

श्रीकांत भराडे गेले…!
लोकमत सारख्या अग्रणी दैनिकात अगदी सुरुवातीच्या काळापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत अगदी प्रामाणिकपणे काम करुन प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, मराठवाडा विभाग प्रमुख, उपसंपादक ते थेट संपादक पदाच्या उंबरठ्यावर जावून पोहोचलेले श्रीकांत भराडे गेल्याची बातमी कानावर पडली आणि मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या त्यांच्या बद्दलच्या सर्व आठवणी क्षणाधार्थ माझ्या दृष्टीपटलावरून सरकत गेल्या.
मागच्याच आठवड्यात श्रीकांत भाई यांचा कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी संघर्ष औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात चालू असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारी एक पोस्ट सोशल मेडियावर वाचण्यात आली. सदरील पोस्ट बघताच माझ्या काळजात चर्रर्र झालं. पत्रकारीतेचे सर्व मापदंड जपत, आपल्या स्वाभिमानाला कुठेही ठेच न पोहोचू देता आयुष्यभर प्रामाणिक पत्रकारांवर आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी आपल्या उपचारांसाठी इतरांकडे आर्थिक मदतीची मागणी करावी लागते ही माझ्यासाठी काळीज चिरुन टाकणारी पोस्ट होती, स्वतःलाच स्वतःची लाज वाटावी लागणारी बाब आहे असे वाटते.
तीस वर्षांपुर्वी लोकमत मध्ये काम करीत असतांनाच माझा श्रीकांतभाईंशी संपर्क आला. राम अग्रवाल त्यावेळी वृत्तसंपादक म्हणून काम पहात होते. परभणी येथील मुळ रहिवासी असलेल्या श्रीकांतभाई आणि माझे लोकमत मध्ये कार्यरत असे पर्यंत फार चांगले ट्युन जमले होते. मी तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना श्रीकांतभाई मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम पहात होते. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्या त्यांच्या हाताखालुन जायच्या. त्यावेळी माझ्या अनेक बातम्यांना न्याय देण्याचा काम श्रीकांतभाईंनी त्या कालावधीत केले. लोकमत मध्ये काम करीत असताना माझी पत्रकारिता बसण्यासाठी, फुलवण्यासाठी आणि मला अनेक पुरस्कारांनीज्या बातम्या पाठवति आल्या त्या सर्व बातम्या सजवण्यात फुलवण्यात श्रीकांतभाईंचे खुप मोठं योगदान होते.


श्रीकांतभाई माझ्यासाठी एक वरीष्ठ सहकारीच नव्हते तर प्रामाणिकपणे आणि पत्रकारितेचे मापदंड सांभाळून पत्रकारीता कशी करावी हे शिकवणारे एक मापदंड होते. पत्रकारीतेत काम करतांना पत्रकारांनी आपला पोत स्वतः: सांभाळला पाहीजे. राजकारणातील मित्र, ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेकडून फारशा अपेक्षा न ठेवता काम केले की आपला भ्रमनिरास होत नाही असे ते सतत सांगायचे.
लोकमत मधुन सेवानिवृत्त पत्करल्यानंतर श्रीकांत भाईंनी पत्रकारीतेतुन सरळ निवृत्ती घेवून परभणी येथे स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपले सेवानिवृत्ती नंतरचे जीवन अत्यंत साधेपणाने एवढ्या मोठ्या दैनिकात संपादक पदापर्यंत काम केल्याचा अभिनिवेश कुठे ही न जाणवू देता सुरु केले.
आठ दिवसांपुर्वी श्रीकांत भाईंच्या आजारासंबंधीची आणि त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारी पोस्ट वाचण्यात आली, याच वेळेस काळजात चर्र झाले होते. मात्र या पोस्टच्या पाठोपाठ श्रीकांत भाई गेल्याची बातमी एवढ्या लवकर कानावर येईल असे वाटले नव्हते. पत्रकारीतेत काम करीत असताना मला जपणारा, माझ्या काळजात घर करुन असलेल्या एका वरीष्ठ सहकारी मित्राला आज मुकावे लागले. ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे. श्रीकांत भाईंच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्याची शक्ती ईश्वर देवो..!
श्रीकांत भाईंना आश्रुंनी ओथंबलेली भावपुर्ण श्रद्धांजली!!
💐💐
एकीकडे उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारी पत्रकाराची पोस्ट
तर कोट्यावधी रुपये घरात सापडणारे संपादक
चूक कोणाची?