केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या मतदारसंघात बहुजण विकास वंचित आघाडीचे उमेदवार सचीन चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा न करता भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्यामुळे संतप्त झालेल्या वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वंचित चे उमेदवार सचीन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासून चाबकाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तोंडाला काळे फासून केली चाबकाने मारहाण
महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचत आहेत. सर्वच मतदारसंघातील प्रचार आता अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. अशा परिस्थितीत केज विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत वंचित आघाडीचे उमेदवार सचीन चव्हाण यांनी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा न करताच आपला पाठिंबा भाजपा व मित्र पक्षाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ही माहिती वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांना समजातच त्यांनी वंचित आघाडीचे कार्यकर्ते सोबत घेऊन सचीन चव्हाण यांना बोलावून घेत त्यांच्या तोंडाला काळे फासले एवढेच नव्हे तर त्यांना चाबकाने मारहाण ही केली आहे. या संबंधीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून या संबंधीची बातमी एबीपी माझा या वाहिनीवर दाखवण्यात ही आली आहे.
वेगवेगळ्या उपद्व्यापामुळे सचीन चव्हाण
असतात नेहमी चर्चेत!
केज विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी तर्फे उमेदवारी देण्यात आलेले उमेदवार सचीन चव्हाण हे या मतदारसंघात वेगवेगळे उपद्व्याप करीत असल्यामुळे अधुनमधून सतत चर्चेत असतात. आता निवडणुक प्रचार अंतीम टप्प्यात पोहोचला असतांनाच वंचित चे उमेदवार सचीन चव्हाण यांनी अचानक आपला पाठिंबा भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांना दिल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासून चाबकाचे फटके खात असल्याचे दिसत असल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
सचीन चव्हाण नॉट रिचेबल!
दरम्यान याबाबत सचीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल सांगत आहे. त्यामुळे या प्रकरणात सचीन चव्हाण यांची नेमकी प्रतिक्रिया समजू शकली नाही.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.