आ. धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश परळी येथील चौपदरी उड्डाणपुलासाठी १०० कोटी मंजूर
अंबाजोगाई-लातुर रोड वरील उर्वरीत १४ किमी रस्ता चौपदरी करण्यासाठी १०० कोटीचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/dhananjay-munde-Nitin-gadkari.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/dhananjay-munde-Nitin-gadkari.png)
अंबाजोगाई / केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी माजी सामाजिक न्याय मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेत परळी येथील डॉ. शाम प्रसाद मुखर्जी उड्णापुलाच्या विस्तारीकरणासह दुसरा एक चौपदरी उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी १००कोटी मंजूर केले असून अंबाजोगाई लातुर या राज्यरस्त्यावरील १४ किमी अंतराचा रस्ता चौपदरी करण्यासाठी १०० कोटींचा प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने दिले आहेत.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. १६ जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केलेल्या मागणीला मोठे यश आले असून, परळी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाच्या व थर्मल परिसरातील दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने १०० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
निधी मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये रा.मा. ५४८ ब वरील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व रा.मा. ३६१ एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट असून यासाठी १०० कोटी रुपये याच आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आ. धनंजय मुंडे यांनी समस्त परळी वासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1548305006012481538?s=20&t=AUHPso0crGfLREXAZU2F1Q
माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी १६ जुन रोजी नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती. परळी शहरातील दोन्ही रेल्वे उड्डाणपूल हे रहदारीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असून, अनेक वर्षांपासुन हे उड्डाणपूल विस्ताराच्या प्रतीक्षेत होता. या रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरण झाल्याने आ. धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील आणखी एका वचनाची पूर्ती देखील होणार आहे.
दरम्यान अंबाजोगाई ते लातूर रस्त्यातील वाघाळा पूल ते लातूर जिल्हा या १४ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीट चौपदरीकरण करण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली असून, केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने याबाबतचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.
आ. धनंजय मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीत या पुलाचे वाहतुकीच्या दृष्टीने असलेले महत्व अधोरेखित करत, चौपदरी विस्तार करण्याची तसेच अंबाजोगाई लातूर रस्ता विस्तारित करण्याची मागणी केली होती, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अन्य काही राष्ट्रीय महामार्ग व पुलांच्या विस्तार व दुरुस्तीचीही मागणी केली होती. त्या अन्य मागण्यांना देखील टप्प्याटप्प्याने या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध होणार आहे.