गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे
आ. नमिता मुंदडा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शंखी गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी या विभागातील शेतकऱ्यांना कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते प्रशिक्षण प्रशिक्षण द्यावे अशी मागणी
आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, अंबाजोगाई, जि. बीड, तालुक्यातील शेतकऱ्यांनी चालू हंगामात हजारो हेक्टरवर पेरलेल्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीदाच्या कोवळ्या पिकांवर यंदा नवीनच संकट उभे राहिले असून सदर पिकांवर शंखी गोगलगायचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बहुतांशी पिक नष्ट झाल्याने तिबार पेरणी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करून मेटाकुटीस आलेल्या शेतकरी त्यात दुबार पेरणीमुळे आर्थिक अडचणीत आलेला असतांना या नव्याने उद्भवलेल्या शंखी गोगलगाय या संकटामुळे हवालदिल झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद अशा विविध पिकांची पेरणी हजारो हेक्टरमध्ये केलेली आहे. पेरणी केल्यानंतर मध्यंतरी पावसाने हुल दिली. त्यामुळे पहिलीच पेरणी कर्ज काढून केलेल्या काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज काढून दुबार पेरणी करावी लागली. त्यांनतर दमदार पाऊस झाला आणि यंदाचा हंगाम चांगला जाईल असे वाटत असताना अचानकच पिकांवर शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव झाला. उन्हाळ्यात सुप्तवस्थेत गेलेल्या गोगलगायींना पावसामुळे पोषक वातावरण निर्माण झाले असून त्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. पिके रोप अवस्थेत असताना या कोवळ्या पिकांना अर्ध्यातून कुरतडून गोगलगाय पिकांचे नुकसान करीत आहे. बहुतांश भागावरील पिंक गोगलगायीनी फस्त केले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले •असून तिबार पेरणीच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गोगलगायींचे नियंत्रण कसे करावे याबाबत अद्याप शास्त्रशुद्ध माहिती नसल्याने आणि कृषी विभागानेही त्याकडे फारसे लक्ष न दिल्याने तिबार पेरणीवरही गोगलगायींचा प्रादुर्भाव होणार नसल्याची शाश्वती नसल्याने या संकटाला तोंड कसे द्यावे हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
तरी गोगलगायींचे नियंत्रण कसे करावे यासाठी कृषी विभागाने शास्त्रशुद्ध माहिती देण्याबाबत आदेश द्यावेत व अचानक नव्याने उद्भभवलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.