ST Bus Accident in Madhya Pradesh – इंदूर जळगाव येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू
मृत्युमुखी प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाचे आर्थिक सहाय्य
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. आज सकाळी इंदोर होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिकरी यामधील नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळली.
बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी संवाद साधून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटने संदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
या अपघातातील मृत लोकांची नावे आहेत १.चंद्रकांत एकनाथ पाटील – (४५) (चालक) अमळनेर २. प्रकाश श्रावण चौधरी (वाहक), अमळनेर ३.अविनाश संजय परदेशी, अमळनेर ४.राजू तुलसीराम (३५) राजस्थान, ५. जगन्नाथ जोशी -(६८) राजस्थान, ६. चेतन जागीड, राजस्थान ७. निंबाजी आनंदा पाटील, अमळनेर, ८. सैफउद्दीन अब्बास अली बोहरा, मध्यप्रदेश ९. कल्पना विकास पाटील – (५७) धुळे, १०. विकास सतीश बेहरे – (३३) धुळे, ११.आरवा मुर्तजा बोहरा – (२७) अकोला, १२. रुख्मणीबाई जोशी, राजस्थान अशी मृतांची नावे आहेत.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला असून या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ०२५७२२१७१९३ असा आहे.@JalgaonDM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 18, 2022
मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत (Maharashtra ST Bus Accident in Madhya Pradesh) कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.
नेमकं काय झाले?
महाराष्ट्र सरकारची बस होती, सकाळी 7च्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे जात होती, इंदूरमध्ये 12 प्रवासी चढले.. नर्मदा नदीवरील ब्रिजवरुन खाली कोसळली. आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते, अशी माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली दखल
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं की, इंदूरहून येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. सीएम याबाबात अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान, एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री चौहान हे इंदूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.