महाराष्ट्र

एकवचनी ‘एकनाथ’..! “अच्छे दिन” आणण्यासाठी काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साधारणतः दहा दिवसांपूर्वी अनेक राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आले. तद्नंतर पायउतार व्हाव्या लागलेल्या विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे सहाजिक होते. परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा राजकारण्यांच्या स्वार्थीपणामुळे म्हणा आपल्या देशामध्ये लोकशाही हा शब्द केवळ राजकारणापुरताच सिमीत राहिला. आमचा प्रमुख शासनाकर्ता कसा असला पाहिजे अन् राज्यातील नागरिक म्हणून आपल्याकडून त्या दृष्टीने विचार होणं अपेक्षित आणि अभिप्रेत असताना देखील शोकांतिका ही आहे की आपल्याकडे सत्तापिपासूवृत्तीमुळे सर्वच पक्षांची नेतेमंडळी डोळ्यावर पट्टी बांधतात. जनतेला मात्र आंधळी कोशिंबीर पाहण्याशिवाय हाती काहीच पर्याय नसतो.

यावेळेस महाराष्ट्रातील जनतेचे भाग्य उदयाला आल्याचे जाणवते आहे. जनतेच्या अडी अडचणीत कायम खुद्द स्वतः उपस्थित असणारा जनमानसातील नेता अशी ख्याती असणारे ना.एकनाथ शिंदे राज्याच्या गादीवर विराजमान झाले. शिवसेना शाखाप्रमुख ते महाराष्ट्रासारख्या मुख्य राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे एकनाथ शिंदे हे सुरुवातीच्या काळात रिक्षाचालक होते. इतक्या सामान्य पद्धतीने जीवन जगलेल्या व्यक्तीचे जमीनीशी किती घट्ट नाते असू शकते याची कल्पना आपण करु शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा धाडसी पणा, धर्मवीर दिघे साहेबांची संवेदनशीलता, ना.नितीन गडकरी यांची निर्णयक्षमता, खा.पवार साहेबांची मुत्सदेगीरी, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा संयमी स्वभाव, ना.देवेंद्रजींची अभ्यासू वृत्ती, प्रसंगी राज ठाकरेंची आक्रमकता अन् विरोधी पक्षनेते ना.अजित दादांचा स्पष्टवक्तेपणा या सर्व गुणांचे मिश्रण ना.एकनाथभाईंच्या ठायी आहे. आजच्या लिखाणाचे प्रयोजन दोन मुख्य मुद्यांवर अवलंबून आहे. एक मा.सर्वोच्च न्यायालय आज सत्तांतरावर भाष्य करणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन दिवसांपूर्वी बिहारमधील एक मराठी कुटुंब आगीमध्ये भाजले, यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली तत्परता ! सत्तासंघर्ष तर महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला. पाच वर्षातून एकदा जनतेचे मत घेतले की नंतर मात्र त्या मताचा वाटेल तसा वापर करायचा अन् जनतेच्या मनाचा मात्र बळी घ्यायचा. पण आज सत्तासंघर्षाचा विषय बाजूला ठेवत ना.शिंदेंच्या कार्यपद्धतीवर लिहीणे अगत्याचे वाटते.

बिहार मधील पाटणा येथे महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे, ता.खटाव जि.सातारा येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री 2 वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या विशेष दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि एअर अॅम्ब्युलन्स मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. नातेवाईकांच्या संपर्कानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनवर कुटुंबाला आणण्यासाठी 2 विशेष विमानं बिहारमध्ये दाखल झाली. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना सकाळी 11 वाजताच पुण्यातल्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. सत्ता आल्यानंतर व्यक्तीचं वागणं,बोलणं बदलतं हे बहुतांश प्रमाणात सत्य आहे. परंतु या अगोदर देखील सत्ता अनुभवलेले ना.शिंदे याला अपवाद आहेत हे सर्वांना मान्य करावच लागेल.

दोन दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशमध्ये अमळनेर-इंदौर या बसचा भीषण अपघात झाला. बहूतांश प्रवासी मंडळींचा या अपघातामध्ये मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती शासनापर्यंत पोहचली. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. ना.एकनाथभाईंनी तात्काळ क्रेन व इतर आवश्यक साहित्य पाठवून मदत केली. ना.देवेंद्रजींनी संकटमोचक समजल्या जाणाऱ्या भाजपा नेते गिरीश महाजन यांना घटनास्थळी रवाना केले. इंदौरच्या जिल्हाधिका-यांकडून देखील प्रत्यक्ष घटनास्थळाची माहिती वेळोवेळी पोहचवली जात आहे.

विलास बडे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरुन ना.शिंदेंच्या माध्यमातून झालेल्या मदतीच्या आणखी एका प्रसंगाची आठवण करवून देणारी पोस्ट नुकतीच शेअर केली. पोस्टचा आशय असा होता गरिबीमुळे हतबल झालेल्या एका व्यक्तीने साधारणत: तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती, त्याची पत्नी विधवा झाली. तीच्या पोटी तीन लेकींनी जन्म घेतला होता. त्या विधवेने आत्महत्येसारखा निरर्थक विचार मनामध्ये आणला, एवढे कमी की काय म्हणून स्वतःसोबतच पोटच्या तिन्ही लेकींना देखील विष पाजले. यामध्ये तीचा जीव गेला पण तिन्ही मुली रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देवू लागल्या. सुदैवाने या तीनही मुली वाचल्या. विशेष बाब म्हणजे यामध्ये एक चक्क केवळ आठ महिने वय असणारं लेकरु होतं. न्यूज १८ लोकमतने ही बातमी कव्हर केल्यानंतर पुढच्या काही तासातच स्वतः ना.एकनाथ भाईंनी जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खारोंडा गाव गाठलं. अनाथ झालेल्या तिन्ही चिमुकल्यांना हक्काचा नाथ मिळाला. मुलींच्या नावावर प्रत्येकी एक लक्ष रुपयांची एफडी केली. रोजच्या जगण्याची अन् शिक्षणाची सोय केली. शिवाय वर्षभराच्या आत हक्काच्या घराची चावी देखील दिली. मायबापानं जरी पोरं उघड्यावर टाकली तरी या नाथाला त्यांचा सांभाळ आईच्या ममतेने अन् बापाच्या करुणेनं करावा लागतोच मित्रांनो. शेवटी विधात्याने खांद्यावर टाकलेली जबाबदारी ना.एकनाथांना नाही झटकता येणार !

असेच आणखी एक उदाहरण बीड जिल्ह्यातले. बीड येथील जुने कडवे शिवसैनिक सुमंत रुईकर हे शिवसेनापक्षप्रमुख उद्धवजींच्या प्रकृती स्वास्थ्याकरिता तिरुपती बालाजीला साकडे घालण्यासाठी पायी गेले. यादरम्यान दुर्देवाने त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या सच्चा कडव्या शिवसैनिकाचा अंत झाल्याची वार्ता ना.शिंदेंपर्यंत पोहचली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सुमंत रुईकरांची पत्नी-मुले यांचा आधार गेला होता. ना.एकनाथभाईंना वेळ नसल्यामुळे त्यांनी तात्काळ शिवसेना पदाधिका-यांना रुईकरांच्या घरी पाठवत मदत करण्याचे आदेश दिले. सोबतच रुईकरांच्या घरच्यांशी फोनवरुन संपर्क साधत वर्षभराच्या आतमध्ये घर बांधून देण्याचे आश्वासन दिले.

असो, मित्रांनो आज पन्नास आमदार सत्तेच्या प्रवाहातून राजकीय अनिश्चिततेच्या वादळात एकाच व्यक्तीच्या पाठीशी असण्यामागे देखील काही मुलभूत कारणे आहेत. यामध्ये ना.एकनाथभाईंचा आश्वासक स्वभाव, त्यांचा जनमानसातील सहज वावर, कार्यपद्धती, आपलेपणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची त्यांच्याकडे पाहताना असणारी आशाळभूत दृष्टी ही महत्वाची कारणे आहेत. माजी मंत्री अब्दुल सत्तारांना कोरोना झाल्यानंतर पिपीई कीट घालून भेटायला गेलेले ना.एकनाथ शिंदे, सध्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते, सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांच्या कर्करोगाशी असणा-या लढाईत देखील त्यांना सर्वार्थाने धीर देणारे ना.शिंदे यांची स्वतंत्र वैद्यकीय यंत्रणा महाराष्ट्रात कार्यरत आहे. ना.देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून अनेकांना आधार मिळाला होता. आजतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही तितकेच कार्यतत्पर आणि संवेदनशील असल्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्या निश्चित पुर्णत्वास जावोत अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना..!

 

डॉ.शार्दुल संतोषराव भणगे-धामणगांवकर,

 

उपसंपादक दै.दिव्य लोकप्रभा

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker