अंबाजोगाईतील १० प्राध्यापकांचा समावेश महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वतीने अलिकडेच मान्यता देण्यात आलेल्या उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखील भारतीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वतीने करण्यात येणाऱ्या निरीक्षणाच्या पुर्वतयारीसाठी राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या २८ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या असून या मध्ये अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १० प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजीच्या कार्यालयपत्र क्रं. डीएम इआर१३०२४/४/२०२२-इएसटी१ अन्वये राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २८ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या असून सदरील प्राध्यापकांनी हा बदल तात्काळ अंमलात आणावा असे आदेशीत करण्यात आले आहे. या संदर्भीय पत्रात पुढे असे म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावयाचे आहे. त्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे निरीक्षण लवकरच अपेक्षीत आहे. खालील नमुद अध्यापकांना रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविलेल्या अध्यापकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद येथे प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्यात येत आहे. सदर बदल तात्काळ अमलात आणण्यात यावा असे म्हटले आहे. सदरील आदेशावर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंह यांची स्वाक्षरी आहे.
स्वारातीच्या १० डॉक्टरांचा समावेश
उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अखील भारतीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वतीने करण्यात येणाऱ्या तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या १० डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या असून यामध्ये जीव रसायन शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मुकुंद मोगरेकर, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सिध्देश्वर बिराजदार, जीव रसायन शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल झीने, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शेषराव चव्हाण, शल्य चिकित्सा शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नितीन चाटे, अस्थीव्यंगोपचार शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिपक लामतुरे, शरीर क्रिया शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सविता सोमाणी, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय मुंडे, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश चौधरी, प्रसुती व स्त्री रोग शास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. नंदकिशोर मोरे यांचा समावेश आहे.
रुग्णसेवेर होणार परिणाम
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय हे अंबाजोगाई तालुक्यासह धारुर, माजलगाव, वडवणी, परळी, केज, गंगाखेड, रेणापूर आदि तालुक्यातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या विभागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर या रुग्णालयात सतत उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात सर्वाधिक रुग्ण सेवेचा ताण असलेल्या औषध वैद्यकशास्त्र विगातील प्राध्यापकासह इतर ३ सहयोगी प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्यामुळे रुग्णसेवेर विपरीत परिणाम होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.