राक्षस भुवन मंदीराला पाण्याचा वेढा; ३२ गावांना पाण्याचा वेढा
शनिच्या मुख्य पीठाविषयी; राक्षस भुवन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/shani-mandir-georai.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/shani-mandir-georai.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220727_202805-1.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220727_202805-1.jpg)
जायकवाडी धरण ९७ टक्के भरल्याने उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जायकवाडीमधून सोडण्यात आलेले पाणी आता बीड जिल्ह्यात पोहचले असून गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन मंदिराला पाण्याने वेढले आहे.
बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सध्या तरी पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र अचानक पाऊस झाला तर पूरपरिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील तब्बल ३२ गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय. गोदा काठ परिसरात शेतकऱ्यांना जाण्यास देखील प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला. सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे.
शनिच्या मुख्य पीठाविषयी; राक्षस भुवन
भारतातील शनिची साडेतीन पीठे असुन गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे मुख्य पीठ आहे. भारतात इतर ठिकाणच्या शनि मंदिरात वैशाख कृष्ण अमावस्थेला शनी जयंती साजरी केली जाते. परंतु राक्षसभुवन येथे पौष शुध्द अष्टीला रेवती नक्षत्रावर शनी जन्मोत्सव साजरा केला जातो.
संपूर्ण भारतात शनिची साडेतीन पीठे असुन गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे आद्य पीठ असुन दुसरे नाशिक जिल्ह्यातील नस्तनपुर, तिसरे मध्यप्रदेशातील उज्जैन, तर अर्धे पीठ बीड शहरात आहे. रामचंद्राच्या पावण स्पर्शाने हे क्षेत्र पुण्यवान झाले आहे. त्रेतायुगात वातापी व इलवन या दोन राक्षसांचा अगस्ती ऋषींनी याच गावात नाश करून येथे शनि बरोबरच नवग्रहांची स्थापना केल्याचा उल्लेख भविष्य उत्तर पुराण, गोदावरी महात्म्य यात आढळतो.
येथील मंदिरात शनी मुर्तीस अखंड तैलाभिषेक सुरू असतो. साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ असलेल्या बीड गेवराई येथील शनि महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असल्यामुळे मंदिर परिसर आणि गावाचा विकास होत आहे.
शनी देवाचे उज्जैन, नांदगाव (जि. नाशिक), राक्षसभुवन हे तीन आणि बीड येथील शनि देवस्थान अर्धे असे साडेतीन पीठ आहेत. बीड येथील हे शनि देवस्थान जवळपास सध्या २ एकरच्या जागेत वसलेले आहे. बीड शहराला तसा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा. शहरातील कनकालेश्वर, शहेंशाहवली दर्गा, मन्सूरशहा दर्गा, किल्ला, खंडोबा मंदिर, दीपमाळ, जटाशंकर मंदिर, खंडेश्वरी मंदिर, शिदोडचे महालक्ष्मी मंदिर, खजाना बावडी आदी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे हे बीड शहर परिसरातील.
विक्रमादित्य राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची अख्यायिका. १९५२ साली निजामशाहीत या मंदिराला सनद प्राप्त झाली. कोल्हेर (ता.गेवराई) येथे ४० एकर आणि शिदोड येथे ३६ एकर जमीन देवस्थानच्या नावावर आहे. पैकी शिदोडच्या जमिनीचा वाद चालू आहे. ऐतिहासिक काळात शहरातून वाहणाऱ्या बिंदूसरा नदीचे पात्र या शनि देवस्थानपर्यंत होते. पुढे पर्जन्यमान घटत गेले, तशी मंदिर आणि बिंदूसरा पात्राच्या मध्ये वस्ती वाढली. एक जागृत देवस्थान म्हणून ख्याती पसरत असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अतिक्रमणामुळे ४ एकर जागा असलेले हे मंदिर १८०० स्क्वेअर फूट जागेतच मर्यादित होते. आता पैकी २ एकर जागा मोकळी झाली असून, उर्वरित जागेचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. मंदिरात दोन विहिरीपैकी एक पुरातन बारव आहे. या दोन विहिरींचे पाणी पिण्यायोग्य असून, कधीही आटत नाही. दुष्काळातही या विहिरीतून पाणीपुरवठा सुरू होता.
मंदिराच्या विकासासाठी जागा असूनही अतिक्रमणात अडकली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू असून, भाविकांचेही योगदान मिळत आहे. मंदिराच्या जागेचा आणि जमिनीचा वाद मिटला तर देवस्थानच्या विकासासाठी फायदा होईल, असे देवस्थानचे प्रशासक रामनाथ खोड यांनी सांगितले.