जिल्हा रूग्णालयाच्या ओपीडीचे मेनगेटही तहसील प्रमाणे उघडा; रुग्णांची गैरसोय टाळा
Open main gate of District Hospital OPD also like Tehsil; Avoid patient inconvenience
![District Hospital beed](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/beed-.png)
![District Hospital beed](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/beed-.png)
बीड / एस.एम.युसूफ /
अल्पावधीतच एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख मिळविलेले बीड तहसीलदार सुहास हजारे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आलेले तहसीलचे मुख्य प्रवेशद्वार पुढाकार घेत कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची अडचण लक्षात घेऊन उघडले. आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनीही बाह्यरुग्ण विभागाचे मेनगेट रुग्ण व सोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी उघडावे आणि रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय टाळावी. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, जिल्हा रुग्णालयाचा श्वास असलेला बाह्यरूग्ण विभाग हा दिवसातून दोन वेळेस (सकाळी व दुपारी) असा दोन सञात उघडला जातो. परंतु तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना त्रासदायक असा निर्णय घेऊन बाह्यरूग्ण विभागाचे मेनगेटच कुलूप बंद करत जिल्हा रुग्णालयाचा श्वास कोंडून टाकला. त्यांचे हे धोरण रुग्ण व नातेवाईकांच्या गैरसोयी वाढविणारे होते. कारण बाह्यरुग्ण विभागाचे मेनगेट बंद केल्यानंतर बाह्यरुग्ण विभागात येणारे रुग्ण व नातेवाईक यांना नाविलाजाने आंतररुग्ण विभागाकडील गेटमधूनच वळसा घालून बाह्यरूग्ण विभागात यावे लागत आहे. यामुळे दिव्यांग असलेले रुग्ण, अपघातग्रस्त होऊन जखमी झालेले रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना तेव्हापासून आतापर्यंत मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग असो की, आंतररुग्ण विभाग असो जिल्हा रुग्णालयाच्या वाॅल कंपाऊंड पासून ते इमारती पर्यंतचे अंतर दोन्ही बाजूने अत्यंत कमी असल्याने फक्त आंतररुग्ण विभागाच्या गेटने या दोन्ही विभागातील रुग्ण व नातेवाईक त्यासोबतच जिल्हा रुग्णालयातील संपूर्ण डॉक्टर्स व कर्मचारी यांची ये-जा असल्याने इमारती पासून ते वाॅल कंपाउंड पर्यंत असलेल्या अपूर्ण जागेत लोकांची नेहमी अत्यंत वर्दळ असते.
पूर्वी बाह्यरुग्ण विभागाचे मेनगेट उघडले जात असताना रूग्ण बाह्यरुग्ण विभागात येऊन उपचार घेत व त्याच मेनगेटने निघून जात. परंतु जेव्हापासून या बाह्यरुग्ण विभागाच्या मेनगेटला टाळे लावण्यात आले तेव्हापासून रुग्णांसह नातेवाईकांनाही आंतररुग्ण विभागाकडून ये-जा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामुळे दोन्ही विभागाकडे नेहमी गर्दीचगर्दी असते. ज्याचा त्रास जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला तसेच डॉक्टर मंडळींंसह कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात होतो. हा त्रास कमी करण्यासाठी पूर्वीप्रमाणे बाह्यरुग्ण विभागाचे मेनगेट उघडणे आवश्यक आहे. जेणेकरून रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय दूर होईल. ही बाब लक्षात घेऊन विद्यमान बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी बाह्यरुग्ण विभागाचे मेनगेट रुग्ण व नातेवाईकांसाठी सकाळ व दुपारच्या सत्रात नियमितपणे उघडून द्यावे आणि रुग्ण व नातेवाईकांना होत असलेला त्रास थांबवावा. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.