अमृत महोत्सवानिमित्त ऐतिहासिक वारसा जतन अभियान
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम


अंबाजोगाई येथिल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ऐतिहासिक वारसास्थळ जतन अभियानांतर्गत श्री मुकुंदराज स्वामी समाधी स्थळावर व हत्तीखाना परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
हत्तीखाना लेणी अंबाजोगाई
योगेश्वरी देवीच्या मंदिरामुळे जास्त प्रसिद्ध असणाऱ्या अंबाजोगाईमध्ये प्राचीन लेणी आहेत. ती हत्तीखाना या नावानं ओळखली जातात. एकदा तरी पाहून यावं, असं हे स्थळ आहे. योगेश्वरी मंदिराच्या वायव्येला केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर, जयंती नदीच्या डाव्या किनाऱ्यापासून २०० मीटरवर इ. स. १०६६मधे खोदण्यात आलेली मंदिरं आहेत. यांना हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी गुहा, जोगाई मंडप किंवा जोगेश्वरी देवी लग्न मंडप असंही म्हटलं जातं. १०६० ते १०८७ या काळात शासन करणाऱ्या उदयादित्य राजाच्या काळात ही लेणी खोदली गेली. आज ही लेणी महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराशास्त्रीय स्थळे आणि अवशेष १९६०च्या अधिनियमानुसार संरक्षित केलेली आहेत. चौकोनी आकाराच्या या लेण्यांचं प्रवेशद्वार दक्षिणेकडे असून प्रवेशद्वाराजवळ खडकात कोरलेले हत्तीचे दोन भव्य पुतळे दिसतात. त्यावरूनच या लेण्यांचं नाव हत्तीखाना असं पडलं असावं. बहामनी काळात या जागेचा उपयोग हत्ती पाणी पिण्यासाठी करत होते, असेही संदर्भ सापडतात. लेणी मंडपाच्या आत साडेआठ चौरस मीटरचं प्रांगण आहे. हा मंडप चार दगडी स्तंभांवर तोललेला आहे. प्रांगणामधे कुशलतेनं खोदलेला ९.१४ x ९.१४ मीटर आकाराचा नंदी मंडप आहे. मध्यभागी नंदीची मूर्ती आहे. प्रांगणाच्या चारही बाजूंना चार हत्ती आहेत. यातील एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ व कार्यक्रम अधिकारी डॉ इंद्रजीत भगत यांनी या अभियानाच्या सुरवातीला तिरंगा झेंडा विद्यार्थ्यांना देवून या स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. याप्रसंगी प्राचार्य डॉ शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ” देशाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष वारसास्थळ असून, वारसा स्थळे सुरक्षित व स्वच्छ राहतील तरच देशाचा इतिहास भावी पिढीला ज्ञात होईल” असे सांगितले. या प्रसंगी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर घोषणा व गीत गात परिसरात स्वच्छता अभियान राबविले. कार्यक्रमाला ३७ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उपक्रमानंतर अल्पोपहार झाला व स्वयंसेवक महाविद्यालय परिसरात परतले.
कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ इंद्रजीत भगत यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत मरकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले, त्यांना डॉ दिलिप भिसे, डॉ रोहीणी खंदारे, डॉ मनोरमा पवार, डॉ राजाभाऊ भगत, डॉ नरेंद्र चोले, डॉ अमोल सोळुंके, प्रा. लोमटे मॅडम, डॉ संजय जाधव, डॉ वसंत गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.