Gopinath Munde Untold : मुंडे साहेबांची आठवण..!
आम्हाला हेडगेवार जमतात; तुम्ही का नाही जमणार..?


लोकनेते आदरणीय गोपिनाथराव मुंडे साहेबांची नवू वर्षापुर्वीची ही आठवण आहे. मनात खोलवर रुजलेली! कायम स्मरणात राहणारी!!
१८ एप्रिल २०१२ रोजी मध्यरात्री अंबाजोगाईची ग्राम देवता आणि कोकणस्थांची कुलदेवता माता योगेश्वरी हिच्या अंगावरील ३१ तोळे सोने आणि ३ किलो चांदीच्या दागीण्यांच्या चोरीने संपुर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.
अंबाजोगाईच्या डॉ. सौ. विमल मुंदडा या त्यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन चांगले होते. पण याहीपेक्षा अधिक दरारा होता तो सत्तांतरामुळे उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार झालेल्या गोपिनाथराव मुंडे साहेबांचा!
योगेश्वरी मातेच्या अंगावरील दागीने चोरीला गेल्याचे भांडवल त्यावर्षी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी केले. यात अपवाद होते फक्त साहेब! साहेब हे तसे योगेश्वरीमातेचे निस्सिम भक्त. दस-याचा नवरात्रोत्सव असो मार्गशीर्ष महिन्यातील नवरात्र उत्सव असो, आपल्या हातावरची सर्व कामे बाजुला ठेवून साहेब सहकुटुंब मातेच्या दर्शनासाठी या दोन्ही नवरात्र उत्सवात येणार म्हणजे येणार आणि मातेला एखादा दागीना अर्पण करून तिची विधीवत पुजा ही करणार. गेली अनेक वर्षांपासून जणु हा सिरस्ताच झाला होता. या चोरी गेलेल्या दागिन्यात साहेबांनी अर्पण केलेल्या अनेक दागीन्यांचा समावेश असल्यामुळे साहेबांची एक भावनिक गुंतागुंत या प्रकरणात निर्माण झाली होती. या चोरीनंतर साहेबांनी मंदीर परीसरात येवून पहाणी केली, अनेक प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. चोरीच्या तपासाची दिशा, संशयितांची नांवे, त्यांना अभय देणारे लोकप्रतिनिधी या़ची वैयक्तिक मतं जाणून घेतली. एकेकाळी गृहमंत्री पद हातळले असल्यामुळे या सर्व प्रकरणाचा गुंता त्यांच्या लक्षात आला. मात्र सत्ता हातात नसल्यामुळे या प्रकरणात हतबल झालेले साहेब यावेळी मला जवळून पाहता आले.
साहेबांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करुनही चोरीला गेलेले दागीन्यांचा तपास करण्यात पोलीस अयशस्वी ठरत असल्याचे पाहून जेवढे दागीने चोरीला गेले तेवढे दागिने पुन्हा देवीला अर्पण करण्याचा त्यांनी निश्चय जाहीर केला. यावेळी साहेबांनी देवीच्या दागिन्यांच्या चोरी तपास प्रकरणातील शासनाच्या निष्क्रिय धोरणाच्या विरोधात “परडी” मोर्चा काढून लोकांकडून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. हा निश्चय जाहीर करण्याच्या पुर्वीपासूनच या मी साहेबांसोबत होतो. त्यामुळे परडी मोर्चाच्या या प्रक्रियेत साहेबांसोबत सतत काम करण्याची संधी मिळाली.
हा परडी मोर्चा निघू नये म्हणून शासनाने अंबाजोगाई शहरात भादविचे १४४ कलम लागु करुन जमावबंदीचे आदेश दिले. शासनाच्या या निर्णयाला विरोध करीत साहेबांनी जाहीर केलेल्या परडी मोर्चा काढण्याच्या आपल्या निर्णयात काडीचाही बदल केला नाही!
परडी मोर्चा निघण्यापुर्वी साहेबांसोबत आम्ही सर्व जण पत्रकार राम कुलकर्णी यांच्या घरी जमलो होतो. तेथे अनौपचारिक चर्चा झाली आणि शिवाजी चौकातुन निघणाऱ्या परडी मार्चाकडे जाण्यापुर्वी साहेबांनी थेट जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन लावला, “मी परडी मोर्चाकडे निघालो आहे, ठरल्याप्रमाणे मोर्चा निघणार आहे, हिंमत असेल तर अटक करुन दाखवा!” असे म्हणत नेहमीच्या स्टाईल प्रमाणे फोन आदळुन ठेवून साहेब निघाले!
साहेबांचा ताफा गाड्याकडे निघाला. नेहमीप्रमाणे साहेबांचे बगलबच्चे साहेबांच्या गाडीत बसले. समोरच्या सीटवर बसताच मागे वळून पहात साहेब म्हणाले, “रापतवारजी बसले का?” साहेबांना मी खालुनच म्हणालो, “नाही साहेब, मी मागच्या गाडीतुन येतो!” साहेबांनी गाडी थांबवत त्यांच्या एका बगलबच्च्याला खाली उतरवले आणि म्हणाले, रापतवारजी तुम्ही बस्सा! गाडीत बसल्यानंतर साहेब हसले आणि म्हणाले, “आम्हाला हेडगेवार चालतात, रापतवार का नाही चालणार!” गाडी निघाली, आणि मी साहेबांसोबत अभिमानाने परडी मोर्चात सहभागी झालो!
सामान्य माणसाला, लहान माणसाला मोठं करणार ही साहेबांची काम करण्याची विशेष पध्दत होती!
साहेब अकाली गेल्यामुळे अनेकांचा आधारच गेला! आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या मोठ्या मनाच्या माणसाच्या अशा किती तरी छोट्या छोट्या गोष्टी माझ्या सारख्या लहान माणसाच्या मनात पक्के घरं करुन आहेत! आज साहेबांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या अनेक आठवणींचा महापुर डोक्यात थैमान घालत आहे.
साहेबांना विनम्र अभिवादन..!!