स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पाण्याखाली होणार ध्वज संचलन, ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत
flag hoisting under water


अफाट..अचाट..अतर्क्य..अलौकिक ..अविस्मरणीय ही विशेषणे सुद्धा कमी पडतील असा एक दिमाखदार सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त नवी मुंबईतील उरण येथे पार पडणार आहे. नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोज हे पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन तसेच राष्ट्रगीत सादर करणार आहेत.
उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी आणि माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकारत आहे. दि. १४ आणि १५ च्या रात्री बारा वाजून एक मिनिटांनी हा विश्वविक्रमी कार्यक्रम होणार असून सुमारे दहा कमांडो अर्धा तास पाण्याखाली स्वातंत्र्याचा अमृतोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करतील. या कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांमध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारी हे नौदल कमांडोज पार पाडणार आहेत. या शानदार सोहळ्याचे वृत्तसंकलन करण्यासाठी संपूर्ण जगातून माध्यम समूहाचे पत्रकार आणि छायाचित्रकार उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त सुमारे तीन हजार प्रेक्षक जमिनीवरील स्क्रीनवर पाण्याखालील अद्भूत सोहळा अनुभवणार आहेत.
या जागतिक पातळीवरील सोहळ्याची माहिती देताना आमदार महेश बालदी आणि निवृत्त कमांडो रवी कुलकर्णी म्हणाले की, हा अविश्वसनीय कार्यक्रम उरण मधील श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पाण्याखाली ध्वजवंदन, ध्वजसंचलन आणि राष्ट्रगीत होणार आहे. पाण्याखाली अर्धा तास राहणाऱ्या भारतीय नौदलातील निवृत्त कमांडोंसाठी खास बनविण्यात आलेले हेल्मेट असतील, त्याचप्रमाणे स्कुबा डायव्हिंग सेट्सचाही वापर करण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम साधारणपणे २५ ते ३० मिनिटांचा असेल, असेही ते म्हणाले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अनेक चित्रवाहिन्यांवरूनही दाखवण्यात येणार आहे. वृत्तपत्रांचे प्रतिनिधी ही यावेळी उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमापूर्वी उरण मधील विमला तलावामध्ये तरंगत्या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम १४ तारखेला रात्री साडेदहा ते पावणे बारा यादरम्यान सादर होतील. नंतर तेथून जवळच असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल मध्ये “अंडरवॉटर इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशन” साजरे करण्यात येईल .सुरुवातीला निवृत्त कमांडो रवी कुलकर्णी राष्ट्रध्वजाची पूजा करतील आणि त्यानंतर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या नंतर कमांडोंची एक तुकडी पाण्याखाली ध्वजसंचलन तसेच ध्वजवंदन करेल. त्यावेळी राष्ट्रगीतही सादर करण्यात येईल.
हा सोहळा पाण्यावरील आणि जगातील प्रेक्षकांना व्यवस्थित पाहता, यावा यासाठी पाण्याखाली खास यंत्रणा राबविण्यात आली आहे.
ही ” अंडरवॉटर इंडिपेंडेंस सेलिब्रेशन” ची संकल्पना रवी कुलकर्णी यांची असून पाण्याखालील संपूर्ण मोहीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली साकार होत आहे. यापूर्वी २००३ मध्ये कुलकर्णी यांच्या कल्पनेतून जगातील पहिले “ट्रॅडिशनल अंडरवॉटर मॅरेज” आयोजित केले होते. त्यावेळी दहा जण लग्न सोहळ्यासाठी ३२ मिनिटे पाण्याखाली होते. काही महिन्यापूर्वी कुलकर्णी यांनी पाण्याखाली मेडीटेशन केले होते. २०२१ मध्ये त्यांनी एका वर्षामध्ये गिर्यारोहणाच्या १२५ मोहिमा पार पाडल्या. हिमालयापासून ते निलगिरी पर्यंत त्यांनी गिर्यारोहण केले. रवी कुलकर्णी यांनी गो एअर आणि ॲडलॅब इमॅजिका मध्ये पदाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.


कुलकर्णी यांच्याबरोबरच या सोहळ्यामध्ये कमांडर प्रवीण तुळपुळे, कमांडो एन. सी. जगजीवन, कमांडो रामदास कळसे, कमांडो विनोद कुमार, कमांडो विलास भगत, कमांडो रामेश्वर यादव, कमांडो सज्जन सिंग, कमांडो एन.एल. यादव, कमांडो अनिल घाडगे , कमांडो भूपेंद्र सिंग हे सहभागी होणार आहेत. हा संपूर्ण सोहळा तेरा फूट खोली असलेल्या स्विमिंग पूल मध्ये दि. १४ तारखेला रात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे. भारताचा तिरंगा पाण्याखाली फडकत राहावा, यासाठी ही विशिष्ट योजना व विशिष्ट तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची तयारी गेल्या काही आठवड्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत करणार आहेत. या अनोख्या आणि अफलातून कार्यक्रमाचा लाभ प्रत्यक्ष तसेच दूरचित्रवाणीवरून देशप्रेमींनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक आमदार महेश बालदी यांनी केले आहे.