महाराष्ट्र

सभागृहात “खाली मुंडकं वर पाय” करणारे, आ. दौंड आहेत तरी कोण?

आ. संजय दौंड यांनी "खाली मुंडकं वर पाय" करुन राज्यपालांचा निषेध नोंदवला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सन्माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाने व्हायला हवी होती. मात्र अधिवेशनाची सुरुवात ही पहिल्यांदाच अभिभाषणाविना झाली.  आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाआघाडी सरकारच्या सदस्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अलिकडेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल काढलेल्या अनुद्गाराचा निषेध नोंदवण्यासाठी सभागृहाच्या पाय-यावरच राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. याच वेळी सभागृहाच्या पाय-यावर आ. संजय दौंड यांनी “खाली मुंडकं वर पाय” करुन राज्यपालांचा निषेध नोंदवला. या घटनेने सभागृहाबाहेर जमलेल्या महा आघाडीच्या सर्व आमदारांसह संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष आ. संजय दौंड यांनी वेधुन घेतलं.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वारंवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे अलिकडे सतत महाविकास आघाडी सरकारच्या निशाण्यावर येवू लागले आहेत. अलिकडेच एका कार्यक्रमात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अनुद्गार काढले असल्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या निशेधाच्या घोषणा घुमत आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने त्या विधान परीषदेच्या सभागृहाबाहेर आणि सभागृहातही या निषेधाच्या घोषणा  घुमल्या. विधान परीषदेच्या सभागृहाबाहेर “राज्यपाल राज्यपाल… खाली मुंडकं वर पाय ” ही घोषणा घुमत असतांनाच चक्क आ. संजय दौंड यांनी सभागृहाबाहेरील पाय-यावरच राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यासाठी चक्क “खाली मुंडकं वर पाय” करुन महाराष्ट्राचे लक्ष वेधले.

२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये परळी मतदारसंघातुन  तत्कालीन विधान परीक्षेचे सदस्य आ. धनंजय मुंडे हे विद्दमान पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करुन विजय झाले. या निवडणुकीत आ. धनंजय मुंडे यांना निवडुण आणण्यासाठी संजय दौंड व त्यांचे वडील माजी राज्यमंत्री ऍड. पंडीतराव दौंड यांनी

विशेष प्रयत्न केल्यामुळे आ. धनंजय मुंडे यांच्या उर्वरीत रीक्त जागेवरील अर्ध्या टर्मसाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय दौंड यांना संधी दिली. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजन तेली यांनी सपशेल माघार घेतल्यामुळे संजय दौंड यांची बिनविरोध झाली.

संजय पंडीतराव दौंड यांचं मुळगाव अंबाजोगाई तालुक्यात दौंडवाडी. जन्मापासून अंबाजोगाईलाच असल्यामुळे तसे ते अंबाजोगाईचेच! मात्र राजकीय कर्मभुमी ही सुरुवातीपासूनच ग्रामीण भागातीली‌. जिल्हा परिषदेच्या चार टर्म ते ग्रामीण भागातुनच निवडुंग आले. शालेय शिक्षणापासून व्यायामाची प्रचंड आवड. आता साठी कडे झुकले असले तरी दररोज एक तास व्यायाम कायम! १०० दंडबैठका, सुर्यनमस्कार,  वजनदार डंबेल्सचा व्यायाम सर्व काही नियमित. मैदानी खेळावर विशेष प्रेम. शीर्षासनासह सर्व आसनावर आज ही कमांड कायम. कुस्ती हा तर आवडीचाच विषय! ग्रामीण भागातील कुस्तीगिरांसाठी स्वतः च्या शेतात स्वतः च्याच खर्चाने कुस्तीचा आखाडा ही तयार! पाच पंचवीस तरुण पैलवान दररोज कुस्तीच्या फडातील लाल मातीत एकमेकांची पाठ लोळवणारच!

यासर्व पार्श्वभूमीत तयार झालेला हा रांगडा गडी विधान परीषदेच्या सभागृहात खाली मुंडकं वर पाय या घोषणा होवू लागल्यावर संयम कसा बाळगु शकेल. विधान परिषदेच्या सभागृहाचे सर्व संकेत बाजुला सारत “राज्यपाल राज्यपाल… खाली मुंडकं वर पाय” ही घोषणा जोर धरु लागताच वरीष्ठ नेतृत्वाची परवानगी घेवून चक्क सभागृहातच “खाली मुंडकं वर पाय” करीत राज्यपालांचा निषेध करण्यासाठी पुढं सरसावला आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहातील शीर्षासनामुळे महाराष्ट्रात चर्चेत आला!

धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक

विधान परिषद सदस्य असलेले कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 24 जानेवारी 2020 रोजी पोटनिवडणूक होणार होती. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे संजय दौंड, तर भाजपकडून राजन तेली निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

कोण आहेत संजय दौंड?

संजय दौंड हे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने राजकीय ऋणानुबंध आहेत. संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं होतं. ते 1992 पासून जिल्हा परिषद सदस्य होते.

पवारांनी काय शब्द दिला होता?

विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याच्या मोबदल्यात काँग्रेस नेते पंडितराव दौंड यांचे पुत्र संजय दौंड यांना संधी देण्याचा शब्द शरद पवार यांनी दिला होता. संजय दौंड काँग्रेसमध्ये होते, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळण्यासाठी विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. संजय दौंड यांना तिकीट मिळालं.

विधानपरिषदेवर बिनविरोध

विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे 170 सदस्यांचं बळ होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित होता. त्यामुळे भाजप उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शीर्षासन

दरम्यान, आमदार संजय दौड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केलं. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध  करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker