लिंगायत समाज स्मशानभूमीचा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्या दरबारात

शंकर बुरांडे यांनी मांडली समाजाची व्यथा
गेली अनेक वर्षांपासून शालिंगायत समाज स्मशानभूमीचा प्रश्न शासन स्तरावर रेंगाळत पडला असून यामुळे लिंगायत समाजातील मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार कुठे करावेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्नी आता जिल्हाधिकारी यांच्या जनता दरबारात लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त नायब तहसीलदार शंकर बुरांडे यांनी समाजाची व्यथा मांडली आहे.
बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य नागरिकांचे प्रश्न एकुण ते सोडवण्यासाठी या जनता दरबारात प्रयत्न करण्यात येतात. अंबाजोगाई येथील लिंगायत समाजाची स्मशानभूमी ही संकलेश्वर मंदीरा लगत आहे. राज्य शासनाने हे संकलेश्वर मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषीत केले असून मंदिराच्या बाजुची दोन एकर जमीन ही संरक्षित स्मारकासाठी ताब्यात घेतली आहे.शिवाय या जमनीत पुरातत्व विभागाने उत्खननाचे काम सुरु केले आहे.
सदरील उत्खननात लिंगायत समाज स्मशानभूमीची एक एकर एवढी जागा येत असून या उत्खननात लिंगायत समाजांच्या पुर्वजांच्या प्रेताची विटंबना होण्याची भिंती समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय संरक्षित स्मारक नावाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या दोन एकर जागेत अंत्यविधी करण्यास मज्जाव करण्यात येत आहेत. त्यामुळे लिंगियत/जंगम समाजातील मृत व्यक्ती वर अंत्यविधी करण्यास जागाच उपलब्ध होत नाही. असे समाजाच्या वतीने शंकर बुरांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या संदर्भात लिंगायत समाजांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, अंबाजोगाई येथील लिंगायत समाजाच्या नागरीकांना दफन करण्यासाठी सन २००६ साली शासनाने ८० आर (२ एक्कर) जमीन संपादीत करुन दिली होती.
सदरील ८० आर (२ एक्कर) जमीनीत उत्खनन करण्याचे निमीत्ताने पुरातत्व विभाग तेथे अंत्यविधी करण्यास मज्जाव करीत आहे.
त्यामुळे नविन जागेचा संपादनाचा प्रस्ताव सादर केला असुन सध्या न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे समाजाच्या व्यक्तीस दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही.
सर्वे नंबर ७३७ अंबाजोगाई मध्ये पुर्वी १ एक्कर जमीन समाजासाठी पारंपारीक वहीवाटीची स्मशानभुमी होती. परंतु सदरील जमीन शासनाने सिलींग कायद्या अन्वये वाटप केली असल्याने तेथे जमीन धारक अंत्यविधी करण्यास मज्जाव करीत आहे.अशा प्रकारे अडचणी असल्यामुळे सद्या अंत्यविधी करण्यास जमीन उपलब्ध नाही.
अंबाजोगाई येथे शासकीय जमीन भरपुर आहे परंतु ती शहरालगत शिल्लक नाही व खडकाळ व अतिक्रमीत आहे.
कृपया अंबाजोगाई येथील लिंगायत/जंगम समाजाच्या नागरीकांना अत्यंविधी करण्यास तात्काळ जमीन उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी समस्त लिंगायत/जंगम समाज, अंबाजोगाई यांनी या निवेदनात केली आहे.