प्रबोधन

प्रत्येकाने वाचावा असा नरहर कुरुंदकर यांच्या विषयीचा लेख १५ जुलै कुरुंदकर गुरुजींचा स्मृतीदिन

"पण आपणही सुजान बनलो पाहिजे" - नरहर कुरुंदकर

Laxman Sangewar Nanded
Laxman Sangewar Nanded

ज्येष्ठ लेखक, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कै. नरहर कुरुंदकर गुरुजी यांचा १५ जुलै हा स्मृती दिन.

या दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील त्यांचे स्नेही, त्यांच्या साहित्याचे अभ्यासक श्री. लक्ष्मण संगेवार यांनी लिहिलेला हा विस्तृत लेख. खास आपल्यासाठी….

लेखकः लक्ष्मण संगेवार. मोबा. 9325621050

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा १९१३ साली प्रसिध्द झालेला ‘ महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद ‘ ह्या प्रसिद्ध निबंधाच्या सुरुवातीस एक वाक्य आहे. “ विचार सामाजिक आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारे समाजाच्या हिताला ज्यांनी थोडा किंवा फार हातभार लाविला अशाच व्यक्तींचा तेवढा या मोजदादींत समावेश होतो. एखादा माणूस मोठा बुद्धिमान किंवा प्रतिभावान असला, परंतु समाजाच्या उपयोगी तो यत्किंचितही पडला नाही, तर त्याची गणना समाजहितेच्छुंच्या मोजदादींत करता येत नाही.” त्या लेखात राजवाडेनी सर्वकालीन महत्त्वाच्या अशा ४३ व्यक्तींची यादी दिली आहे. त्या सर्व व्यक्ती एकोणिसाव्या शतकातील आहेत. त्यानंतरच्या कालखंडातील, विसाव्या शतकातील अशा व्यक्तिची यादी करावयाची ठरवली तर त्यात नरहर कुरुंदकराचे नाव निर्विवादपणे असेल ते विचारवंत म्हणून नव्हे तर विचार कसा करावा हे कुरुंदकरांनी महाराष्ट्राला शिकविले म्हणून. एक कर्ते  सुधारक म्हणून.

‘गुरुजी’ म्हणून महाराष्ट्रास परिचित असलेली दोन व्यक्तीमत्वे, साने गुरुजी आणि गोळवलकर गुरुजी. पण त्याशिवायही ‘गुरुजी’ ह्या नावाने ओळखले असणारे एक व्यक्तीमत्व मराठवाड्यात आहे. नरहर कुरुंदकर त्याचे नाव. आचार्य म्हणून महाराष्ट्रास परिचित असलेल्या प्रा.जावडेकर व प्र.के.अत्रे याशिवाय हा बहूमान मिळाला तो नरहर कुरुंदकरांना. निजाम राजवटीतील मराठवाड्यात जन्मलेले प्रकांड पंडीत नरहर कुरुंदकर ह्या लोकोत्तर विद्वानास लाभलेल्या उण्यापुर्‍या पन्नास वर्षाच्या आयुष्यात तत्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, संस्कृती, धर्म, इतिहास, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, संगीत अशा अनेक विषयांत त्यांचा व्यासंग होता. नावापूर्वी प्रा. हे बिरुद असलेलल्या कुरुंदकराचा अभ्यासाचा मूळ विषय कोणता? असा प्रश्न कधी कधी आजच्या पिढीस पडतो तसा तो त्यांचा समकालीननाही पडत असे. पिपल्स कॉलेज मधील आपला इंटरव्ह्यू कोणी कुरुंदकर नामक शालेय शिक्षक असलेले व्यक्ति घेणार आहे ह्याबाबत स्वामी रामानंद तिर्थ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली पण मुलाखातीत कुरुंदकरांनी सौंदर्यशास्त्रावर दोन तास चर्चा रंगवल्याची आठवण प्राचार्य राम शेवाळकरांनी लिहून ठेवली आहे.

