Uncategorizedमहाराष्ट्र
जयवंती नदी व्हाया योगेश्वरी मंदीर टू तहसील कार्यालय; ।।भाग-२।।

अंबाजोगाई शहरात गेली तीन चार महिन्यांपासून शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जयवंती नदी, माता योगेश्वरी देवी मंदिर विश्वस्त मंडळ या दोन प्रकरणात सतत उलट सुलट चर्चा आणि बातम्या ऐकावयास मिळत आहेत. तरी सुद्धा शहरात राहणाऱ्या जवळपास १ लाख माणसांपैकी अगदी १० टक्के लोकांनी ही या दोन्ही प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने ऐकल्याचे, वाचल्याचे किंवा पाहील्याचे अथवा काही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून येत नाही.
अंबाजोगाई शहर हे तसे चळवळीचे केंद्र आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नासंदर्भात या गावात एखाद्या सामान्य माणसाने प्रामाणिकपणे चळवळ सुरु केली तर गावातील किमान हजार पाचशे लोक तरी त्यांच्या मागे हक्काने आणि हिंमतीने उभा असल्याचे आपण सर्वचजण गेली अनेक वर्षांपासून पहात आहोत. मात्र “चळवळी” च्या ऐवजी “वळवळी” सुरु झाल्या की सामान्य लोक त्यांच्यापासून शेकडो पावलं दुर रहातात. तटस्थपणे त्या प्रकरणाकडे पाहण्याची भुमिका घेतात. मग ही वळवळ करणारी माणसं आपसुकच चर्चेच्या किंवा दखल घेण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडतात.
अंबाजोगाई शहरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेले जयवंती नदी बचाव आंदोलन असो की योगेश्वरी देवी मंदिर विश्वस्त मंडळा संबंधीचा वाद असो ही दोन्ही प्रकरणे आता ऊस गाळून रस काढून टाकलेल्या चोयट्या सारखी अर्थहीन झाली आहेत असे आम्हाला वाटते.
आम्ही किती खरे आहोत हे इतरांना सांगणे म्हणजेच आम्ही खोटे आहोत हा इतरांचा समज दुर करण्यासाठी सांगण्याचाच तो अट्टाहास असतो.
आणि या प्रकरणातील खरे खोटे हे बहुतांशी लोकांना माहीत असल्यामुळे ते अशा वर्षानुवर्षे चघळत असलेल्या प्रकरणात आपला फारसा इंटरेस्ट दाखवत नसावेत.
या दोन्ही प्रकरणाकडे जरा तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न एक पत्रकार म्हणून आणि त्याहून अधिक या गावचा सजग सामान्य नागरिक म्हणून येथे करतो आहे. मुळात या दोन प्रकरणाबाबत सध्या चर्चा चालू आहे त्या दोन्ही प्रकरणांना ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी आहे.

नदीचं आणि मंदिराचं पावित्र्य आपण सर्वच जण जाणतो आहोत. अंबाजोगाई सारख्या प्रचंड मोठा धार्मिक वारसा असलेल्या या गावातच मंदीर आणि नदी या दोन्ही पवित्र स्थळांचे लचके तोडले जात असल्याचे मागील अनेक वर्षांपासून आपण सर्वांनी पाहीले आहे. कारणामे वेगवेगळे असतील पण लचके तोडले गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. दोन्ही प्रकरणात याबाबत फक्त एक-एक च उदाहरण देतो. जयवंती नदीचा प्रवाह बदलून झालेली प्लॉटींग आणि योगेश्वरी मातेच्या पुजा अर्चनेचा खर्च भागविण्यासाठी निजाम सरकारने देवस्थानला दिलेल्या शेकडो एकर जमिनी ढापण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न. या दोन्ही घटना घडून अनेक वर्षे झाली. तक्रारी झाल्या, चौकशा झाल्या दावे प्रतिदावे सुरु आहेत पण अजूनही निश्पक्ष काहीही झाले नाही.
म्हणून “योगेश्वरी मंदीर व्हाया जयवंती नदी टू तहसील कार्यालय” असा शब्द रुपी प्रवास काही भागात आपण करणार आहोत.
