राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील “एचएमआयएस” प्रणाली पुर्वी प्रमाणेच सुरु करण्यात यावी
अंबाजोगाई येथील आमदार नमिता मुंदडा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
![HMIS](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/hmis-1.png)
![HMIS](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/hmis-1.png)
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बंद करण्यात आलेली “एचएमआयएस” प्रणाली पुर्वी प्रमाणेच सुरु करण्यात यावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, राज्यातील शासकीय रुग्णालयांचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘एचएमआयएस’ या खासगी कंपनीची सेवा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाल याच्या आदेशानुसार बुधवार (दि.०६/०७/२२) पासून अचानकपणे पूर्णतः बंद करण्यात आली आहे. कसलीही पूर्वसूचना आणि पूर्वतयारी न करता हा निर्णय घेण्यात आल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई, जि. बीड. सह राज्यातील सर्व १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा प्रचंड विस्कळीत झाली असून नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असून रुग्णांना तपासण्याही पुन्हा कराव्या लागणार आहेत.
सन- २०१६ साली राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे व्यवस्थापन हॉस्पिटल मॅनेजमेंट अँड इन्फो सिस्टीम, (HMIS) एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले. सदरील कंपनीने या सर्व रुग्णालयात संगणक, कर्मचारी आदी स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभी केली. रुग्णांची नोंदणी, त्यांची मेडिकल हिस्ट्री, ओपीडी, औषधी, रक्त तपासणी प्रयोगशाळा, एक्स-रे आदी सर्व कामे ‘एचएमआयएस’च्या वतीने ऑनलाईन करण्यात येऊ लागली. त्यामुळे रुग्णसेवेला गती मिळाली तसेच रुग्णांचे आरोग्य विषयक पाश्र्वभूमी एका क्लिकवर मिळू लागल्याने डॉक्टरांनाही निदान करताना मदत होऊ लागली. रुग्ण एक्स-रे काढून वार्डात परत येईपर्यंत त्याचा अहवाल संबंधित डॉक्टरला प्राप्त होत होता. सर्व काही सुरळीत असताना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनच्या आयुक्तांनी बुधवार (दि.०६/०७/२२) पासून अचानकपणे आदेश काढून ‘एचएमआयएस’ची सेवा वापरू नये असे आदेश काढले. त्यानुसार आता ही सेवा पूर्णतः बंद करण्यात आली असून रुग्णालयांमध्ये पूर्वीप्रमाणे रुग्णांची नोंदणी आणि इतर सर्व कामे लिखित पद्धतीने सुरु करण्यात आले आहेत.
सदर सेवा सुरू असल्याने एक्स-रे, सीटी स्कॅन अहवाल संबंधित डॉक्टरांकडे ऑनलाईन पाठविण्यात येत होते, त्याच्या प्रिंट काढण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे एक्स-रे फिल्मची खरेदी २०१६ नंतर करण्यात आलेली नाही. ऑनलाईन सेवा बंदीच्या निर्णयानंतर एक्स-रे, सीटी स्कॅनची प्रिंट काढणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन फिल्म खरेदीची प्रक्रिया राबविण्यासाठी विलंब लागणार आहे. तोपर्यंत अत्यावश्यक रुग्णांचे एक्स रे, सीटी स्कॅन अहवाल पाहायचे कुठे? हा मोठा प्रश्न ही अतिशय गंभीर बाब आहे.
तरी कोणतीही पूर्वतयारी न करता अचानक एचएमआयएस’ ची सेवा बंद करण्यात आल्याने व पर्यायी व्यवस्था न देता जुन्या पद्धतीने कामकाज करण्याचे आदेश देण्यात आल्याने. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालया सह राज्यातील १६ रुग्णालयात रुग्णाची मोठी गैरसोय होत असून रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ‘एचएमआयएस’ प्रणालीद्वारेच कामकाज सुरु ठेवण्याबाबत त्वरीत आदेश द्यावेत अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.