प्रा.दत्ता भगत यांच्यासारख्या साहित्यिकांमुळे महाराष्ट्राला खरे वैभव प्राप्त झाले अशोकराव चव्हाण
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/Ashok-chavan-datta-bhagat-sangati-book-.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/Ashok-chavan-datta-bhagat-sangati-book-.png)
“साहित्यिक हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीचा मोठा दुवा आहे.प्रा.भगत यांच्यासारख्या साहित्यिकांमुळेच महाराष्ट्राला खरे वैभव प्राप्त झाले आहे” असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री मा.श्री.अशोकरावजी चव्हाण यांनी काढले.प्रा.दत्ता भगत यांना महाराष्ट्र शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व संगत प्रकाशनतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.याच कार्यक्रमात प्रा.भगत यांच्या ‘सांगाती’ पुस्तकाचे प्रकाशन मा,श्री.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डाॅ.व्यंकटेश काब्दे हे होते.
“महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी म्हणून मा.उल्हासदादा पवार आणि श्री अजय अंबेकर यांच्या मदतीने आपण स्वतंत्र सांस्कृतिक धोरणाची निर्मिती केली,त्याची चांगली फळे आता दिसत आहेत”असेही त्यांनी नमूद केले.कै.नरहर कुरुंदकर हे स्पष्टवक्ते विचारवंत होते.शंकररावजींच्या राजकीय अडचणीच्या काळात त्यांनी खूप मदत केली होती.त्यामुळेच कुरुंदकर स्मारकासाठी आपण सर्वतोपरी मदत केली असून यापुढेही स्मारकाच्या पूर्णतेसाठी कटिबध्द आहोत,असे मा.अशोकरावांनी आवर्जून सांगितले.
सत्काराला उत्तर देताना प्रा.भगत म्हणाले,”गौतम बुध्द,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी वा नरहर कुरुंदकर या परंपरेचा मी स्वत:ला पाईक समजतो.कारण या सर्वांच्या श्रध्देचा व आस्थेचा विषय माणूस हाच आहे. .माझ्या नाट्यकृतींचाही तोच गाभा आहे.आंबेडकरांबरोबरच गांधीवादाचाही माझ्यावर प्रभाव आहे.पण तो गांधींच्या अभ्यासातून नाही,तर सभोवतालच्या गांधीवादी व्यक्तींच्या आचरणातून आलेला आहे.”आपले शिक्षक कै.पी.जी.कुलकर्णी यांच्या उदाहरणातून त्यांनी हे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोपात डाॅ.व्यंकटेश काब्दे यांनी ‘सांगाती’मधे प्रा.भगत यांनी विविध व्यक्तिचित्रणातून नांदेडचे सांस्कृतिक जीवन रेखाटल्याचे सांगितले.
प्रारंभी डाॅ.श्रीनिवास पांडे यांनी प्रा.भगत यांच्या व्यक्तिमत्वाचा व नाट्यकृतींचा परिचय करून दिला तर श्री.अजय अंबेकर यांनी ‘सांगाती’ ग्रंथावर भाष्य केले.प्रा.मधुकर राहेगावकर,प्रा.सौ.श्यामल पत्की,दीपनाथ पत्कीव संजय सुरनर यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.विश्वाधार देशमुख यांनी केले तर लक्ष्मण संगेवार यांनी आभार मानले.