कोरोना काळात पॅरोलवर सुटले दोन कैदी कारागृहात परतलेच नाहीत
अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा


खुनाच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्याखाली औरंगाबादच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील दोन कैद्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ४५ दिवसांची अभिवचन सुटी (पॅरोल) मिळाली. मात्र, मुदत उलटूनही हे दोन्ही कैदी कारागृहात परतले नाहीत. त्या दोघांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संजय ज्ञानोबा नरवडे (रा. वाघाळवाडी) आणि प्रदीप लालासाहेब बनसोडे (रा. लोखंडी सावरगाव) अशी त्या कैद्यांची नावे आहेत. दोन वेगवेगळ्या खून प्रकरणात संजय नरवाडे २०१३ पासून तर प्रदीप बनसोडे हा २०१९ पासून औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर २०२० साली त्या दोघांना सुरुवातीस ४५ दिवसांच्या आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी त्यांना रजेत ३० दिवसांची वाढ देण्यात आली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर यावर्षी १६ मे पासून त्यांच्या रजा रद्द करण्यात येऊन तत्काळ कारागृहात हजर होण्याबाबत आदेश बजावण्यात आले होते. मात्र, दोघेही अद्यापपर्यंत कारागृहात हजर झाले नाहीत. अखेर कारागृहाच्या वतीने दोन्ही कैद्यांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
पॅरोलवर सोडलेले कैदी बेपत्ता; ३ हजार ४६८ जणांचा शोध सुरू
कारागृहातील कैद्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये. कैद्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्याचा निर्णय तिहार कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय आता कारागृह प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण पॅरोलवर सोडलेल्या कैद्यांपैकी ३ हजार ४६८ जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. (prisoners who were released on parole from tihar jail gone missing)
पॅरोलच्या कालावधीत वाढ
कारागृह प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कैद्यांना सुरुवातीला आठ आठवड्यांसाठी पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा कहर वाढत गेल्यानंतर ही मुदत अनेकदा वाढवण्यात आली. अखेरीस या कैद्यांना शरण येण्यासाठी ७ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंतची वेळ देण्यात आली होती. मात्र, ११८४ कैद्यांपैकी ११२ जण बेपत्ता झाले. प्रशासनाने कुटुंबीयांकडे चौकशी केली, तेव्हा ते घरी नसल्याचे समजले.
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला
तिहार कारागृहातील ५५५६ कैदी अंतरिम जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, यातील केवळ २२०० कैदी परत आले. मार्च अखेरपर्यंत या कैद्यांना सरेंडर करण्यास सांगितले होते. दरम्यान, कोरोनाची स्थिती गंभीर होत गेल्यानंतर गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना पॅरोल, जामिनावर बाहेर सोडण्याचा सल्ला दिला होता.