शेती-शेतकऱ्या बद्दल कळत नसेल तर बोलू नका – अमर हबीब
प्रधानमंत्री म्हणतो, ‘सेंद्रिय शेती करा.’ एक केंद्रीय मंत्री म्हणतो, ‘अमेरिकेत सोयाबीनचे एकरी उत्पादन भारतापेक्षा दहा पटी पेक्षा जास्त आहे.’ ही दोन्ही विधाने ऐकल्यानंतर माझ्या मनात खालील प्रमाणे विचार आले.
फुकटचे शहाणपण
1) प्रधानमंत्र्यांना शेतीतले काही कळत असेल का? त्यांना भारतीय शेतीची स्थितीचे आकलन असेल का?
2) निवडून येण्याची क्षमता असणे एक बाब आहे, निवडून येणार्याला सगळे समजते, असे समजून निवडून आलेल्याने बोलू नये.
3) प्रधानमंत्र्यांना शेतकरी येडे वाटतात का? त्यांना लागले शहाणपण शिकवायला! भारतातले शेतकरी परंपरेने शेती करत आले आहेत. अनुभवातून आलेले शहाणपण त्यांच्याकडे आहे. कोणाही उपटसुंभाने येऊन त्यांना अशी शेती करा, असे सांगू नये!
4) सेंद्रिय शेती करायची का रासायनिक करायची, हे शेतकऱयांना ठरवू द्या
5) एकेकाळी चंपारणच्या शेतकऱयांवर नीलची शेती करण्याची इंग्रजानी सक्ती केली होती, म. गांधींनी सत्याग्रह करून ती सक्ती हणून पाडली होती, हे या देशाच्या प्रधानमंत्र्यानी विसरू नये.
अमेरिकेच्या उत्पादकतेचे कौतुक –
1) अमेरिकेची एकरी उत्पादकता जास्त आहे, हे सर्वश्रुत आहे. आत्ताच उत्पादकता वादळी, असे नाही. उत्पादकतेच्या बाबतीत अमेरिका नेहमीच पुढे राहिला आहे
2) सोयाबीनच्या बाबतीतच नव्हे तर अनेक कृषी उत्पादनात अमेरिका आघाडीवर आहे.
3) केंद्रातला मंत्री हे कोणाला सांगतो? शेतकऱयांना! कायद्यांनी करकचून बांधलेले शेतकरी काय करणार? जी गोष्ट मंत्रिमंडळात सांगितली पाहिजे ती तुम्ही आम्हाला का सांगता?
4) उत्पादकता वाढली तर शेतकऱयांचे भले होते का? सत्तरच्या दशकात आपण संकरित बीज आणि रासायनिक खते वापरून उत्पादकता वाढवली होती. शेतकऱयांची परिस्थिती सुधारली का? ती सुधारली नसेल तर त्याचे आधी कारण शोधले पाहिजे.
5) केंद्रीय मंत्री एक विधान करतात पण त्याच्या कारणांचा वेध घेत नाहीत. अमेरिका आणि भारताच्या शेतीची तुलना करीत नाहीत, ही चालाखी समजून घेतली पाहिजे
6) अमेरिकेत सीलिंगचा कायदा आहे का? नाही. त्यामुळे तेथे कंपन्या शेती करतात. भारतात सीलिंग असल्यामुळे शेती करणाऱ्या कंपन्याच तयार झाल्या नाहीत. शत जमिनीचे तुकडे होत गेले. आज 80 टक्के शेतकरी अल्प व अत्याअल्प शेतकरी आहेत. भारतात शेतीच्या कंपन्या झाल्या असत्या तर चित्र वेगळे राहिले असते. सरकारला जी. एम. बियाण्यांवर बंदी घालण्याची हिंमतच झाली नसती!
7) अमेरिकेत जी एम बियाण्यांच्या वापरावर बंदी नाही. भारतात बंदी आहे. कापसात बी टी वापरायलाही बंदी होती, शेतकऱयांनी मोडली. सरकारला मान्यता द्यावी लागली. त्यानंतर कापूस उत्पादनात भारत शिखरावर पोचला. जेथे आधुनिक तंत्रज्ञानात येते, तेथे उत्पादकता वाढतेच.
8) उत्पादन वाढले म्हणून उत्पन्न वाढत नाही, हा अनुभव कापूस उत्पादक शेतकऱयांना आला आहे. भारतीय शेतकऱयांचे उत्पन्न वाढण्यात ‘आवश्यक वस्तू कायदा’ हा सर्वात मोठा अडसर आहे. तो कायदा केंद्र सरकार रद्द करू शकते
9) केंद्रीय मंत्री महोदय, तुमच्या सरकारला सीलिंग, आवश्यक वस्तू, जीएम बंदी हे कायदे रद्द करायला भाग पाडा मग तुम्हाला दिसून येईल भारतीय शेतकरी काय चमत्कार करू शकतो
पहिले हे कायदे रद्द करा, शेतकऱयांना गळफास ठरलेले,
- कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग) कायदा
- आवश्यक वस्तू कायदा
- जमीन अधिग्रहण कायदा
हे नरभक्षी कायदे रद्द करा!
अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन