महाराष्ट्र
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर विभाग पुर्ववत सुरु करा

आ. नमिता मुंदडा यांनी केली विधीमंडळाच्या अधिवेशनात मागणी
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर विभाग पुर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.
राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सध्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न अधिवेशनात विधिमंडळ सभापतींच्या समोर मांडुन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असतात.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय हे आशिया खंडातील एकमेव ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे. या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माध्यमातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत असते. याच उद्देशाने या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात या विभागातील कॅन्सर रोगाने ग्रस्त झालेले अनेक रुग्ण आढळून येत असल्यामुळे सुमारे पंचेवीस वर्षांपूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागात कोट्यवधी रुपये खर्चून स्वतंत्र कॅन्सर विभाग निर्माण करण्यात येवून या विभागात रोग निदान आणि उपचारांची सुरुवात करण्यात आली होती. मात्र हा विभाग कालांतराने पुरेसे तंत्रज्ञ आणि अनुभवी तज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने बंद करण्यात आला.

