राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एचएमआयएस प्रणाली मध्यरात्री पासून बंद
राज्य शासनाचा महत्त्वपुर्ण निर्णय
![HMIS](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/HMIS.png)
![HMIS](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/HMIS.png)
राज्य शासनाच्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेली एचएमआयएस प्रणाली आज मध्यरात्री पासून बंद करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने घेतला आहे. या बाबतचा स्वतंत्र निर्णय ५ जुलै रोजी घेण्यात आला असून सर्व वैद्यकीय महाविद्यालया तसे कळवण्यात आले आहे.
या संदर्भात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने स्वतंत्र परीपत्रक डीएमइआर १२०२२ /२/२०२२-इडीयु अन्वये काढलेल्या परीपत्रकात दिनांक ०५.०७.२०२२ रोजी संपन्न झालेल्या एक्झिट मॅनेजमेंट बैठकीचे इतिवृत्त, दिनांक ०५.०७.२०२२ रोजी संपन्न झालेल्या अधिष्ठाता सोबतच्या व्ही. सी. मध्ये देण्यात आलेले निर्देश यांचा संदर्भ देत पुढे असे म्हटले आहे की,
उपरोक्त विषयी शासनाने दिनांक २९.०६.२०२२ अन्वये दिलेल्या निर्देशास अनुसरुन सेवा पुरवठादार मे. ईआयटी ( DXC ) यांच्या प्रतिनिधीसोबत प्रकल्पाच्या एक्झिट मॅनेजमेंटची कार्यपध्दती निश्चित करण्याकरिता आज दिनांक ०५.०७.२०२२ रोजी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार उक्त कंपनीचे प्रतिनिधी संचालनालय येथील सहसंचालक तसेच कामा व सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सदर बैठकीस उपस्थित होते. आपणांस असे निर्देश देण्यात येतात की, बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सध्या कार्यरत असलेला एच एम आय एस प्रकल्प अज्ञावली, साधन सामुग्री व मनुष्यबळा सह आज दिनांक ०५.०७.२०२२ (म.ऊ.) म्हणजेच रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून वापर करण्यात येऊ नये, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच रुग्णसेवा बाधित होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात व खालील निर्देशांचे पालन करण्यात यावे.
१) अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अभिलेख अधिकारी यांची तातडीची बैठक आयोजीत करावी व त्यांना सदर प्रणालीचा साधन सामुग्री व मनुष्यबळाचा वापर न करण्याबाबतचे निर्देश द्यावेत.
२) एच आय एम एस प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी ज्या कार्यपध्दतीचा रुग्णसेवेच्या दृष्टीने नोंदणी व तद्अनुषंगिक बाबी)
वापर करण्यात येत होता, त्याचा पुर्न: उपयोग तातडीने सुरु करण्यात यावा.
३) संचालनालयाच्या निर्देशाशिवाय कोणत्याही एच एम आय एस संबंधित कागदपत्रे/दस्ताऐवजांवर अधिष्ठाता, वैद्यकीय
अधिक्षक, प्रकल्प कार्यान्वयन समिती पीआरसी किंवा अन्य शासकीय कर्मचान्यानी यांनी स्वाक्षरी करु नये,
४) संस्थेत एक्झिटची प्रक्रिया सुरु झाल्याबाबतची माहिती संचालनालयास तात्काळ सादर करावी, त्यासाठी विनय सावंत, कार्यालय अधिक्षक, आयुक्त कार्यालय, संपर्क क्रमांक ९८६९६२९३३३ व ईमेल आयडी medpmu@mah.gov.in यांना याबाबत अवगत करण्यात यावे.
अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक, अधिसेविका, मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व विभागप्रमुख यांनी संयुक्त पध्दतीने रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही यादृष्टीने तातडीने कार्यवाही करून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरी वरील निर्देशांचे व बैठकीच्या इतिवृत्त व व्ही.सी मध्ये दिलेल्या निर्देशांचे तंतोतत पालन करण्यात यावे. अशा सुचेना या परीपत्रकात देण्यात आल्या आहेत.
सदरील आदेशावर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंग यांची स्वाक्षरी आहे.
अल्प कालावधीसाठी घेतला निर्णय
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता महाराष्ट्रात एच आय एम एस प्रणालीचे काम पहाणा-या एजंसीचा करार संपुष्टात आणण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचनालय विभागाने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लवकरच नवीन एजंसीशी करार करुन ही प्रणाली पुन्हा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण सेवेचे सर्व प्रक्रिया आणि उपचार पद्धती आता संगणका ऐवजी कागदपत्रांवर पुर्ण करावी लागणार आहे.