ठळक बातम्या

डॉ. व्यंकटराव डावळे यांच्या स्मृतींचा अंबाजोगाईकरांना पडला विसर…!

डॉ. व्यंकटराव डावळे
डॉ. व्यंकटराव डावळे

अंबाजोगाई शहराचे नांव केवळ भारताच्याच नाही तर आशिया खंडाच्या नकाशावर उमटवणारे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे पाहीले अधिष्ठाता डॉ. व्यंकटराव डावळे यांच्या कार्याचा अंबाजोगाईकरांना विसर पडला आहे.

लातुर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील हाडोळती येथील मुळ रहिवासी असलेले आणि अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या डॉ. व्यंकटराव डावळे यांनी आपले वैद्यकीय शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुर्ण केले. शालेय शैक्षणापासुनच आपली गुणवत्ता टिकून ती गुणवत्ता वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले पर्यंत टिकवून ठेवणे हे तसे अवघडच. पण हे सातत्य डॉ. व्यंकटराव डावळे यांनी सहज साध्य केले.


उस्मानिया विद्यापीठातुन आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन १९६२ साली डॉ. व्यंकटराव डावळे हे अंबाजोगाई येथे निजाम राजवटीत मिलिटरी कॅम्पस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परीसरात सुरू असलेल्या सामान्य रुग्णालयात सर्जन म्हणून रुजु झाले. अगदी त्याच वर्षी हे सामान्य रुग्णालय हे बंद करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता, पण हे सामान्य रुग्णालय अंबाजोगाई येथेच सुरु राहते किती आवश्यक आहे ते पटवून देत हा निर्णय शासनास बदलवून घेवून हे सामान्य रुग्णालय पुर्ववत ठेवण्यात डॉ. व्यंकटराव डावळे यांचा मोठा वाटा आहे.


या सामान्य रुग्णालयात कांहीं काळ सेवा करुन डॉ. व्यंकटराव डावळे यांनी इंग्लंड येथे जावून एफआरसीएस चे शिक्षण घेण्यासाठी परदेश वारी केली आणि ते परत या सामान्य रुग्णालयात रूजु झाले. अंबाजोगाई ही आपली कर्मभुमी माणून डॉ. व्यंकटराव डावळे यांनी आपले वैद्यकीय क्षेत्रातील करीयर सुरु केले आणि अंबाजोगाई चे डॉ. व्यंकटराव डावळे ही नवी ओळख त्यांनी निर्माण केली. रुग्णसेवेवर जीवापाड प्रेम करणा-या व्यंकटराव डावळे यांनी आपल्या कुशल हस्तकौशल्याने लाखो रुग्णांना जीवदान दिले. सामान्य रुग्णालयाला पुढे टी.बी. हॉस्पिटल आणि नागरी रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिला. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मुंबई पुणे येथे मिळणा-या अतिउच्च वैद्यकीय सेवा मिळावी या त्यांचा आग्रह असायचा. आणि याच साठी अंबाजोगाई येथील नागरी रुग्णालयासोबत येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी डॉ. व्यंकटराव डावळे यांनी शासनाकडे धरला आणि सर्व पातळीवर जावून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरु केले.


१९७२ मध्ये पडलेल्या भिषण दुष्काळानंतर मराठवाड्याचा मागासलेला शैक्षणिक आणि आर्थिक अनुशेष भरुन काढण्यासाठी गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात तीव्र आंदोलन झाले आणि अंबाजोगाई येथे वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे कृषी विद्यापीठ हे दोन शैक्षणिक युनीट मंजुर झाले. अंबाजोगाई येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळावी असा आग्रह धरणा-या डॉ. व्यंकटराव डावळे यांची मागणी, त्यांनी तयार करुन ठेवलेला वैद्यकीय सोयी सुविधांचा प्लॅटफॉर्म यामुळे शासनाने येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेणे सोईचे झाले.


अंबाजोगाई येथे शासनाने वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयाला इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा अधिक सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि ते ही आशिया खंडातील एकमेव ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असा उल्लेख शासन निर्णयात सुरुवातीच्या काळात करुन या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत उभारणीस आणि अद्ययावत यंत्रसामग्रीस आवश्यक तो फंड त्यांनी आपले राजकीय संबंध आणि वैद्यकीय क्षेत्रातील वजन वापरून करुन घेतला. महाराष्ट्रातील नामांकीत वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या तज्ञ डॉक्टर, प्राध्यापक, प्रोफेसर यांना दोन वर्षे या वैद्यकीय महाविद्यालयात सेवा करण्याचा नवा दंडक लागू करण्यास शासनास भाग पाडले आणि या वैद्यकीय महाविद्यालयाची आयडीयल उभारणी केली.


डॉ. व्यंकटराव डावळे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सेवाकाळ हा अंबाजोगाई येथेच घालवला असल्यामुळे त्यांना पाहण्याची, अनुभवण्याची संधी मला मिळाली. वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यापुर्वी येथे अस्तित्वात असलेल्या चेस्ट ऍण्ड जनरल हॉस्पिटल मध्ये मेडिकल सुप्रिडेंट म्हणून काम करत असताना त्यांच्या ओपीडीत जावून त्यांचे उपचार घेण्याचीही संधी मला मिळाली आहे.


डॉ. व्यंकटराव डावळे यांनी आपल्या अधिष्ठाता पदाच्या कार्यकाळात या वैद्यकीय महाविद्यालयाचे स़पुर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तर उभे केलेच शिवाय या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाला समृध्द आणि अत्याधुनिक करण्यासाठी अनेक प्रगत यंत्रसामग्री मागवून या रुग्णालयात येणाऱ्या सामान्य माणसाला अतिउच्च वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सतत प्रयत्न केले. देशाच्या राष्ट्रपतींना ज्या आरोग्य सुविधा मिळतात त्या संपुर्ण आरोग्य सुविधा देशातील सामान्य माणसाला मिळाल्या तरच “एक व्यक्ती एक मत” या संकल्पनेला अर्थ प्राप्त होईल असे डॉ. व्यंकटराव डावळे सतत म्हणायचे.


डॉ. व्यंकटराव डावळे यांनी अंबाजोगाई शहरात फक्त वैद्यकीय क्षेत्रासाठीच योगदान दीले असे नाही तर साहित्य आणि स़गीत क्षेत्रातील चळवळ अधिक मजबुत करण्यासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. १९८३ साली अंबाजोगाई येथे झालेल्या ५७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते आयोजक होते, तर याच किलावधीमध्ये पद्मश्री पं. शंकरबापु आपेगावकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या धृपद महोत्सवाच्या संयोजनात ही त्यांचा मोठा वाटा होता.


अंबाजोगाई शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व खर्च केले अशा या कतृत्वशील डॉ. व्यंकटराव डावळे यांचा आज पंचेचाळीसावा स्मृतीदिन आहे. डॉ. व्यंकटराव डावळे यांनी अंबाजोगाई शहरासाठी केलेल्या या सर्व कामाचा विसर अंबाजोगाईकरांना पडत चालाला याची खंत वाटते. डॉ. व्यंकटराव डावळे यांच्या स्मृती अंबाजोगाईकरांच्या कायम स्मरणात असून चालणार नाहीत, तर त्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त एखादा उपक्रम सुरु करण्याठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.


डॉ.व्यंकटराव डावळे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

💐💐

 

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker