पहिला श्रावण सोमवार; वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परळीत भाविकांची गर्दी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220801_151715.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220801_151715.jpg)
श्री क्षेत्र वैद्यनाथ हे अनेक कारणांनी एकमेवाद्वितीय आहे. शिव-शक्ती आणि भक्तीचा त्रिवेणी संगम असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लावतात. आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथ नगरीत शिवभक्तांची मांदिआळी दिसून आली. दुपारपर्यंतच ५० हजारावर भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. हरहर महादेव, वैद्यनाथ भगवान की जय, ओम नमः शिवाय आदी जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमुन गेला होता.
कोरोना महामारी नंतर दोन वर्षांनी गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन होत असल्याने आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त देशभरातील भाविक भक्तांनी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ देवल कमेटीच्या वतीने दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यनाथ देवल कमेटीच्या वतीने महिला व पुरुषासांठी स्वतंत्र्य रांगाची व्यवस्था केलेली होती. याठिकाणी विशेष दर्शन पासेसची व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यनाथ मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून गेला होता.
पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांनी रात्री २:३० च्या सुमारास वैद्यनाथ मंदीरात भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मंदिर परिसरात अंदाजे २७० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सोमवारी रात्री १२ पर्यंत श्रींचे दर्शन भाविकांना घेता येणार असल्याची माहिती वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली आहे. दोन वर्ष गाभाऱ्यातुन दर्शन न होऊ शकल्याने अंदाजे २ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक वैजनाथ मंदिर
परळी वैजनाथ येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत मानले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. बीडपासून परळी वैजनाथ सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे.