नव्या मंत्रीमंडळातील ७० टक्के मंत्र्यांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल! 90% करोडपती आहेत
New Union Cabinet 70% Ministers Have Criminal Cases, 90% Are Crorepatis


सत्तांतरानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन ४० दिवसांचा कालावधी उलटून गेल्या नंतर आज राज्यात नवीन मंत्रीमंडळाचा विस्तार झाला खरा, पण या मंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांमुळे मंत्रिमंडळ चर्चेत आले आहे. या नवीन मंत्री मंडळातील ७० टक्के मंत्र्यांवर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आम्ही स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊ असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारचा हा दावा फोल ठरला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तार आज शिंदे गटाच्या ९ तर भाजपा गटाच्या ९ मंत्र्याचा राजभवनात शपथविधी पार पडला. आज शपथ देण्यात आलेली सर्व मंत्री ही कॅबिनेट दर्जाचे असतील असे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. मात्र या १८ मंत्र्यांमध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही आणि स्वच्छ चारित्र्याच्या आमदारांनाच मंत्रीमंडळात स्थान देण्यात येईल असा दावा करणाऱ्या शिंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या ७० टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी असल्यामुळे हे मंत्रीमंडळ चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर १८, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत. या मंत्रिमंडळात समावेश असलेले भाजपचे नंदुरबार पूर्वचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध सर्वाधिक ९ गुन्हे दाखल आहेत, तर त्याखालोखाल औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत. त्या खालोखाल मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. तर रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ गुन्ह्यांची नोंद आहे. यानंतर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी २ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या ९ पैकी फक्त २ आमदारांविरुध्द कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील ९ मंत्र्यांपैकी ५ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्याविरुद्ध सर्वाधिक ९ गुन्ह्यांची नोंद आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत चर्चेत आलेले अब्दुल सत्तार यांच्या नावावर ८ गुन्ह्यांची नोंद आहे. तर संजय राठोड यांच्याविरुद्ध ४ गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. दरम्यान, शिंदे गटाचे तानाजी सावंत, दीपकर केसरकर, उदय सामंत, शंभुराजे देसाई यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही.
राज्याच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाच्या चांगल्या वाईट अनेक वैशिष्ट्यांची सध्या चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातील सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत.
दोन मंत्री १० वी पास !
आज शपथ घेतलेल्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री दहावी पास आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि संदिपन भुमरे यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्र्यांमध्ये उदय सामंत हे सर्वात तरुण मंत्री आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुस-या क्रमांकाचे तरुण मंत्री आहेत. या नवीन मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५९.५ वर्षे आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे आमदार उदय सामंत हे मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत. ४६ वर्षीय सामंत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वत:ला शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगितले आहे. सामंत वगळता कोणत्याही मंत्र्याचे वय ५० वर्षांपेक्षा कमी नाही. सामंत यांच्यानंतर युवा मंत्र्यांमध्ये ५२ वर्षीय देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचे नाव येते. त्याचवेळी शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेले दीपक केसरकर हे मंत्रिमंडळातील सर्वात वयस्कर मंत्री ठरले आहेत. ६७ वर्षीय केसरकर यांनीच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मंत्रिमंडळातील ११ मंत्री ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५८ वर्षांचे आहेत.
भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार ?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतल्याने रिक्त होणाऱ्या प्रदेशाध्यक्षाच्या जागेवर नवा प्रदेशाध्यक्ष देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात ओबीसींच्या बळावरच भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. सध्या महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे वादळ सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हा विषय हाताळत आहेत. तरीही २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दृष्टीक्षेपात ठेवता नवीन प्रदेशाध्यक्ष हे ओबीसींमधील असण्यावर पक्षश्रेष्ठींचा भर आहे.
‘एक व्यक्ती एक पद’ हे भाजपचे सूत्र आहे. या सुत्रानुसार चंद्रकांत पाटील यांना लवकरच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पद पुन्हा ओबीसी नेतृत्वाकडेच रहावे असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांचा आहे. अलिकडे भाजपातील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील तणावाचे संबंध सुधारले असल्याचे दाखवण्यात येत असलेतरी तसे अजिबात दिसत नाही. कारण भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी पंकजा मुंडे यांचे नांव मागे पडुन आता माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे नांव पुढे आले आहे.
हंसराज अहीर हे भाजपच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे ओबीसी सेलचे प्रभारी आहेत. १९९६ पासून त्यांनी भाजप संघटनेत विविध पदे भूषवली आहेत. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे हे प्रदेशाध्यक्ष असताना हंसराज अहीर हे त्यांच्या कार्यकारिणीत महामंत्री होते. हंसराज अहीर यांनी कोलगेटमधील भ्रष्ट्राचार बाहेर काढल्याने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा जाहीर गौरव करीत त्यांचेकडे मंत्रिमंडळातील महत्वाची खाते दिली होती. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी हंसराज अहिर यांची निवड होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.