महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय मराठवाड्यात अव्वल!

केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत – महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (AB-MJPJAY) यांच्या प्रभावी अंमलबजावणीत २०२५ या वर्षातही मराठवाडा विभागातून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मराठवाड्यातील बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालये महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच या महाविद्यालयांमध्ये सुपरस्पेशालिटी युनिट देखील कार्यरत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील अंबाजोगाई येथील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉ.नितीन चाटे यांचे सातत्यपूर्ण नियोजन, कार्यक्षम प्रशासन व विविध विभाग प्रमुखांसह रुग्ण समुपदेशन आणि समन्वयाच्या बळावर योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केल्याचे २०२५ च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
२०२५ मध्ये आयुष्यमान भारत – महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ६,६३९ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, शासनाकडे या वर्षभरात तब्बल 14 कोटी रुपयांची विमा संरक्षण रक्कम जमा झाली आहे.ही आकडेवारी मराठवाडा विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक आहे.
मराठवाडा विभाग : AB-MJPJAY आकडेवारी (२०२५)
स्वामी रामानंद तीर्थ ग्रा. शा. वै. म., अंबाजोगाई
▪️ ६,६३९ रुग्ण
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर
▪️ ५,०२४ रुग्ण
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड
▪️ ४,७५१ रुग्ण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
▪️ ४,७२८ रुग्ण
या उल्लेखनीय यशामागे सर्जरी विभागप्रमुख व योजना प्रभारी डॉ. नितीन चाटे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व महत्त्वाचे ठरले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाने सलग अनेक वर्षे मराठवाड्यात अव्वल स्थान कायम राखले आहे.
त्यांनी या योजनेची जबाबदारी घेतल्यानंतर गत सात वर्षांत जवळपास 40 हजार रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त झाला आहे.
योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे यांच्या नेतृत्वाखाली मेडिसिन, सर्जरी, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, ईएनटी या चिकित्सालयीन विभागांसह ॲनेस्थेशिया, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी व बायोकेमिस्ट्री विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच स्टाफ नर्सेस, निवासी डॉक्टर व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळेच हे यश शक्य झाल्याचे डॉ. चाटे यांनी नमूद केले.
या योजनेचे महाराष्ट्र प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनाचा योजनेच्या व्यापक स्वरूपात सामान्य जनतेपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी होत असतो असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महाविद्यालयात विकसित करण्यात आलेल्या योजना अंमलबजावणीच्या ‘स्वाराती पॅटर्न’चा अभ्यास करत लातुर व नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी आपली कामगिरी सुधारली आहे .
