Uncategorized

सर्वंकष लढ्याशिवाय हक्काचे पाणी मिळणार नाही; कॉ. राजन क्षीरसागर

समन्यायी पाणीवाटप हा मराठवाड्याचा अस्तित्वाचा प्रश्न असून रक्तायेवढे महत्त्व आपण पाण्याला दिले पाहिजे. समान पाणी वाटप झाले नाही तर अनेक पिढ्या दुष्काळात होरपळतील असे प्रतिपादन कॉ. राजन क्षीरसागर यांनी केले.
योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित व योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी आयोजित श्री गणेश व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफताना त्यांनी ‘मराठवाड्यातील सिंचन आणि विकास – संधी व आव्हाने‘ या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मा.सय्यद पाशू गुरुजी होते. राजन क्षीरसागर पुढे म्हणाले की, शासनाचे चुकीचे धोरण व कारस्थान यामुळे मराठवाड्याला विकासापासून वंचित ठेऊन गुलामगिरीचे जीवन जगण्यास भाग पाडले जात आहे. धरणाच्या पाण्याचे योग्य नियमन करून समान पाणी वाटप केले पाहिजे व कंत्राटदार जगवणे थांबवले पाहिजे. राजकारण्यांनी देव व धर्माच्या नावावर मत मागायचे थांबवून कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याला द्यावे. राजर्षी शाहू महाराज व अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात पाण्यासाठी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन सामुदायिक शहाणपणावर पाणीवाटप करावे. सध्याचा विकासाचा मार्ग चुकीचा असून विसंगित विकास हा धोक्याचा इशारा आहे. नशेबाज राजकारणासाठी पाणी न वापरता गावखेड्याच्या विकासासाठी ते वापरले पाहिजे. समृद्धी, शक्तिपीठ प्रकल्पातील मार्गात येणारे अनेक कालवे नष्ट केले जात आहेत. स्मार्ट सिटीसाठी ग्रामीण भागातील पाणी व वाळू मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. हे थांबवून संतुलित विकास केला पाहिजे. येत्या काळात पाणी हे आंतरराष्ट्रीय युद्धाचे कारण ठरणार आहे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश सोनवळकर यांनी केले तर आभार प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले. व्याख्यानासाठी संस्थेचे संचालक ,प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,ज्येष्ठ नागरिक ,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button