मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले! @ १६ ऑक्टोबर सायं.६

गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या मांजरा धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया आज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:४५ वाजेच्या दरम्यान धरणाचे दोन दरवाजे उघडुन सुरु करण्यात आली होती. मात्र सायंकाळी सहा वाजता मांजरा धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चार दरवाजे उघडले असल्याची माहिती मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने शाखा अभियंता सुरज निकम यांनी दिली.
मांजरा धरणात नदी पात्रातुन येणाऱ्या पाण्याचा येवा लक्षात घेता आज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:४५ वाजेच्या दरम्यान धरणाच्या एकुण १८ दरवाजांपैकी व्दारे क्रमांक १ आणि व्दार क्रमांक ६ मधुन२५ सेमी उंचीवर उघडुन मांजरा नदीपात्रात १७४७.३३ क्युसेक (४९.४८ क्युमेक्स)एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले होते. मात्र मांजरा धरणात पाण्याचा येवा वाढला असल्यामुळे सायंकाळी या दोन दरवाज्यांसह आता दरवाजा क्रं. ६ आणि ३ मधुन ही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजता धरणाच्या दरवाजा क्रमांक १, ६, ३ व ४ मधुन ०.२५ मीटरने चालु असुन ९८.९६ मी प्रति सेकंद ने (३४९४.६४ घनफुट/सेकंद) विसर्ग सुरु करण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता सुरज निकम यांनी दिली आहे. धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे ही सुरज निकम यांनी सांगितले.
