महाराष्ट्र
“माध्यम” ला झाली तीन वर्षे! यावर्षी दोन नवे उपक्रम सुरु करणार

१० जुलै २०२२
नमस्कार मित्रांनो…!
१० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशी चे पवित्र मुहुर्त साधून मी “माध्यम न्यूज.कॉम” www.madhyamnews.com च्या माध्यमातून डिजिटल मेडिया मध्ये प्रवेश केला. स्वतः च्या मालकीचं आणि हक्काचं एक स्वतंत्र पेज एक असावं हा विशिष्ट दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मी हे पेज सुरु केले. कसल्याही प्रकारच अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण न घेता हे पेज सुरु केल्यामुळे सुरुवातीच्या काळात हे पेज चालवणे, त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी समजावून घेवून पुढे चालणे असा माझा प्रवास होता. हा प्रवास सुरु करण्यासाठी आणि सतत दोन वर्षे तो सुखकर चालवण्यासाठी मला माझा मुलगा आशुतोष याचे खुप सहकार्य मार्गदर्शन मिळाले हे या ठिकाणी प्रामाणिकपणे मला नमुद करावे लागेल.
या डिजिटल मेडिया क्षेत्रात येण्यापूर्वी मी जो चाळीस वर्षांचा कार्यकाळ प्रिंट मिडिया मध्ये खर्च केला याचा खुप फायदा मला हे डिजिटल पेज चालवताना झाला. या कालावधीत बातमी, लेख, शोध पत्रकारिता, एखाद्या बातमीच्या मुळापर्यंत कसे जावे याचा मार्ग शोधण्याची गुरुकिल्ली, पुस्तक परिक्षण, चित्रपट परिक्षण अशा किती तरी विषयावर सहज लेखन करण्याची कला मला अवगत झाली. एवढेच नव्हे तर माझ्या ओघवती व वाचकांच्या थेट -हदयाला भिडणा-या माझ्या लेखन शैलीला वाचकांची मिळत असलेली सतत प्रशंसा यामुळे “मंदिराचे गाव”, “असामान्य” आणि “सहज सुचलं म्हणून” या तीन पुस्तकांचा भव्यदिव्य प्रकाशन सोहळा राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत मला आपल्या सर्वांच्या साक्षीने घेता आला.

