीयर जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून यावर्षीचा गळीत हंगाम दिपावली पर्यन्त सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अंबासाखरचे चेअरमन रमेश आडसकर व व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील यांनी दिली.
बीड जिल्ह्यात सर्वात जुना म्हणून ओळखला जाणा-या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम याही वर्षी जोरदारपणे सुरू करण्यासाठी चेअरमन रमेश आडसकर, व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील यांनी शड्डू ठोकला असून राजकारणाच्या परीघाबाहेर जावून मैत्रीच्या संबंधाचा धागा पकडत हे दोघेही अंबासाखरच्या पुर्व उभारणीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा मराठवाड्यातील सर्वात जुना कारखाना म्हणून ओळखल्या जातो. १९६९ साली या विभागातील सहकार महर्षी डी. एन. पाटील साहेब यांनी या कारखान्याची मुहूर्त मेढ रोवली. त्याकाळी उपलब्ध असलेल्या उच्च तंत्रज्ञानानी बनवलेल्या अत्यंत चांगल्या दर्जाच्या मशनरी त्यांनी त्याकाळी बसवल्या. सलग दोन टर्म अंबासाखरचे नेतृत्व करणा-या डी. एन. पाटील यांच्या हातातुन हा कारखाना निसटला आणि पुढे या कारखान्याची ओळख बाबुराव आडसकरांचा कारखाना अशी झाली. बाबुराव आडसकर, त्यांच्या नंतर ऍड. मेघराज आडसकर आणि आता रमेश आडसकर असे एकाच घरातील तीन चेअरमन या कारखान्याला लाभले. आज या कारखान्याचे नेतृत्व चेअरमन रमेश आडसकर आणि व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील हे करीत आहेत.
ग्रामीण राजकारणात आजही साखर कारखानदारीला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक नाडीचा थेट संबंध साखर कारखान्यांशी जोडला जात असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एखाद्या आमदारा एवढेच महत्त्व कारखान्याच्या चेअरमनला द्दावे लागते ही वस्तुस्थिती आहे.

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा तसा वय झालेला कारखाना आहे. १९६९ साली या कारखान्याची उभारणी झाली आहे. त्यानंतर उभारणी झालेले मराठवाड्यातील कितीतरी साखर कारखाना आज मृतावस्थेत आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाच्या वतीने अर्थिक सहकार्य घेत अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना चालविण्याचा धाडसी प्रयत्न रमेश आडसकर आणि व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील हे करीत आहेत.
यावर्षी ही अंबासाखरचा गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून राजकीय परीघाच्या बाहेर जाऊन गेली अनेक वर्षांपासून असलेल्या मैत्रीचा धागा पकडत त्यांनी कारखाना सुरु करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत.
अंबासाखरचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठीच्या प्रत्यक्ष तयारीला तशी गेली दोन महिनाभरापासूनच सुरुवात झाली आहे. या कारखान्यातील कमकुवत अवस्थेत उभ्या असलेल्या अनेक मशनरीच्या जागेवर आज नवीन मशनरी उभ्या करण्यात आल्या आहेत. तीन ही बॉयलरचे नुतनीकरण करण्यात आले असून ऊसाचा रस, साखर होण्यापूर्वी गरम असलेला पाक नेणारी पाइपलाइन मध्ये ही अनेक ठिकाणी बदल करण्यात आले आहेत.
कारखाना सुरु करण्यासाठी यावर्षी राज्य शासनाने ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कारखान्याचे अत्यावश्यक देणे सारुन शिल्लक राहिलेल्या पैशातुन कारखाना दुरुस्ती चे काम सुरू करण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

अंबासाखरचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी चेअरमन रमेश आडसकर व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली २०० कामगार रात्रंदिवस दोन पाळीत काम करीत असून कारखान्याच्या निकामी मिशनरी काढून तेथे नवीन मशनरी बसवण्याचे व काही मिशनरी नव्याने दुरुस्त करुन त्या पुर्ण क्षमतेने चालतील यांची पाहणी करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.
अंबा साखर मधील रीटन बगास कॅरीयर या यंत्रणेची सुरुवात नुकतीच व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी चेअरमन रमेश आडसकर, कार्यकारी संचालक मरकड डी. एन. , व्यवस्थापक साखरे, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
अंबासाखरच्या मील व कॅरीयर जोडणी व इतर काम लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी चेअरमन रमेश आडसकर, व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील, कार्यकारी संचालक मरकड हे कारखाना परीसरात तळ ठोकून असून दररोज सायंकाळी कामकाजाच्या आढावा बैठका घेऊन गळीत हंगाम दिपावली पर्यंत सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.
अंबासाखरचा गळीत हंगाम यावर्षी सुरु होणार असल्यामुळे या विभागातील ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये व कारखाना परिसरातील छोट्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.