आपल्या अलौकीक प्रतिभेने व अमोघ वकृत्वाने त्यांनी कांहीकाळ महाराष्ट्राला दिपवून टाकले होतेे. आपल्या प्रतिपादनाशिवाय दुसरा विचार असूच शकत नाही असे संमोहन श्रोत्यावर घालणारा हा वक्ता. नांदेड सारख्या सुदूर स्थळी राहूनही, प्रवासाच्या साधनाची तमा न बाळगता लोकांना शाहणे करण्याच्या ध्येयापोटी त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती केली. आज त्यांची जयंती. ते हयात असते तर आज ते सत्याऐंशी वर्षाचे झाले असते. त्यांच्या आयुष्यातील शालेय शिक्षणाची पंधरावर्षे वगळता आयुष्याची पस्तीसवर्षे त्यांनी विविध विषयांच्या सखोल अभ्यासात घालवली. त्यांना जाऊन आज सदतीस वर्षे झाली आहेत.

विद्वान असूनही कुरुंदकर तसे माणूसघाणे नव्हते. त्यांच्या विद्वतेने सामन्यमाणूस नव्हे तर विद्वतजनही भारावून जात असत. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येकजण त्यांच्याबद्दल आत्मियतेने, जिव्हाळ्याने बोलताना आपणास आढळतो. व्यक्ती लहान असो वा थोर, विद्यार्थी असो कुटुंबीय त्यांच्या आठवणीतील कुरुंदकर हे मानवीय जिव्हाळा जोपासणारे आहेत. आजच्या पिढीस कुरुंदकर हे व्यक्तिमत्व समजवून घेताना जशा त्यांच्याशी जवळीक असलेल्या व्यक्तिच्या आठवणी आहेत तसेच तत्कालीन प्रसंगातून, त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेतून, त्यांच्या लिखाणाचा व वक्तव्याचा आधार घेत त्यांचे व्यक्तिमत्व साकारावे लागते. एकाद्या विषयाचे आकलन होण्यासाठी आणि प्रतिवाद करण्यासाठी जी वैचारिक सुस्पष्टता हवी आणि ती कुरुंदकरांच्याकडे होती. अभ्यासाअंती मांडलेल्या मतावर, घेतलेल्या भूमिकेवर ते ठाम असत एवढेच नव्हे तर प्रसंगी ते त्याचा पुनःउच्चारही करीत असत. जाहिरपणे, फटकळपणे आपली मते विरोधकांना सुनवीत असत. ह्यातून काय प्रसंग उद्भवेल ह्याची फारशी तमा न बाळगता ते आपल्या मतांशी प्रामाणिक असत. म्हणूनच कदाचित अहंकारी वा विद्ववत्तेचा दर्प असलेलं व्यक्तिमत्व असा त्यांच्याबाबतचा ग्रह झालेला असावा.

नांदेड येथे जमाते इस्लामीतर्फे आयोजित इज्तेमाच्या व्यासपीठावरुन त्यांनी मांडलेला ‘ इस्लाम धर्मातील परधर्मियाबाबतचा विचार ‘ हा विषय आणि प्रसंग आठवून पहा. ”मी नास्तिक आहे. धार्मिक अर्थाने मी हिंदू नाही. पण मी मुसलमानही नाही. माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे काय ?” ह्या प्रश्नार्थकतेने आपल्या वक्तव्याची सुरुवात करणारे कुरुंदकर काय मांडणार आहेत ह्याची सूस्पष्ट कल्पना  वाचकास मिळते. पण प्रत्यक्षात ईस्लाम धर्माच्या प्रचारासाठी एकत्र आलेल्या मुल्ला, मौलवी, उलेमा व मुस्लिम श्रोत्यांसमोर त्यांच्याच धर्मातील अन्यधर्मीयांबाबतच्या शिकवणीची चिकित्सा करणे ही बाब वाटते तेवढी सोपी नाही.

