गावात पसरला अंधार; पठ्ठयाने केला एलएडी लाईटचा झगमगाट!

पुतण्याच्या वाढदिवसानिमित्त काकाचा सामाजिक उपक्रम
सामाजिक कार्याचा वसा जोपासत नाखलगाव येथील एका तरुणाने अख्ख्या गावात महागड्या एलईडी लाईट बसवत अंधारमय झालेल्या स्वतःच्या गावाला उजळून काढले. गावासाठी काहीतरी देणे लागते या विचारातून राबवलेल्या या अभिनव उपक्रमामुळे नाखलगाव ग्रामस्थांकडून सदर तरुणाचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे.सविस्तर वृत्त असे की, माजलगाव तालुक्यातील नाखलगाव हे सदन गाव म्हणून सुपरिचीत आहे, विविध उपक्रमासाठी हे गाव सतत चर्चेत असते. मागील तीन वर्षापासून या गावात विजेच्या पोलवर दिवे नसल्याने नसल्याने अंधार पसरला होता, याच कारणाने येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश झोडगे या तरुणाने कुठल्याही सरकारी योजनेची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःच्या स्वखर्चातून अख्या गावातील विद्युत पोलवर जवळपास सवालाख रुपये खर्च करत अठ्ठेचाळीस विद्युत खांबावर एलईडी लाईट्स बसवल्या. यासाठी त्यांनासव्वा लाख रुपयांचा खर्च आला. हा उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुतण्याच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधला. सामाजिक कार्यकर्ते सुहास झोडगे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाचा हनुमान मंदिर परिसरात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पांडुरंग झोडगे, सरपंच विठ्ठल गवळी, रामहरी शिनगारे, लक्ष्मण सोळंके, भागवत शेळके आदी मान्यवरांसह नाखलगांव ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. या एलईडी लाईटमुळे अख्या गावात प्रकाश पडणार असल्यामुळे नाखलगावकर ग्रामस्थातून झोडगे परिवाराचे कौतुक होत आहे.

