नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूकांना स्थगिती…! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची माहिती
राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी


राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषद आणि ४ नगर पंचायतच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाने ०८ जुलै रोजी घोषणा केली होती. मात्र, आज दि. १४ जुलैला या निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेवर येत्या 19 जुलै रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे घोषित करण्यात आलेला नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून यथावकाश याबाबत निवडणूक कार्यक्रम घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
निवडणुका रद्द झालेल्या नगरपरिषदांची जिल्हा व वर्गनिहाय नावे:
‘अ’ वर्ग : जळगाव- भुसावळ. पुणे- बारामती. सोलापूर- बार्शी. जालना- जालना. बीड- बीड आणि उस्मानाबाद- उस्मानाबाद.
‘ब’ वर्ग: नाशिक- मनमाड, सिन्नर व येवला. धुळे- दोंडाईचा वरवाडे व शिरपूर वरवाडे. नंदुरबार- शहादा. जळगाव- अमळनेर व चाळीसगाव. अहमदनगर- कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर. पुणे- चाकण व दौंड. सातारा- कराड व फलटण. सांगली- इस्लामपूर व विटा. सोलापूर- अक्कलकोट, पंढरपूर व अकलूज. कोल्हापूर- जयसिंगपूर. औरंगाबाद- कन्नड व पैठण. बीड- अंबेजोगाई, माजलगाव व परळी- वैजनाथ. लातूर- अहमदपूर. अमरावती- अंजनगाव.
‘क’ वर्ग: नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर. जळगाव- वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा व यावल. अहमदनगर- जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी. पुणे- राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड व शिरूर. सातारा- म्हसवड, रहिमतपूर व वाई. सांगली- आष्टा, तासगांव व पलूस. सोलापूर- मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा व सांगोला. कोल्हापूर- गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व वडगांव. औरंगाबाद- गंगापूर व खुलताबाद. जालना- अंबड, भोकरदन व परतूर. बीड- गेवराई व किल्ले धारूर. उस्मानाबाद- भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा व तुळजापूर. लातूर- निलंगा व औसा. अमरावती- दर्यापूर. बुलढाणा- देऊळगावराजा.
नगरपंचायती: अहमदनगर- नेवासा. पुणे- मंचर व माळेगाव बुद्रुक. सोलापूर- अनगर.
राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेसंदर्भात 12 जुलै 2022 रोजी सुनावणी झाली. समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासवर्गाबाबत दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला; तसेच 19 जुलै 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी आता आचारसंहिता लागू राहणार नाही. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.