श्री रणजीत देसाई हे ‘श्रीमान योगी’ हा आपला ग्रंथ साकारीत असताना त्यांच्या उपस्थितीत नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराजावरील तीन व्याख्यानाच्या सुरुवातीसच कुरुंदकर ऐतिहासिक कांदबरी लेखन व इतिहास लेखन ह्यातील फरक स्पष्ट करीत शिवजन्म तिथीच्या वादासंबधी बोलताना, ” तिथीचा वाद हा अस्सल ऐतिहासिक पुरावा ऊपलब्ध नाही म्हणून नव्हे तर इतिहासकारांच्या व्यक्तिगत अहंतेपोटी निर्माण झाला ” असल्याचे स्पष्ट करीत तत्कालीन बड्या इतिहासकारांना ते ‘आडे हाथ’ घेतात. अशी परखड चिकित्सा कुरुंदकरांनी वेळोवेळी केलेली आहे. तत्कालीन भारतीय सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्तीबाबत त्यांनी  लिहिलेल्या लेखातून त्याची प्रचिती आपणास येते.  मार्क्सवादाकडे झुकलेल्या कुरुंदकरांनी मार्क्सवादाची चिकित्सा केली म्हणून समाजवादी जवळ आले पण व्यक्तीगत आयुष्यात सनातन हिंदू परंपरांचे पालन केले म्हणून दुखावले गेलेले समाजवादी नेतृृृत्व पुढे कुरुंदकर हमीद दलवाईच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे दुरावले. गोळवलकर गुरुजीवरील लेखांच्या निमित्ताने संघाच्या अखंड हिदुस्थान व हिंदूत्ववादी भूमिकेवरील टिकेमुळे संघ परिवार दूर सरकला. ‘काँग्रेस ही हिंदूंची देशातली सर्वांत मोठी संघटना आहे’ असे प्रतिपादन करणार्‍या कुरुंदकरांनी आणीबाणी तसेच त्यानंतरच्या निवडणूकीतील जाहिरसभातून घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसजन नाराज झाले. ” भारतात वर्णव्यवस्था कधी अस्तित्वात नव्हतीच होती ती जात व्यवस्था. वर्णव्यवस्थेच्या नावाने जातीव्यवस्थेचे समर्थन होते म्हणून वर्णव्यवस्थेचा आग्रहाने विरोध करावा लागतो “.  मनुस्मृतीबाबत कुरुंदकरांच्या या प्रतिपादनामुळे त्यांना गुरुस्थानी असलेले संस्कृतपंडीत म.मो.श्री यज्ञेश्र्वरशास्त्री कस्तुरे दुखावले गेले. देवत्व प्राप्त झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्तिने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेतील विरोधाभास स्पष्टपणे मांडल्यामुळे दलितसाहित्याचे समर्थक असे संबोधले गेलेल्या कुरुंदकराच्या प्रतिमेस तडा गेला. पुढे विद्यापीठ नामांतर प्रकरणी मराठवाड्याच्या अस्मितेवरुन त्यांनी नामांतरास जाहिर विरोध दर्शविला. एवढेच नव्हे तर मराठवाड्याच्या आस्मितेचे आपण प्रतिनिधी अाहोत असे म्हणत त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत अपमान व विरोधही सहन केला. कुरुंदकरांच्याच शब्दात सांगावयाचे तर, ” समाजाला श्रद्धास्थाने असतात, म्हणून विचारवंत एकाकी असतो. त्याने निर्भय बनले पाहिजे हे मान्य, पण आपणही सुजाण बनलो पाहिजे.”

१८५७ चा जिहाद, कश्मीर प्रश्र्न, मुस्लीम मानसिकता, हिंदुस्थानची फाळणी हे गुरुजीनी आपल्या लेखातून मांडलेल्या विषयावर सखोल संशोधन करुन सविस्तरपणे ते ग्रंथबध्द केल्यामुळे आपण नावारुपाला आलो असल्याचे ऋण ख्यातकिर्त लेखक प्रा. शेषराव मोरे व्यक्त करतात. कुरुंदकरांच्या मृत्यूबरोबर वाग़यज्ञ थंडावला. त्यांच्या लिखाणाला वाचक वर्ग लाभला पण त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलेल्या विविध विषयाचा सखोल अभ्यास करणारे  अनुयायी फारसे लाभले नाहीत.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker