महाराष्ट्र
मारवाडी समाजाला छोटी जात म्हणून हिणवणे शोभते का?

जयपाल लाहोटी यांचा शरद पवार यांना सवाल
शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारानिमित्त परळीत आले असता परळीच्या माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांचे नाव घेत शरद पवारांनी त्या छोट्या जातीतील असल्याचा उल्लेख करत व्यवसाय, उद्योग-धंदे करणाऱ्या माहेश्वरी – मारवाडी समाजाचा अपमान केला असून, व्यवसाय व उद्योगधंदे करून आपला उदरनिर्वाह करत सामाजिक प्रतिष्ठा जपणाऱ्या मारवाडी समाजाला छोटी जात म्हणून हिणवणे पवार साहेब तुम्हाला शोभते का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा परळीतील व्यावसायिक जयपाल लाहोटी यांनी शरद पवारांना उपस्थित केला आहे.

याआधी देखील लोकसभा निवडणुकीमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत संताप व्यक्त करताना शरद पवारांनी धनंजय मुंडे हे हलक्या जातीतील व छोट्या कुटुंबातील असल्याचा उल्लेख करत वंजारी समाजाला हिनवले होते.
परळीत प्रचाराला आल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणातून विकासाचे व्हिजन मांडण्याऐवजी आपल्या नातवांच्या वयाच्या असलेल्या तरुण सहकार्यांवर टीका करण्यात धन्यता मानली. परंतु याच वेळी माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणे यांचा उल्लेख करताना जाणीवपूर्वक शरद पवारांनी त्या छोट्या जातीतील आहेत असा उल्लेख केला. त्यावरून आता माहेश्वरी मारवाडी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

