एन.टी. रामाराव यांच्या मुलीची आत्महत्या; मृतदेह संशयास्पद अवस्थेत


एन.टी. रामाराव यांच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला
तेलुगु देसम पक्षाचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी उमा माहेश्वरी यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आज हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरी माहेश्वरी यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत मिळाला.प्रथम दर्शनी ही आत्महत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तेलंगणा पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात हलवला आहे. माहेश्वरी काही दिवसांपासून अल्पशा आजाराने त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच माहेश्वरी यांच्या मुलीचे लग्न पार पडले. या लग्नाला त्यांचे सर्व कुटुंबीय एकत्र जमले होते. माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी या त्यांच्या बहिणी आहेत. माहेश्वरी यांच्या मृत्यूची बातमी समजताच चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि इतर कुटुंबीय माहेश्वरी यांच्या घरी पोहोचले आहेत.सध्या या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौकशी नंतर मृत्यूचे खरे कारण समजू शकेल, अशी माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे.